सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 22, आपल्या गुणांबद्दलही आपल्याला अज्ञान असते
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 12:53 IST2017-08-29T12:49:11+5:302017-08-29T12:53:17+5:30
माझ्या जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी मी हा धर्म सोडून दुस-या धर्मात जाईन म्हणशील तरी प्रश्न काही सुटणार नाहीत. नुसते पोशाख बदलले म्हणून प्रश्न सुटतो का? किती ते पोशाख बदललेस तरी तू आहेस तसाच आहेस म्हणून धर्म बदलून तुझे प्रश्न सुटणार नाहीत.

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग 22, आपल्या गुणांबद्दलही आपल्याला अज्ञान असते
- सदगुरू श्री वामनराव पै
माझ्या जीवनातले प्रश्न सुटण्यासाठी मी हा धर्म सोडून दुस-या धर्मात जाईन म्हणशील तरी प्रश्न काही सुटणार नाहीत. नुसते पोशाख बदलले म्हणून प्रश्न सुटतो का? किती ते पोशाख बदललेस तरी तू आहेस तसाच आहेस म्हणून धर्म बदलून तुझे प्रश्न सुटणार नाहीत. तू अज्ञानी राहिलास तर प्रश्न कसे सुटणार. जीवनविद्या काय सांगते तू प्रश्नाच्या मुळाकडे जा.मुळाकडे गेलास की तुला कळेल की तिथे अज्ञान आहे.आपल्याला सगळ्याच गोष्टींचे अज्ञान आहे.विचार कसा करावा याचे अज्ञान आहे. बोलावे कसे याचे अज्ञान आहे.इच्छा आकांक्षा काय कराव्यात याचे अज्ञान आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचे आपल्याकडे अज्ञान आहे आणि असे असूनही आम्ही जीवनाच्या प्रवासाला निघालेले आहोत. एखादया मनुष्याने आपल्या पोटाला धोंडा बांधलेला आहे व नदीत उतरला तर त्याचे काय होणार तर तो बुडणार अगदी तसेच आपण अज्ञानाचा धोंडा पोटाला बांधून भवनदीत उतरलेले आहोत तर मग आपले काय होणार असे असेल तर आपण बुडणार.
जीवनविद्या म्हणूनच सांगते तू मूळाकडे जा. खंरतर मूळ काय आहे याचे अज्ञान आहे. त्यामुळे आपल्याला सर्वच गोष्टींचे अज्ञान आहे. आपल्याला मी कोण याचे अज्ञान आहे ते तर जाऊ दयाच पण आपले गुणदोष काय हे देखील आपल्याला माहित नसतात.आपल्या दोषांबद्दल आपण अज्ञानी आहोत पण आपल्या गुणांबद्दलही आपल्याकडे अज्ञान असते.आपल्यात काय काय गुण आहेत हे देखील अनेकांना माहित नसते.म्हणजे असतो गुणी पण गुणांबद्दलही अज्ञान असल्यामुळे कधीकधी असे गुण अचानक उद्भवतात.उदा.आता मी प्रवचन करतो पण शाळा कॉलेजमध्ये असताना मी कधी साधे बोललो देखील नाही.वक्तृत्व स्पर्धेत कधीच भाग घेतला नाही .कुठल्या संस्थेत जाऊन कधी मार्गदर्शन केले नाही. किंवा मी कधी लिखाण देखील केले नव्हते. पण एका प्रसंगातून माझ्या आयुष्यात प्रवचनाला सुरवात झाली. काही लोकांनी आग्रह केला की तुम्ही लिहिलेच पाहिजे म्हणून माझ्या लिखाणाला सुरवात झाली. माझी पुस्तके प्रकाशित झाली. आत्तापर्यंत अनेक प्रवचने झाली पण हे गुण देखील माझ्याकडे आहेत हे मला पूर्वी माहीत नव्हते. तसेच आपल्याकडे असलेले गुण आपल्याला माहित नसतात आणि दोषांबद्दल तर काही विचारायलाच नको. आपले दोष आपल्याला समजत नाहीत व दुस-यांनी ते दाखविलेले आपल्याला आवडत नाहीत.संत काय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. कारण तो तुम्हांला तुमचे दोष बरोबर दाखवतो. खंरतर त्याबद्दल तुम्ही त्याचे आभार मानले पाहिजेत व आपण स्वत:मध्ये सुधारणा केली पाहिजे.पण वास्तविक दोष दाखविल्यावर रागवणारे लोकच जास्त प्रमाणात आढळतात.
जीवनविद्या सांगते तुझ्याकडे अज्ञान किती आहे ते बघ. तुझ्याजवळ अज्ञानाचा धोंडा आहे व तू तो बांधूनच अज्ञानाच्या समुद्रात उडी घेत आहेस. त्यामुळे हे अज्ञान दूर झाले पाहिजे व त्याठिकाणी ज्ञान आले पाहिजे. आता हे ज्ञान तुला कोण देणार. शिक्षक प्राध्यापक गुरू सदगुरु गाईड मार्गदर्शक तुला हे ज्ञान देणार. तू स्वयंभू ज्ञानी आहेस का नाही मग हे ज्ञान कुणाकडून घेण्याशिवाय तुला तरणोपाय नाही.