१४१ ग्रामपंचायतीत जन सुविधा केंद्र
By Admin | Updated: June 27, 2014 00:19 IST2014-06-27T00:04:38+5:302014-06-27T00:19:20+5:30
रियाज सय्यद, संगमनेर तालुक्यातील १४१ ग्रामपंचायतींमध्ये जनसुविधा केंद्रे कार्यान्वीत करून विविध नागरी सुविधा देण्यात येणार आहेत.

१४१ ग्रामपंचायतीत जन सुविधा केंद्र
रियाज सय्यद, संगमनेर
नॅशनल ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांर्तगत केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत होणाऱ्या कामामध्ये एकसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने तालुक्यातील १४१ ग्रामपंचायतींमध्ये जनसुविधा केंद्रे कार्यान्वीत करून विविध नागरी सुविधा देण्यात येणार आहेत.
‘ई-पंचायत’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेला ग्रामपंचायत पातळीवर विविध अत्याधुनिक सेवा, आर्थिक सुविधा देण्याच्या दृष्टीने जनसुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. ‘ई-पंचायत’ प्रकल्पांतर्गत ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील संग्राम केंद्रांमार्फत नागरिकांना वित्तीय समावेशनासह विविध सेवा, दाखले वितरणाची कार्यपध्दती व दर निश्चिती याबाबत कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
त्यासाठी तालुक्यातील १४१ ग्रामपंचायतींमध्ये जनसुविधा केंद्र कार्यान्वीत करण्यात येणार आहेत. या केंद्रांद्वारे बँकिंग सेवा, आधार नोंदणी, लाभार्थी अनुदानाचे थेट हस्तांतरण तसेच मोबाईल, डीश टीव्ही रिचार्ज, हवामानाची माहिती, पॅन कार्ड, निवडणूक आयोग सुविधा, मोबाईल बील पेमेंट, संगणक साक्षरता, बस तिकीट बुकिंग, पेन्शन आदी विविध प्रकारच्या सुविधा एकाच छत्राखाली उपलब्ध होणार आहेत.
त्याचबरोबर रायते, सावरगाव तळ, धांदरफळ बुद्रुक, कौठे कमळेश्वर, राजापूर, पिंपळगाव कोंझिरा, निमगाव बुद्रुक, साकुर, चिंचपूर, हिवरगाव पावसा, निमोण, निमगाव जाळी, मनोली, धांदरफळ खुर्द, निमज, निमगाव भोजापूर, जोर्वे, चणेगाव, वनकुटे, कौठे बुद्रुक, मंगळापूर, मिर्झापूर या ठिकाणी जन सुविधा केंद्र कार्यरत होणार आहेत. एकूणच १४१ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवा केंद्र सुरू होणार आहेत.
या केंद्राच्या माध्यमातून जन्म, मृत्यू, नमुना नं.८, दारिद्रय रेषेखालील दाखले, हयातीचे दाखले, रहिवासी दाखले, वीज जोडणीसाठी ना हरकत, बेरोजगार प्रमाणपत्र, विवाह नोंदणी दाखला, चारित्र्याचा दाखला, ना देय प्रमाणपत्र, मालमत्ता आकारणी, निराधार योजनेसाठी वयाचा दाखला आदी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सर्व सुविधांच्या मोबदल्यात अदा केलेल्या शुल्कातून ग्रामपंचायतींना अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे. या सर्व सुविधा संगणक ग्रामीण महाराष्ट्रद्वारे (संग्राम) नागरिकांना ग्रामपंचायतीत एकाच ठिकाणी मिळणार असल्याने वेळ व पैशांची बचत होईल.
२२ ग्र्रामपंचायतीत वित्तीय समावेशन
पहिल्या टप्प्यात तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींमध्ये ‘वित्तीय समावेशन’ ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बँकिंग सुविधेमध्ये ग्रामस्थांचे खाते उघडून त्यांना रक्कम भरता व काढता येईल. निमगाव भोजापूर, चिकणी, सावरगाव तळ, पिंपळगाव माथा, वनकुटे, कौठे बुद्रुक, खरशिंदे, चिंचपूर बुद्रुक, सादतपूर, खंदरमाळवाडी, धांदरफळ बुद्रुक व कौठे धांदरफळ अशा १२ ग्रामपंचायतीत वित्तीय समावेशन सुविधा मिळणार आहे.