आयुष्याची बेरीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 12:37 AM2019-10-07T00:37:59+5:302019-10-07T00:38:08+5:30

जब तुम पैदा भयें जगत में, तुम रोएँ जग हाँसे । ऐसी करनी कर चलो, की तुम हाँसे जग रोएँ ॥

The sum of life | आयुष्याची बेरीज

आयुष्याची बेरीज

Next

- प्रा. शिवाजीराव भुकेले

राजकुमार सिद्धार्थाचा गौतमबुद्ध होण्यापाठीमागे सिद्धार्थाच्याच जीवनातील एक बोधप्रद कथा नेहमी सांगितली जाते की, पाटलीपुत्रचे महाराज शुद्धोधन यांनी आपल्या राजकुमार सिद्धार्थाची मानवी जीवनातील दु:खावर नजर पडू नये म्हणून एक सुंदर शिशमहाल बनविला. सिद्धार्थ व यशोधरा त्यात राहू लागले; पण एके रात्री सिद्धार्थ अचानक महालाच्या बाहेर पडले. पाटलीपुत्रच्या रस्त्यावर त्यांना प्रथम दिसला तो दुर्धर आजाराने ग्रासलेला एक तरणाबांड मनुष्य. थोडे पुढे गेल्यावर दिसली ती वार्धक्याने जर्जर झालेली वृद्धा. आणखी थोडे पुढे गेल्यावर दिसली ती एका सद्गृहस्थाची अंत्ययात्रा. या साऱ्या घटनांचा सिद्धार्थाच्या मनावर एवढा खोलवर परिणाम झाला की, त्यांचे संवेदनशील मन विचार करू लागले.
ओ ! क्षणभंगूर भव राम-राम
मैं भाग रहां हूँ निस्सार देख
मेरी ओर निहार देख ।
मैथिली शरण गुप्तजींच्या ओळी थोड्याफार फरकाने इथे एवढ्यासाठीच मांडल्या की, आयुष्याची गोळाबेरीज करायचीच ठरविली तर बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व आणि मृत्यू या पंचसूत्रीच्या खेळात आयुष्याचे रहाट-गाडगे फिरत राहते. आयुष्याच्या वाटेवर एवढे काटे असतील, तर असे शेळपट आयुष्य मला नको. मी यापलीकडे एखाद्या शाश्वत सत्याचा शोध घेण्यासाठी जन्माला आलो आहे, असा शाश्वत विचार करून सिद्धार्थाने राज्य वैभवावर लाथ मारली आणि सिद्धार्थामधून ज्ञानाचा संदेश देणारे आणि आयुष्याला प्रज्ञा, शील, कारुण्याची देणगी देणारे ‘गौतमबुद्ध’ जन्माला आले; परंतु आमचे मात्र तसे होत नाही. कारण आमचे आयुष्य एवढे संवेदनाहीन झाले आहे आणि भावना एवढ्या गोठल्या आहेत की, आम्ही मी आणि माझेच्या पलीकडे जायलाच तयार नाही. आयुष्यातील प्रत्येक अवस्थेकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला आम्हाला कधी वेळच मिळत नाही. अनेक प्रतिकूल घटनांच्या प्रवाहाने मन मुर्दाड झाले आहे आणि भौतिक साधनांच्या गदारोळात शरीर यंत्र झाले आहे. दुसºया बाजूला आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेकडे जाणीवपूर्वक पाहणारे तुकोबाराय म्हणतात -
अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते आर्धरात्र खाय
मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मग काय भजनासी उरले ते पाहे गा ।
आयुष्याची सरासरी बेरीज शंभर वर्षांची आहे, असे मानले तर अनेकांची पन्नास वर्षे रात्री झोपेत निघून जातात. आयुष्यातील पहिली दहा-बारा वर्षे बालपणात निघून जातात. सत्य, असत्य, धर्म, अधर्म, कर्म, ज्ञान आणि लौकिक जीवनातील या सर्वांच्या पलीकडे निरागस बालपण असते. म्हणून त्याला नेणतेपणाचा काल मानले जाते. पण, आज घराघरांत बालकांच्या हातात आलेल्या ‘पबजी’रूपी नरकाच्या वणव्याने बालपणच करपून जाऊ लागले आहे. तारुण्याच्या ‘मदा’चे विचारायलाच नको. आव्हानाच्या डोंगरांना भेदून स्वअस्तित्वाचा नवा प्रकाश निर्माण करणारे तारुण्य आता फक्त भुकेकंगाल पोटी भुंकण्याचे काम करत आहे. प्रौढत्व येते ते ‘झापडे’ बांधूनच आणि शेवटी उरते ते केलेल्या चुकांचा पश्चात्ताप करणारे आणि मरणाची वाट पाहणारे वृद्धत्व. मग, वेगळे काहीतरी करण्यासाठी आयुष्यात शिल्लक ते काय राहते? हो राहते! आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेकडे जर जाणीवपूर्वक पाहिले तर आयुष्याच्या सायंकाळीसुद्धा कबीराच्या शब्दांत निर्धास्तपणे म्हणता येते -
जब तुम पैदा भयें जगत में, तुम रोएँ जग हाँसे ।
ऐसी करनी कर चलो, की तुम हाँसे जग रोएँ ॥

Web Title: The sum of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.