पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या १८ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:46+5:302021-07-12T04:14:46+5:30
पाथर्डी (अहमदनगर) : नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याच्या निषेधार्थ नगराध्यक्ष डॉ. ...

पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या १८ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
पाथर्डी (अहमदनगर) :
नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याच्या निषेधार्थ नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, भाजप तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आदींसह १८ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे दिले आहेत.
रविवारी सकाळी मुंडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यात भारतीय जनता पक्ष तळागाळात पोहोचविण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे मोठे योगदान आहे. असे असतानाही नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळणे ही घटना पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना धक्का देणारी आहे. त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकारी आमचे राजीनामे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे देत आहोत, असे पत्रात म्हटले आहे. यावर नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, जिल्हा चिटणीस सचिन पालवे, शहराध्यक्ष अजय भंडारी, तालुका चिटणीस नागनाथ गर्जे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत अकोलकर, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन वायकर, बाजीराव गर्जे, अजित शिरसाट, सुनील पाखरे, अप्पासाहेब शिरसाट, अंबादास पालवे, बाबुराव बांगर, रामहरी खेडकर, युसूफ शेख, नारायण पालवे आदींच्या सह्या आहेत. पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनीही शनिवारी रात्रीच राजीनामे जिल्हाध्यक्षांकडे पाठविले आहेत. युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.