जिल्ह्यातील १५ टक्के विद्यार्थी स्वाध्याय योजनेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:15+5:302021-03-24T04:19:15+5:30
अहमदनगर : राज्य शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना काळात राबविलेल्या स्वाध्याय योजनेचा जिल्ह्यातील १ लाख १० हजार (१५ ...

जिल्ह्यातील १५ टक्के विद्यार्थी स्वाध्याय योजनेत
अहमदनगर : राज्य शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोरोना काळात राबविलेल्या स्वाध्याय योजनेचा जिल्ह्यातील १ लाख १० हजार (१५ टक्के) विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. सध्याच्या आठवड्यात नगरचा राज्यात अठरावा क्रमांक लागला आहे.
कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडू नये म्हणून राज्य शासनाच्या शालेय विभागाने ३ नोव्हेंबर २०२० पासून पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून स्वाध्याय (डिजिटल होम असेसमेंट योजना) उपक्रम सुरू केला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर एक लिंक दिली जाते. त्यात आठवड्यासाठी काही बहुपर्यायी प्रश्नावली देऊन ती विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतली जाते. विद्यार्थ्यांनी ती सोडविल्यानंतर लगेच त्यांना त्याचा निकालही ऑनलाइनच मिळतो.
नगर जिल्ह्यात पहिली ते बारावीचे एकूण ७ लाख ७७ हजार ७११ विद्यार्थी आहेत. त्यापैकी या स्वाध्याय योजनेसाठी १ लाख ९ हजार ९९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मराठी, इंग्रजी, उर्दू अशा तिन्ही माध्यमांमध्ये हे स्वाध्याय उपलब्ध आहेत.
राज्यातील सर्वच जिल्हे या उपक्रमात सहभागी असून, प्रत्येक आठवड्यात जिल्ह्यांची क्रमवारी खाली-वर होते. सध्या एकोणिसावा आठवडा सुरू असून, त्यात नगरचा राज्यात अठरावा क्रमांक आहे.
----------------
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी - ७,७७,७११
स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी - १,०९,९९८
स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी - ९२,०७८
------------
एकदा नाशिक विभागात प्रथम क्रमांक
राज्यात एकाच वेळी हा उपक्रम सुरू आहे. दर आठवड्याला कोणत्या जिल्ह्याचा क्रमांक कुठे आहे, याची क्रमवारी होते. सध्या या उपक्रमाचा १९ वा आठवडा सुरू आहे. या उपक्रमाच्या सुरुवातीला तिसऱ्या आठवड्यात नगरचा नाशिक विभागात प्रथम क्रमांक आला होता.
--------------
तिन्ही माध्यमांत स्वाध्यायमालाही स्वाध्यायामाला मराठी, इंग्रजी व उर्दू अशा तिन्ही माध्यमांमध्ये उपलब्ध आहे. त्यात मराठीचे प्रमाण जास्त आहे. त्यानंतर इंग्रजी व शेवटी उर्दू माध्यमाचा क्रमांक लागतो.
----------
स्वाध्याय उपक्रमात सहभागी झाल्याने अभ्यासक्रमाची चांगली उजळणी होत आहे. दर आठवड्याला नवनवीन प्रश्नावली येते. बहुपर्यायी प्रश्न असल्याने प्रश्नसंच पटकन सोडवून होतो.
- आदेश जाधव, सातवी
------------
स्वाध्याय योजनेत गेल्या तीन महिन्यांपासून सहभागी आहे. दर आठवड्याला वेगवेगळ्या विषयांचा अभ्यासक्रम, तसेच प्रश्न सोडवून होतात. लगेच निकाल मिळत असल्याने आपले किती प्रश्न बरोबर आले याची माहिती होते. शिवाय काय चुकले याचाही बोध होतो. स्वाध्याय फार उपयोगी आहे.
- स्वराज गांगर्डे, आठवी
------------