जामखेडमध्ये मतदार यादीवर २०६७ हरकती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST2021-02-24T04:23:23+5:302021-02-24T04:23:23+5:30
जामखेड : नगर परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर २ हजार ६७ हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रशासक जयश्री माळी ...

जामखेडमध्ये मतदार यादीवर २०६७ हरकती
जामखेड : नगर परिषदेच्या प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर २ हजार ६७ हरकती प्राप्त झाल्या आहेत. प्रशासक जयश्री माळी यांनी या हरकती निपटण्यासाठी चार जणांची समिती नियुक्त केली आहे. त्याचा चार दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे मतदार ज्या ठिकाणी राहत असेल त्याच प्रभागात नाव राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
जामखेड नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. या मतदार यादीत एका प्रभागात मतदार राहतो तर दुसऱ्याच प्रभागात मतदान या सावळ्या गोंधळामुळे मतदार संभ्रमित झाला होता. याबाबत २२ पर्यंत २०६७ हरकती नगर परिषदेला प्राप्त झाल्या. या प्राप्त हरकतींचा निपटारा करण्यासाठी चार जणांची समिती नियुक्त केली आहे. यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.
तहसील कार्यालयात मंगळवारी सायंकाळी ४ वाजता नियुक्त समितीच्या सर्व सदस्यांची बैठक प्रशासक जयश्री माळी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते उपस्थित होते.
....
हरकती निकालात काढणार
यावेळी मुख्याधिकारी दंडवते यांनी तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. प्रभागनिहाय समितीने हरकत आलेल्या अर्जदारांची प्रत्यक्ष जाऊन शहानिशा करायची आहे. सदर मतदार ज्या प्रभागात असेल तर त्या प्रभागात त्याचे नाव राहिले पाहिजे. याबाबत कोणतीही भेदभाव न करता यादृष्टीने अहवाल चार दिवसांत नगर परिषदेला द्यावा. त्यामुळे या हरकती मुदतीत निकाली काढण्यात येतील, असे मुख्याधिकारी दंडवते यांनी बैठकीत सूचना दिल्या.