२२ दिवसांत दरोडी गाव झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST2021-06-04T04:17:25+5:302021-06-04T04:17:25+5:30
पारनेर : ४ मेनंतर १४ रुग्ण बाधित आढळल्यावर तातडीने उपाययोजना केल्या आणि पारनेर तालुक्यातील दरोडी गाव २२ दिवसांत ...

२२ दिवसांत दरोडी गाव झाले कोरोनामुक्त
पारनेर : ४ मेनंतर १४ रुग्ण बाधित आढळल्यावर तातडीने उपाययोजना केल्या आणि पारनेर तालुक्यातील दरोडी गाव २२ दिवसांत ग्रामस्थांच्या एकजुटीने कोरोनामुक्त झाले.
कोरोनाची दुसरी लाट एप्रिलपासून सुरू झाल्यावर दरोडी गावात लाट रोखण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांनी बैठक घेऊन गावात मास्क वापरणे सक्तीचे केले. गावात कुणालाही फिरू द्यायचे नाही, असा निर्णय घेतल्याचे सरपंच सुमन पावडे यांनी सांगितले.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात आले. यामुळे मेपर्यंत कोरोना गावापासून रोखण्यात यश मिळविले.
----
...अशी राबवली मोहीम
४ मे रोजी दरोडीत एक रुग्ण बाधित झाला. ७ मे रोजी रामदास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. बाधित झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील व संपर्कात असलेल्या लोकांची माहिती घेऊन त्यांची तपासणी करून बाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये दाखल करून उपचार करण्यात आले. किरकोळ लक्षणे असणाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय घरे घेऊन त्यांची जबाबदारी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य, टीमवर ठरवून देऊन त्यांची आरोग्याची माहिती घेऊन काही वाटले तर लगेच आरोग्य तपासणी करणे, अशा उपाययोजना राबविल्या, असे उपसरपंच शरद कड, अनिल पावडे यांनी सांगितले.
---
तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सूचना लाउड स्पीकरने दररोज सकाळ, संध्याकाळ लोकांना ऐकविण्यात आल्या. त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याची सक्ती करण्यात आली. आशासेविका, अंगणवाडीसेविका, महाविद्यालयीन शिक्षक, प्राथमिक शिक्षक, युवक, ग्रामस्थांच्या माध्यमातून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ याअंतर्गत संपूर्ण गावाच्या आरोग्याची माहिती घेत राहिले. त्यामुळे गाव २२ दिवसांत कोरोनामुक्त झाले.
-रामदास भोसले,
प्रमुख, कोरोना मुक्त गाव अभियान
----
ग्रामस्थ व सर्व शासकीय यंत्रणेने एकजुटीने केलेल्या कडकडीत लॉकडाऊनचा आणि ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाच्या चांगल्या नियोजनामुळे दरोडी गाव कोरोनामुक्त झाले.
-सुमन पावडे,
सरपंच, दरोडी
----
०३ दरोडी
दरोडी गावातील कोविड सेंटरची पाहणी करताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, सभापती गणेश शेळके आदी.
०३ सुमन पावडे