प्रकाशतो सोशीकतेचा चंद्रमा! साथीला शांत स्वभावाची पौर्णिमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 10:27 AM2017-08-16T10:27:07+5:302017-08-21T11:50:36+5:30

‘स्त्री संत’ शब्दाचा भावार्थ ध्यानी घेताना काना-मात्रा देताच अक्षरांना पंख फुटतात. मग कितीतरी नवनवीन अर्थ ते चोचीत आणतात.

The woman is not sad to say birth. | प्रकाशतो सोशीकतेचा चंद्रमा! साथीला शांत स्वभावाची पौर्णिमा!

प्रकाशतो सोशीकतेचा चंद्रमा! साथीला शांत स्वभावाची पौर्णिमा!

Next
ठळक मुद्दे प्रपंचाच्या वाटेवरही परमार्थाची फुलं कशी वेचता येतात याचा वस्तुपाठ स्त्री संत देतात!विठ्ठलाकडं केवळ मेवाच मागायचा नाही, तर त्याची सेवाही करायला हवी ! ती जाण जनाईनं राखली आहे.

- डॉ.कुमुद गोसावी

‘स्त्री संत’ शब्दाचा भावार्थ ध्यानी घेताना काना-मात्रा देताच अक्षरांना पंख फुटतात. मग कितीतरी नवनवीन अर्थ ते चोचीत आणतात. सगळी अक्षरं चिवचिव करू लागली की, त्यातील अंतरंग-भावलय आपल्याला पकडता येते. काही वेळा ती आपल्याशी दीर्घकाळ हितगुज करीत राहते.
आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी सुख-दु:ख, मानहानी, प्रतिकूल प्रसंग यांना सामोरं जावं लागतं. संत-महंत त्यातही विशेषत: स्त्री संतांना अग्निदिव्यातून कसं जाणं भाग पडलं हे पाहणंही चिंतनीयच! मनाच्या साह्यानं मनालाच बदलण्याचा त्यांचा प्रयत्न मनाचे नि जनाचे सर्व खेळ अगदी तटस्थपणानं पाहणं! परब्रह्मच बांधून हाती घेणं-देणं! मनोवृत्ती सत्त्वशील, शांत, प्रसन्न राखत लोकसुखासाठी चंदन होऊन झिजत राहणं कसं साधतं.
या संतांशी भेटता । हरे संसाराची व्यथा ।
पुढता पुढती माथा । अखंडित ठेवीन ।।
असं संत ज्ञानदेव माऊलींनी म्हणावं ! तिथं जनसामान्यांची काय कथा? कारण त्यांच्या मनात तर संत स्त्री दिसते कशी? वागते कशी? जगते कशी? अशा असंख्य प्रश्नांची आवर्तनं चालू असतात. त्यांच्या उत्तरांचा धांडोळा म्हणजे स्त्री संतांच्या काव्य-कर्तृत्वाची ओळख! त्यासाठी जाणून घ्यावी लागते त्यांच्या अलौकिक जीवन चरित्राची चित्तरकथा! भक्तीच्या भांडवलावर जीवन-व्यवहार करताना त्यांची होणारी जीवघेणी दमछाक! तरीही त्यांच्या अंत:पटलावर प्रकाशतो सोशीकतेचा चंद्रमा! साथीला शांत स्वभावाची पौर्णिमा! 
संत ज्ञानदेव, संत नामदेव यांच्या काळात सात शतींचं अंतर ओलांडून डोकवलं तर असंख्य व्यथा, वेदना, अवमान, अवहेलना यांनी पिचलेलं स्त्री जीवनच डोळ्यांसमोर येतं! स्त्री संत तरी याला अपवाद कशा ठराव्यात? फरक इतकाच त्या प्राप्त परिस्थितीला छेद देत अध्यात्म वाटेवरून निर्भयपणानं चालत राहून आत्मकल्याण नि लोककल्याणही साधतात. प्रपंचाच्या वाटेवरही परमार्थाची फुलं कशी वेचता येतात याचा वस्तुपाठ देतात! म्हणून तर स्त्री संत मुक्ताई मोठ्या लडिवाळपणे ज्ञानदेवांना सांगते, ‘तुम्ही तरून विश्व तारा’, तर याच मुक्ताईसोबत जनाई संत नामदेवांची दासी-जनी जनाबाई झोपाळ्यावर बसून ओवी गाते, 
पहिली माझी ओवी । ओवीन जगत्र
गाईन पवित्र । पांडुरंग ।।
जनाईसारख्या स्वरचित ओव्या गाणाऱ्या संत चोखोबांची पत्नी, सोयराबाई, बहीण निर्मला ‘अवघा रंग एक झाला’ म्हणतात. कुणाच्या नि कोणत्या रंगात रंगावं हे या स्त्री संतांनी जाणलं आपल्या जीवाचं विवेकानं सार्थक करून. 
अभंगवाणी : संत वाणी अशी मधुर असते की, दीर्घकाळ ती काना-मनाशी गुंजारत राहते. साधी, सोपी, सरळ नि रसाळ काव्य रचनेनं स्त्री संतांनीही लोकमानसाला मोहिनी घातली. त्यांच्या काव्यातील आर्तभाव हृदयाला भिडणारा असल्यानं ती अक्षर झाली. तिच्यातील प्रेमभावानं रसिकांची अंत:करणं न ओलावली तरच नवल ! संत जनाई आपली अंतरीची प्रेमाची भूक व्यक्त करताना धावा करीत म्हणते,
आळविता धाव घाली ! ऐसी प्रेमाची भुकेली !!
असं जनाईनं कोणतंही प्रपंच सुख मागण्यासाठी देवाला साकडं घातलेलं नाही, तर तिला प्रभू प्रेमाचा वर्षावच केवळ हवा आहे. त्याच्या प्रेममिलनाचीच खरी आच आहे नि तो आपल्या भक्तिप्रेमापोटी धावून येणारच! हा तिला दृढविश्वास आहे. आपल्या अभंग रचनेतून तिनं तो अवघ्या विश्वाला दिला आहे. तो जनलोकांनी आत्मकल्याण साधावं यासाठीच दिला. विद्यार्जन वा व्यासंग यांचा गंध नसलेली, झाडलोट, दळण, कांडण करणारी एक कामगार स्त्री. दळिता-कांडिता तुज गाईन अनंता म्हणणारी पंढरीच्या पांडुरंगाची लाडकी भक्त संतपद प्राप्त करते. संत नामदेवांच्या कथा-कीर्तन श्रवणानं बहुश्रुत होऊन अभंग रचना करते ! संत गाथेत ३४७ अभंग जनाबाईच्या नावावर आढळतात. जे विविध विषयांनी विनटले आहेत. ज्यात नामसंकीर्तन आहे. संत स्तवन नि विठ्ठलाचं गुणगान आहे. कृष्णजन्म, बालक्रीडा, थालीपाक, काला नि ‘हरिश्चंद्राख्यान’सारखी आख्यानपर काव्यरचना आहे. जी आस्वाद्य तर आहेच, शिवाय कमालीची उद्बोधक असूनही अतिशय बोलकी आहे.
संत नामदेव व संत सेना न्हावी यांच्या जीवन-चरित्रातील काही प्रसंगांचं जनाईनं केलेलं शब्दचित्रण विशेष लक्षणीय असून, दशावतार वर्णन, तीर्थावळी, काकडआरती, पाळणा व पदे यावरील जनाईचे अभंग विलक्षण हृद्य आहेत.
तिच्या अभंगवाणीला अनुभूतीचा अमृतस्पर्श आहे.
गंगा गेली सिंधूपाशी । त्याने अव्हेरिले तिसी 
तरि ते सांगावे कवणाला । ऐसे नोले गा विठ्ठला । 
जळ काय जळचरा । माता अव्हेरी लेकुरा ।
जनी म्हणे शरण आले । अव्हेरिता ब्रीद गेले ।।
असे या अभंगातील जनाईचे साधेच; परंतु आत्मप्रत्ययकारी प्रश्न निरुत्तर करणारे ठरतात ! 
खरं तर या प्रश्नांची उत्तरं प्रश्नांच्या पोटातच सामावली आहेत. जनाईची आई करुंड तिच्या बालपणीच हे जग सोडून गेली ! नि गोदातटीच्या गंगाखेडच्या पांडुरंगभक्त ‘क्षमा’ची ही कन्या-पाच- सहा वर्षांची चिमुरडी पोर पंढरपूरला दामाशेटीच्या-नामदेवांच्या वडिलांच्या विठ्ठलाच्या अंत:स्थ आदेशानुसार स्वाधीन केली गेली ती कायमचीच. कारण तिच्या पित्याच्या निधनानंतर पोरकी झालेली जनाई अन्यत्र जाणार कुठं? नामयाची दासी म्हणून ती त्यांच्या घरीच राहिली.
आत्मपर
घरात आपल्या रक्ताच्या नात्याचं-हक्काचं कोणी नसावं, खेळण्या बागडण्याच्या वयात वाट्याला दासीपण यावं. घरकामाला अखंड जुंपलं जावं । अशावेळी विठ्ठलाचाच एक आधार । आपल्या अंतरीची व्यथा ती विठ्ठलाशिवाय अन्य कोणाला सांगणार ? हट्ट कोणाकडं करणार? माय-लेकीच्या नात्यानं कोणाच्या कुशीत शिरणार, असे अनंत प्रश्न पिंगा घालत असताना जनाईला पंढरीचा पांडुरंग सखा-जीवाचा जिवलग वाटावा । तिनं त्याच्याकडं आपलं दु:ख आपल्या अभंगातून व्यक्त करावं । यातच तिची खरी ओळख आहे. 
तुज वाचुनी विठ्ठला । कोणी नाही रे मजला ।।
अशा अंतरीची वेदना विठ्ठलाकडं सांगणारी जनाई विनयानं; परंतु ठामपणानं म्हणते, माय मेली बाप मेला । आता सांभाळी विठ्ठला ।।
मी तुझे गा लेकरू । नको मजसी अव्हेरू ।।
नाही केली तुझी सेवा । दु:ख वाटतसे जीवा ।।
विठ्ठलाकडं केवळ मेवाच मागायचा नाही, तर त्याची सेवाही करायला हवी ! ती जाण जनाईनं राखली आहे. पित्याकडून पांडुरंग भक्तीचा वारसा, नामदेवांकडून परमार्थ-आश्रय, ज्ञानदेवांच्या सहवास-सत्संगातून झालेले भक्तिज्ञान संस्कार यामुळे जनाईची भक्ती बहरत गेली, मुरत राहिली. तिच्या अत्यंत निरागस भक्तिभावानं पारमार्थिक उंची गाठली. 
पांडुरंग नामजप । हेचि माझे महातप ।।
असं नाममहिमा गात-गात म्हणू लागली. जनाईची भक्ती कृतीतून उमलत गेली. आपल्या उपेक्षित आयुष्याचं दळण विठोबाला सांगाती घेऊन जनाईनं नित्य दळलं. दळण-कांडण करता करता दमल्याभागल्या आपल्या जीवाला जोड मागितली ती त्या पंढरीनाथाच्या हाताची ! अगदी जवळीकतेनं ! आईला मायेनं मागावी तशी. 
‘शिणल्या बाह्या आता । येऊनिया लावी हाता ।।’
जनाईची ही जवळीक अशी की, ती पांडुरंगाला अखंड आपल्या सोबत ठेवते ।
त्याला लेकुरवाळ्या रूपात बघणं म्हणजे जनाईच्या अंतरी आनंदलहरी उसळून येणं ।
विठो माझा लेकुरवाळा । संगे लेकुरांचा मेळा ।
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ।।
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ।।
गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ।।
बंका कडियेवरी । नामा करांगुळीधरी ।।
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।।
विठ्ठलाचं हे जनाईनं चितारलेलं लेकुरवाळं रूप खूप काही सांगून जातं. आजच्या तंत्रज्ञान युगातील एकमेकांपासून दुरावत चाललेली माणसं ! आपल्या भावभावना संवेदना हरवून विभक्त होत चाललेली कुटुंब ! परस्परांच्या सुख-दु:खात प्रेमभावानं एकत्र येणारी वाडासंस्कृती ! जनाईसारख्या निराधारांना आधार देणारे परिवार ! हे सारं सारं फ्लॅट संस्कृतीनं फ्लॅट झाल्याचं वास्तव मनाला विंचवाचा डंख देत राहतं.
आपल्या आयुष्यात आलेल्या ऋणकर्त्याबद्दलचा कृतज्ञताभावही जनाईनं व्यक्त केला. संत नामदेव आपले सर्वेसर्वा आहेत । त्याबद्दल ती लिहिते, 
मी तो नामयाची दासी । जगी ठाऊक सर्वांशी ।
न कळे विधिनिषेध तो काई । जणी म्हणे माझे आई ।।
आपल्या या आत्माविष्कारातून जनाई आपण निरक्षर, अज्ञानी असल्याचं म्हणते. तिच्यातील ही लीनता प्रसंगी तिला परखड बोलही बोलायला लावते. बंडखोर बनते. एक स्त्री म्हणजे माणूस या नात्यानं नेटानं उभं राहण्याची आत्मनिर्भरवृत्ती दाखवते. निढळाचा घाम गाळून, उपसलेल्या अतीव कष्टानं व्याकूळ होऊन, अखंड अवहेलनेचं हलाहल रिचवून जनाईनं हे स्वातंत्र्य स्वकर्तृत्वानं मिळवण्यासाठी तिचं संतत्व सामावलंय.
डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी ।।
हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आता मज मना कोण करी ।।
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावरी तेल घाला तुम्ही ।।
जनी म्हणे देवा झाले मी वेसवा । निघाले केशवा घर तुझे ।।
परमेश्वर भेटीसाठी अतिशय आर्त असलेली जनाई ज्यावेळी आपलं आर्त पुरवण्याचं सार्थ स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी शिष्टाचाराने सारे संकेत पार उखडून टाकते. लौकिकातून अलौकिकाकडील स्वत:चा प्रवास ती व्यभिचाराच्या दृष्टांतातून धिटाईनं दर्शवते ! भौतिकातील सर्व व्यवहार सोडून स्वबळावर दुर्दम्य आत्मविश्वासानं आत्मनिर्भर होऊन विठ्ठलाकडं निघालेली जनाई इथं दिसते ! 
तिच्या अंतरीची पराकोटीची विठ्ठल भेटीची आचच तिला आत्मलक्ष्मी बनवते !
नि तिच्या त्या विठ्ठलाला प्रेम जिव्हाळ्यानं हृदयात बंदिस्त करून ठेवते !
धरिला पंढरीचा चोर । गळा बांधोनिया दोर । 
हृदय बंदी खाना केला । आत विठ्ठल कोंडला ।
आपण त्या पंढरीनाथाला युक्तीनं कसं बंदिवान केलं । या विजयी अभिनेषानं ही नामयाची दासी आपली आध्यात्मिक नामी मुक्तीही सांगून टाकते. 
सोऽहं शब्दाचा मारा केला । विठ्ठल काकुळती आला ।।
जनी म्हणे बा विठ्ठला । जीवे न सोडी मी तुला ।।
अध्यात्मातील ‘सोऽहं’ या महावाक्याच्या साह्यानं ती विठ्ठलाला चांगलच कोंडीत पकडते !
नामभक्तीनचं आपण आपलं उद्दिष्ट गाठलं । याची अनुभव साक्षही ती देते.
एक ना, अवघे सार । वरकड अवघड ते असार ।
नाम फुकट चोखट । नाम घेता न ये वीट ।।
असा नामजपाचा अखंड साधनामार्गच आपल्याला कसा कामी आला हे जनाई जनताजनार्दनाला अतिशय आत्मीय भावानं सांगून ठेवते. 
निर्गुणाकडे :
पाहता-पाहता नित्य झाडू मारता-मारता जनाई सगुणाकडून निर्गुणाकडं संक्रमित होते! तेही स्त्रीत्वाच्या साऱ्या मर्यादा सांभाळून! परंतु रूढी-परंपरा, स्त्रीजन्म म्हणून आयुष्यभर झालेली घुसमट, भोगलेल्या असंख्य यातना या साऱ्यांना छेद देत संतत्व जपते. जनलोकांपर्यंत पोहोचते. त्यांच्याशी सदैव संवाद साधून त्यांच्या चिरंतन सुखासाठी नामभक्तीची वाट दाखवून ठेवते.
मना लागो हाचि धंदा । रामकृष्ण हरिगोविंदा ।।
जिव्हे करू नित्य नेम । सदा विठोबाचे नाम ।।
असं अत्यंत आवडीनं, नित्यनेमानं विठोबाचं नाम सदैव घेतलं की, ते अंती सेवासातच मिसळून जातं. त्या नामब्रह्मात डुंबत राहिलं की मग काम क्रोधादि विकारांपासून सहजच दूर राहता येतंं. मग स्वभावातील पूर्वीचा संताप, स्पर्धा, सत्तेचा, संपत्तीचा हव्यास सारं काही आपोआप मावळतं नि विवेकानं आत्मसुखाचं अधिष्ठान प्राप्त करता येतं. देव आत, बाहेर सर्वत्र अणुरेणूत सामावला असल्याचा अनुभव येतो. निर्मळ भावभक्तीनं देवाला आपलंस कसं करून घेता येतं हेही जनाई जिवाभावानं जनलोकांना कथन करते.
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी।
एके दिवशी न्हावयास । पाणी नव्हते विसणास ।
देव धावोनिया आले । शीतल उदक घे घे म्हणे ।
जनी जाय पाणियासि । मागे धावे हृषिकेषी ।
असे जनाईचे सर्व व्यवहार विठ्ठलमय होऊन जातात. आपल्यासोबत देव आहे ही कल्पनाच जनाईला अफाट बळ देऊन गेली. निखळ भक्तिभावाचं प्रतिबिंब तिच्या अभंगवाणीत आहे. ज्ञानदेवांनाही तिनं ‘सखा’ म्हणून गौरविताना म्हटलं आहे-
‘ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर । असं त्यांच्याशी आईचंही नातं आहे.
ज्ञानाई आई । आर्त तुझे पायी ।
धावुनिया येई । दुडदुडू।।
स्त्री संतांच्या मांदीयाळीत जनाईचं असं अनेक पदरी नात्यांनी गुंफलेलं आगळंवेगळं असं स्थान आहे. तिच्या अभंग योगदानानं मराठी भाषावैभव वाढवलं आहे. जनसामान्य दासी जनीची स्त्री संत मालेतील एक असाधारण व्यक्तित्वाची ‘संत जनाबाई’ एक ‘संत कवियित्री’ म्हणूनही नावाजली गेल्यानं वारकरी संप्रदायातही तिचं अभंगस्थान आहे. निरंतर तेवणारी अक्षयज्योत म्हणजे तिची आत्मसाक्षात्कारी अभंगवाणी! जनसामान्यांची प्रतिनिधी, तेजस्वी स्त्री शक्तीचा हुंकार म्हणजे जनाई! संत जनाबाई निक्षून समस्त स्त्री जातीला बजावणारी ‘स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास।’ तिचे हे भावस्वर प्रत्येक स्त्रीला उदंड ऊर्जा देत सकारात्मकतेची, चैतन्याचे स्फूलिंग स्त्री हृदयात चेतवत ठेवेल! त्यासाठी त्या स्वरवेधाची मनाला आस हवी. नाही का?

Web Title: The woman is not sad to say birth.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.