एसटीच्या २३०० चालक-वाहकांचा रोज ८६ हजार प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:28 IST2021-02-26T04:28:12+5:302021-02-26T04:28:12+5:30

अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही एसटी महामंडळाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. नगर जिल्ह्यात सध्या ४७२ ...

2300 ST drivers carry 86,000 passengers daily | एसटीच्या २३०० चालक-वाहकांचा रोज ८६ हजार प्रवाशांशी संपर्क

एसटीच्या २३०० चालक-वाहकांचा रोज ८६ हजार प्रवाशांशी संपर्क

अहमदनगर : कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही एसटी महामंडळाचे कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. नगर जिल्ह्यात सध्या ४७२ बसेस सुरू असून दररोज १ हजार ५७ फेऱ्या होत आहेत. त्यातून बसवर असणारे सुमारे २३०० वाहक-चालक रोज ८६ हजार प्रवाशांच्या संपर्कात येत आहेत. रोज फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या या वाचक-चालकांना अद्याप कोरोनाची लस देण्यात आलेली नाही.

नगर जिल्ह्यात एसटी महामंडळाचे ११ आगार असून त्यांच्याकडे एकूण ६९० बसेस आहेत. त्यापैकी ४७३ बस सध्या जिल्ह्यात सुरू आहेत. या बसेसवर १२०८ चालक, तर ११२५ वाहक कार्यरत असून दररोज १ हजार ५७ फेऱ्या होतात. या ४७२ बसेसमधून दररोज सरासरी ८६ हजार प्रवासी प्रवास करत असून हे चालक-वाहक या प्रवाशांच्या संपर्कात येतात. कोरोनाचे संकट पुन्हा गहिरे होत असताना या चालक-वाहकांना प्राधान्याने कोरोना लस देणे गरजेचे होते. परंतु, अद्याप त्यांना ती दिली गेलेली नाही.

--------

स्वत:च करावा लागतो सॅनिटायझर, मास्कचा खर्च

प्रवासादरम्यान चालक-वाहकांना मास्क, सॅनिटायझर आगारातर्फे पुरविले जाते, असे एसटी महामंडळाचे म्हणणे आहे. परंतु, प्रत्यक्षात चालक-वाहक यासाठी महामंडळावर अवलंबून न राहता मास्क, सॅनिटायझरचा खर्च स्वत: करतात, असे चालक-वाहकांचे म्हणणे आहे.

--------

जिल्ह्यात सुरू असलेल्या बसेस - ४७३

चालक- १२०८

वाहक - ११२५

रोजच्या फेऱ्या- १०५७

-----------

८६ हजार प्रवाशांचा रोज प्रवास

कोरोनामुळे जाहीर झालेल्या लाॅकडाऊनमध्ये मार्च ते मे २०२० पर्यंत बससेवा पूर्णपणे बंद होती. २४ मेपासून टप्प्याटप्प्याने एसटीच्या फेऱ्या प्रथम तालुका व नंतर इतर मार्गांवर सुरू करण्यात आल्या. प्रारंभी प्रवाशांचा प्रतिसाद कमी होता. मात्र, आता चांगला प्रतिसाद आहे. सध्या दररोज ४७३ बसेसमधून सुमारे ८६ हजार प्रवासी रोज प्रवास करीत आहेत.

-------------

२४९ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह

नगर जिलह्यात चालक-वाहक व इतर असे सुमारे साडेचार हजार एसटीचे कर्मचारी आहेत. यात नगर विभागाच्या ६५ बसेस मुंंबईत बेस्टला दिलेल्या आहेत. दरम्यान, गेल्या वर्षभरात २४९ एसटी कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळले असून त्यापैकी ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

----------

लसीकरण कधी?

एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे, अशा सूचना महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरून आल्या आहेत. त्याप्रमाणे एसटीने नुकतेच जिल्हा रुग्णालय प्रशासनाला पत्र देऊन लसीकरणाबाबत मागणी केली आहे. परंतु, आरोग्य विभाग या कर्मचाऱ्यांना कधी लस देणार याबाबत माहिती समजू शकली नाही.

---------

फोटो - २५एसटी

Web Title: 2300 ST drivers carry 86,000 passengers daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.