Zen story - before giving anything to anyone .. | झेन कथा - कुणाला काही देण्याआधी..

झेन कथा - कुणाला काही देण्याआधी..

धनंजय जोशी

झेन साधनेमध्ये औदार्य म्हणजे दान महत्त्वाचे मानतात. आपली साधनासुद्धा दान करायची असते. बुद्धाचा एक शिष्य त्याला म्हणतो, ‘तुम्ही म्हणता दान करावे; पण माझ्याच्याने ते अजिबात शक्य नाही. मला कोणालाही काहीही द्यावे असे वाटतच नाही.’ बुद्धाने त्याला काय सांगावे? बुद्ध म्हणाले, ‘असे कर. हे फूल घे तुझ्या डाव्या हातात. आणि डाव्या हाताने ते उजव्या हातात दे. ही तुझी दान साधना!’ त्या शिष्याने तशी साधना करायला सुरुवात केली. एका हाताने दुसऱ्या हाताला देता देता त्याला हळूहळू दानाचे महत्त्व समजू लागले. नंतर तो अत्यंत दानशूर झाला.

दान करताना आपल्या मनाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण कशासाठी दान करतो? त्यामागे आपल्या स्वार्थाची भावना आहे का हे अगदी काळजीपूर्वक बघायला पाहिजे. माझा एक साधक मित्र आहे. खूप वर्षांची साधना आहे त्याची. तो एकदा बाजारामध्ये फळे आणायला गेला होता. फळांची खरेदी झाली आणि त्याच्या लक्षात आले की, एक गरीब मुलगा त्याच्याकडे टक लावून बघत होता. मित्राला जरा वाईट वाटले. त्याने एक संत्रे त्या मुलाला दिले. संत्रे घेऊन तो मुलगा निघून गेला. एक शब्दही ना बोलता ! तो हसलादेखील नाही. मित्राला आश्चर्य वाटले आणि जरा वाईटपण वाटले की, आपण केलेल्या दानाला काही किंमत मिळाली नाही. नंतर आम्ही त्याच्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘माझे जरा चुकलेच तेव्हा. खरे दान म्हणजे त्याच्यामागे काहीही अपेक्षा नसली पाहिजे. दान करण्याची बुद्धी मला झाली ना, मग ते दान केल्यावर ती क्रिया संपूर्ण झाली !’ - त्याला म्हणायचे निर्मळ दान. कुणाला काही देण्याची इच्छा झाली की थांबू नये अजिबात. मॅकडोनाल्डमधल्या ड्राइव्ह थ्रू लाइनमध्ये थांबलो होतो. माझी वेळ आली तेव्हा माझी आॅर्डर घेतली आणि त्याला म्हणालो, ‘माझ्या मागच्या माणसाला एक कॉफी आणि फ्रेंच फ्राईज दे. इट इज माय ट्रीट!’ गाडी चालवून पुढे जाताना दोघांनी एकमेकांना हात दाखवला.
तेवढेच पुरेसे!

Web Title: Zen story - before giving anything to anyone ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.