विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 05:30 IST2019-09-21T05:30:38+5:302019-09-21T05:30:45+5:30
लहान असताना रेडिओवर ‘आवाज की दुनिया के दोस्तो’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा.

विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द
- नीता ब्रह्माकुमारी
लहान असताना रेडिओवर ‘आवाज की दुनिया के दोस्तो’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. खरंच या जगामध्ये आवाजच आवाज आहे. बाह्य जगत आणि अंतर्जगत दोन्ही आवाजांनी भरलेली आहेत. बाह्य जगात ध्वनिप्रदूषण आणि अंतर्जगात विचारांचे प्रदूषण. मनातल्या विचारांना आवाज देणारे आहेत शब्द. विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द. विचारांना शब्दांचे रूप कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकाने ठरवायचे. विचारांमधील प्रभुप्रीती जेव्हा शब्दात उतरते तेव्हा त्या शब्दांना ‘प्रार्थना’ म्हटले जाते. हेच प्रेम जेव्हा शब्दांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले जाते तेव्हा ते ‘प्रवचन’ बनते. विचारांची दृढता जेव्हा शब्दात उतरते तेव्हा ते ‘वचन’ समजले जाते. विचारांमध्ये जेव्हा जोश येतो व तो शब्दात उतरतो तेव्हा त्याला ‘भाषण’ म्हटले जाते. एक-दोघांच्या विचारांची सुसंगती शब्दांद्वारे व्यक्त होते तो होतो ‘संवाद’ आणि तेच जर विसंगत असेल तर ‘वाद’ व्हायलाही वेळ लागत नाही. मनामध्ये अनेकानेक बाबींवर विचारांचा संग्रह केला असेल आणि तो जर शब्दात उतरला तर, त्याला ‘बातम्या’ म्हटले जाते. शब्दांची मांडणी व्यवस्थित रचून त्यात सूर भरले तर ते ‘संगीत’ बनते. विचारांची ऊर्जा शब्दांद्वारे व्यक्त होण्याचे हे अनेक प्रकार. मनामध्ये विचारांचा भला मोठा संसार आहे. परंतु प्रत्येक विचाराला आपण वाचा देत नाही. विचारांच्या लहरी मनापासून मुखापर्यंत येईपर्यंत निवळून जातात. खूप वेळा आपण रागाच्या भरात किंवा आवेशाने शब्दांचा प्रयोग करतो, त्यामुळे संबंधांमध्ये दुरावा येतो. जसे विचारांचा प्रभाव शब्दांवर होतो तसेच शब्दांचा प्रभाव आपल्या विचारांवरही होतो. एखादे नकारात्मक वाक्य जितक्या आवेगाने व्यक्त करतो त्याचा परिणाम ऐकणाऱ्याच्या मानसिकतेवर तो होतोच, परंतु त्याचा अनिष्ट परिणाम आपल्या पाचनक्रियेवर होतो. म्हणून अशा नकारात्मक वाक्यांचा प्रयोग जेवताना खास टाळावा. जर आपल्या जीवनात सुख व शांती हवी असेल तर व्यक्तिगत तसेच सामूहिक संभाषण सकारात्मक, आनंदी, आशावादी, समाधान देणाºया वाक्यांनी परिपूर्ण असायला हवे. आपले साधारण संभाषणही शांतीमय शब्दांनी भरलेले असावे याची शिस्त आपण स्वत:ला जाणीवपूर्वक लावायला हवी. शांत आणि स्थिर होण्यासाठी रोज काही वेळेसाठी मौन बाळगावे. कारण आपल्या मनामध्ये सतत विचारांची आंदोलने होत असतात. त्यांना नियमित अभ्यासाने समाप्त करावे. विचारांची स्पंदने जशी प्रभावशाली असतात तसेच शब्दांमध्येसुद्धा शिस्त आहे. मंदिरांमध्ये जेव्हा मंत्रांचे, श्लोकांचे उच्चारण केले जाते किंवा भजन-कीर्तन गायले जाते तेव्हा त्यांची सकारात्मक ऊर्जा मंदिर तसेच आसपासच्या परिसराला मिळते. देवळांमध्ये येणाºया भक्तजनांना त्याचा पवित्र व शक्तिशाली अनुभवही होतो. शब्दांचा सकारात्मक परिणाम आहे तसेच नकारात्मक परिणामही आहे. शास्त्रीय प्रयोगातून सिद्ध झाले आहे की आपण जिथे राहतो, काम करतो किंवा झोपतो तिथे असलेला कोलाहल आपली कार्यक्षमता उल्लेखनीय प्रमाणात घटवतो. आपल्या शब्दांमध्ये एखाद्या दु:खी व्यक्तीला सुखी किंवा उत्साहात आणण्याचे सामर्थ्य आहे तसेच एखाद्याला कमजोर करून मरणाच्या घाटात उतरवण्याचेही सामर्थ्य आहे. आपले शब्द व्यक्तीच्या मनातील घावांसाठी मलमाचे कामही करतात तर इजा पोहोचवण्याचेसुद्धा. मनुष्याची ओळख त्याच्या शब्दांनी होते. एखादी आध्यात्मिक व्यक्ती शब्दांचा प्रयोग खूप प्रेमाने, शांततेने, शुभभावनांनी करते. साधारण व्यक्तीचे शब्दही साधारण असतात.