तुज नारायणा बोल नाही..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 19:35 IST2019-11-02T19:31:36+5:302019-11-02T19:35:54+5:30
प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात त्यासाठीच हा देह आहे.

तुज नारायणा बोल नाही..!
- ह.भ.प.भरतबुवा रामदासी (बीड)
आपले पूर्वाजित कर्मच आपल्या सुख दुःखास कारण असते. खरं तर सुखाचा भोग प्राप्त झाला तर, कुणाचीच तक्रार नसते पण दुःखाचे भोग भोगतांना आपण देवासच दोष देतो. मी काहीही कर्म केले नसतांना देवाने हे दुःखाचे भोग माझ्या नशिबी का आणले..? असा आरोप माणूस करीत असतो. शास्त्रीय भाषेत याला अकृताभ्यागम दोष असे म्हणतात. प्रत्येक जीवाच्या हातून रागद्वेषादिक भावनेतूनच कर्मे अधिक झालेली असतात त्यामुळे त्याच कर्माचे फळ दुःख रूपाने मिळत असते. कर्माचे फळ तर, देवादिकांनाही चुकत नाही मग माणसाला कसे चुकेल..?
स्वपूर्वार्जित कर्मेव कारणं सुखदुःखयोः
असाच शास्त्र सिद्धांत आहे. पुराणात अशी अनेक उदाहरणे आली आहेत. श्रावण बाळाला चुकून बाण लागला व त्याचा वध झाला. पुत्र वधाने विव्हळ झालेल्या श्रावणाच्या पित्याने दशरथ राजास शाप दिला. राजा..! अंतसमयी तुला देखील पुत्र पुत्र करून मरावे लागेल.
विद्यारण्य स्वामी पंचदशी ग्रंथात वर्णन करतात -
अवश्यं भाविभावानां प्रतिकारो भवेद्यदि
तदा दुःखैर्नलिप्येरन् नल राम युधिष्ठिराः
संचिताचा प्रतिकार करता आला असता तर श्रीराम, नलराजा ,धर्म राजा यांनी दुःख भोगलेच नसते. तुकाराम महाराज म्हणतात -
पापाचे संचित देहासी दंडणा
तुज नारायणा बोल नाही
सामान्य माणसाला आपल्या पूर्वजन्मीचे कर्म माहित नसल्यामुळे तो ईश्वरावर दोषारोप करतो. वास्तवात हा देहच प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी प्राप्त झाला आहे.
प्रारब्ध कर्मणां भोगादेव क्षयः
एकदा समर्थ रामदास स्वामींना प्रचंड ताप आला. अंगावर घोंगडी घेऊन समर्थ झोपले होते इतक्यात सज्जनगडावर छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी आले. शिष्यांनी राजाला समर्थांना ताप आल्याचे सांगितले. राजे समर्थ दर्शनासाठी आले त्यांनी समर्थ चरणावर मस्तक टेकवले. समर्थ जागे झाले. राजांना बघून त्यांनी आपला ताप घोंगडीला दिला. राजे म्हणाले, गुरूदेव..! आपल्याला ताप आल्याचे ऐकले पण आता तर, आपले अंग थंड लागत आहे. गुरूदेव म्हणाले, ऐकले ते खोटे नव्हे. आपल्याशी निवांत बोलता यावे म्हणून मी थोड्या वेळापुरता हा ताप या घोंगडीला दिला आहे. राजाने घोंगडीला हात लावताच राजाला चटका बसला. राजे म्हणाले, गुरूदेव.! ताप जर घोंगडीला देता येतो तर घेताच कशाला..? समर्थ रामदास स्वामी म्हणाले; राजे.! प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात त्यासाठीच हा देह आहे.
(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत.त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 )