टंचाईतही १३ कोटी लीटर पाणीसाठा
By Admin | Updated: May 6, 2016 18:40 IST2016-05-06T18:36:20+5:302016-05-06T18:40:56+5:30
कर्जत : ऐन भीषण दुष्काळीस्थितीतही कर्जत येथे तेरा कोटी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. ही किमया साधली आहे जलयुक्तशिवार अभियानातून.

टंचाईतही १३ कोटी लीटर पाणीसाठा
कर्जत : ऐन भीषण दुष्काळीस्थितीतही कर्जत येथे तेरा कोटी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. ही किमया साधली आहे जलयुक्तशिवार अभियानातून. या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील विहिरीतील पाणी पातळी वाढून बंद बोअर सुरु झाले आहेत.
महात्मा फुले जलभूमी अभियानातून कर्जतलगतच्या कानवळा व लेंडी या दोन्ही नदी पात्रात जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या संकल्पनेतून हे काम दोन महिन्यांपासून सुरू आहे. या कामासाठी शासकीय मशिनरी कर्जतमध्ये प्रथमच उपलब्ध झाल्या आहेत. कर्जतची पूर्वेकडील नदी व पश्चिमेकडील नद्यांचे कर्जतच्या हद्दीपर्यंत खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणे, वेड्या बाभळी काढणे आदी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. या कामामुळे नद्यांचे रूप पालटले आहे. या दोन्ही नद्यावर बंधारे आहेत. बंधाऱ्यातील पाण्याची साठवण क्षमता वाढली आहे. तसेच बंधाऱ्याची अपूर्ण कामे पूर्ण करुन नदीच्या दोन्ही बाजूने रस्ते तयार करण्यात आले आहेत.
कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी बंधाऱ्यात जलवाहिनी टाकून कुकडीचे पाणी सोडले व चौंडीला जाणाऱ्या कालव्यातून येथे पाणी आणले. बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला. कर्जतचा हा अनोखा पॅटर्न तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किरण सावंत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
(तालुका प्रतिनिधी)
जलयुक्त शिवारचे पालकमंत्र्यांनी मंजूर केलेले काम, वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी व कर्जतकरांच्या या कामातून वाढलेल्या अपेक्षा यामुळे कृषिविभाग यशस्वी झाला. या कामाची फलश्रूती कर्जतकरांना दिसली हेच खरे समाधान आहे.
-राजेंद्र सुपेकर, कृषि अधिकारी, कर्जत तालुका
दोन्ही बंधाऱ्यात मिळून सुमारे तेरा कोटी लीटर पाण्याची साठवणूक झाली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे परिसराचे रूपच पालटले आहे. या भागातील पाणी पातळी वाढली आहे. विहिरींना पाणी आले आहे तर बंद बोअरही सुरू होऊन सर्वसामान्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता असताना या कामामुळे येथे कोट्यवधी लीटर पाणी साठले आहे.अनेक प्राण्यांचीही या गोदड नाथ सागराने तहान भागविली आहे. एकूणच झालेले काम व यामध्ये साठलेले पाणी पाहून कर्जतकर भारावून गेले आहेत.