तालुक्यातील १८८ अंगणवाड्यांना नाही पाणी सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:10+5:302021-09-19T04:22:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकोले : तालुक्यात एकूण ६९२ अंगणवाड्या असून, साडेसतरा हजारांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. मात्र, १८८ अंगणवाड्यांना स्वतंत्र ...

188 Anganwadas in the taluka have no water facility | तालुक्यातील १८८ अंगणवाड्यांना नाही पाणी सुविधा

तालुक्यातील १८८ अंगणवाड्यांना नाही पाणी सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोले : तालुक्यात एकूण ६९२ अंगणवाड्या असून, साडेसतरा हजारांपेक्षा अधिक लाभार्थी आहेत. मात्र, १८८ अंगणवाड्यांना स्वतंत्र पाणी सुविधा नसल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खासगी विहिरी किंवा शेजारच्या नळांवर चिमुकल्यांना तहान भागवावी लागत आहे.

अकोले प्रकल्पांतर्गत लिंगदेव येथील फापाळे वस्ती अंगणवाडीत ० ते ६ वयोगटाचे ४३ लाभार्थी आहेत. सध्या पूरक पोषण आहाराचा कोरडा शिधा घरपोच वाटपाचे काम सुरू आहे. हा शिधा घेण्यासाठी लाभार्थी त्यांच्या सोईनुसार येतात. त्यामुळे अंगणवाडीत एक-दीड वाजेपर्यंत थांबावे लागते, असे अंगणवाडी सेविका सुजाता फापाळे यांनी सांगितले. तालुक्यातील राजूर बालविकास प्रकल्पांतर्गत २६२ अंगणवाड्या आहेत. निळवंडे येथील अंगणवाडीचीही अशीच अवस्था आहे. निळवंडे - २२, कामटवाडी - १८ व कोकणेवाडी - १६ असा पट आहे. निळवंडे अंगणवाडीला नळपाणी सुविधा असून, शुध्द पाण्यासाठी ‘टाटा स्वच्छ’ पात्र असल्याचे अंगणवाडी सेविका संध्या आभाळे यांनी सांगितले.

सध्या पूरक पोषण आहार शिजवून अंगणवाडीत रांधला जात नाही. पन्नास दिवसांचा कोरडा शिधा लाभार्थींना घरी दिला जातो. त्यात प्रतिदिन गहू, तांदूळ व चणा ३८ ग्रॅम, साखर, मूग/मसूर २० ग्रॅम, मीठ ०८ ग्रॅम, मिरची व हळद ०४ ग्रॅम याचा समावेश आहे.

.....................

अकोले बालविकास प्रकल्पांतर्गत ४३० अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये ०३ ते ०६ वयाची ६ हजार ६७० बालके आहेत. ११६ अंगणवाड्यांना अद्याप स्वतंत्र पाणी सुविधा नाही. सर्व अंगणवाड्यांचा सुविधांयुक्त सुधारित एकत्रित आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

- हरीभाऊ हके, बालविकास प्रकल्प अधिकारी, अकोले

................

राजूर बालविकास प्रकल्पांतर्गत २६२ अंगणवाड्यांमध्ये ८ हजार ८५८ लाभार्थी बालके आहेत. नियमित २०३ व ५९ मिनी अंगणवाड्या आहेत. नळ जोडणी असलेली अंगणवाडी केंद्र १९० आहेत, तर ७२ अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र नळ जोडणी दिलेली नाही.

- भारती साताळकर, बालविकास प्रकल्प अधिकारी, राजूर

Web Title: 188 Anganwadas in the taluka have no water facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.