कोराेनामुळे तालुक्यात १२५६ घरकुले अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:28+5:302021-07-12T04:14:28+5:30
अकोले : तालुक्यात सन २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या कालावधीत मंजूर ६ हजार ३८८ घरकुलांपैकी ५ हजार १३२ ...

कोराेनामुळे तालुक्यात १२५६ घरकुले अपूर्ण
अकोले : तालुक्यात सन २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांच्या कालावधीत मंजूर ६ हजार ३८८ घरकुलांपैकी ५ हजार १३२ घरांची कामे पूर्ण झाली असून, १ हजार २५६ घरकुले कोरोना सावटामुळे अपूर्ण राहिली आहेत. मंजूर घरकुले वेळेत पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रतिकूल परिस्थितीत घरकुल योजना पूर्ण करण्याची लाभार्थी व पंचायत समिती प्रशासनाची धावपळ सुरू आहे. लाभार्थी, गवंडी, बांधकाम कामगार, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती अधिकारी यांच्याशी समन्वय साधण्यासाठीची धडपड चालू असून वेळेत घरकुले पूर्ण होण्यास कोरोनामुळे अडथळे येत आहेत. वाळू वाहतूक व बांधकाम साहित्य खरेदीसाठी कोरोनामुळे लाभार्थींना कसरत करावी लागत आहे. त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने अडचणीत अधिक वाढ झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेचे ४ हजार ४४९ मंजूर घरकुलांपैकी ३ हजार ६८९, शबरी आवास योजनेच्या १ हजार ३४९ घरकुलांपैकी १ हजार ४१, तर रमाई आवास योजनेच्या मंजूर ५९० पैकी ४०२ अशी एकूण ५ हजार १३२ घरकुले पूर्ण झाली आहेत. पारधी घरकुल योजनेचा एकही लाभार्थी तालुक्यात नाही. तीनही घरकुल योजना मिळून तालुक्याला ८१ कोटी ६५ लाख ६८ हजार निधी प्राप्त असून, ५६ कोटी ०१ लाख ६० हजार रुपये निधी लाभार्थींच्या बँक खात्यात वितरित केला गेला आहे. २५ कोटी ६४ लाख ८ हजार निधी शिल्लक आहे.
...............
प्रत्येक घरकुलास १ लाख २० हजार अनुदान मिळते. काही रक्कम लाभार्थी घालतात. लाभार्थींकडून घरकुल पूर्ण करून घेणे मोठे जिकिरीचे काम आहे. ग्रामसेवक व लाभार्थी यांनी समन्वय साधत लवकरात लवकर घरांचे उद्दिष्ट पूर्ण करावे.
- दिलीप सोनकुसळे, गटविकास अधिकारी
..............
गावात ३१ घरकुले मंजूर आहेत. पैकी २५ घरकुले पूर्णत्वास गेली आहेत. ६ घरांची कामे रखडली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सुरू आहे. घरकुल योजनेला पूरक शौचालय बांधकाम मजुरीपोटी रोजगार हमी योजनेतून १८ हजार रुपये लाभार्थी कुटुंबास मिळतात.
- कविता प्रदीप हासे, उपसरपंच म्हाळादेवी