Study of Vipassana | विपश्यनेचा अभ्यास

विपश्यनेचा अभ्यास

- फरेदुन भुजवाला

विपश्यना शिबिरात नितांत शुद्ध धर्माचाच अभ्यास केला असल्याचे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात़ ते म्हणतात, शिबिरात पंचशीलाचे पालन केले़ चित्ताच्या एकाग्रतेसाठी समाधीचा अभ्यास केला आणि नंतर जेवढी शक्य आहे तेवढी प्रज्ञा जागृत करून चित्त विशुद्धीचा प्रयत्न केला़ या तिन्हींच्या अभ्यासात कोठे काही दोष दिसून आला नाही़ शरीर आणि वाणीच्या दुष्कर्मांपासून अलिप्त राहून शील आणि सदाचार पालनाचा वैदिक धर्मच नाही, तर जगातील सर्व धर्म स्वीकार करतात़ सर्वच याला चांगले म्हणतात़ हजारो उपदेश ऐकत राहिलो तरीही मनाला वश केल्याशिवाय शील पालन करणे शक्य नाही, हे सर्वांना माहीत आहे़ तेथे मन वश करण्याचा अभ्यास शिकविला गेला़ त्यासाठी स्वाभाविक श्वासाचे आलंबन दिले गेले़ तेसुुद्धा असे निर्दोष आणि सार्वजनिक आहे, की त्याचा प्रयोग सर्व करू शकतात़ भगवान गौतम बुद्धांनी सांगितले,
सब्बपापस्स अकरणं, कुसलस्स उपसम्पदा।
सचित्तपरियोदपनं, एतं बुद्धनसासनं।।
सर्व पापकर्मांपासून अलिप्त राहणे, कुशल कर्माची संपत्ती प्रात्प करणे आणि आपले चित्त परिपूर्ण रूपाने शुद्ध करणे हाच भगवान गौतम बुद्धांचा संदेश आहे़ हेच शील, समाधी, प्रज्ञा आहे़ भगवान गौतम बुद्ध केवळ उपदेशच देत नाहीत, तर त्याचा प्रयोगात्मक अभ्यास कसा करावा हे शिकवतात़ म्हणून बुद्धांचा उपदेश फलदायी असतो़ पहिल्या सत्रात हे सत्य खूप समजू लागले आणि वाटले की बुद्धांच्या विद्येचा हा व्यावहारिक पक्ष खरोखर मोठा विलक्षण, अद्भुत आणि अनमोल आहे, असे गोएंका यांनी नमूद केले़ ते म्हणतात, एकीकडे विपश्यनेचा गंभीर व्यावहारिक अनुभव आणि दुसरीकडे बुद्धवाणीचा
सैद्धान्तिक अभ्यास हे दोन्ही बरोबरीने चालले होते. त्यामुळेच बुद्धांचे उपदेश अधिक स्पष्ट होत होते. कोठे थोडेसुद्धा दोष नव्हते, शब्दाशब्दांत अमृत रसपान होते.

Web Title: Study of Vipassana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.