अध्यात्म ही मनाशी जोडलेली अतूट शक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 19:19 IST2019-11-02T19:18:33+5:302019-11-02T19:19:13+5:30
‘आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ-विवेका’असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे.

अध्यात्म ही मनाशी जोडलेली अतूट शक्ती!
भौतिक गोष्टींचा विसर पडत फक्त ईश्वराचे गुणवर्णन व्यक्तीच्या मुख आणि मनाने सुरू असणे, हीच खरी श्रद्धा होय. श्रद्धेच्या वाटेवर जो आला तो कधीही परत फिरत नाही. एकदा त्याला श्रद्धेची अनुभूती आली की, मग त्याचा पुढचा प्रवास अयोग्य होऊ शकत नाही. अध्यात्म ही अशी मनाशी जोडलेली शक्ती आहे. आपल्या सर्व संतमंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते याच विद्येच्या जोरावर सांगितले आहे. ‘आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ-विवेका’असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतांनी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते.
मनाच्या डोहात कायमच ढवळाढवळ सुरू असते. तिथे वासना चेतविल्या जातात. त्यामुळे अशा ठिकाणी वैराग्याचा दीप लावणे म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टींपासून अलिप्त राहणे होय. ही अलिप्त राहण्याची किमया उत्कट भावनेने स्वीकारता आली पाहिजे. वासना उडवता आली पाहिजे. ज्या देहाच्या ठिकाणी अशी वासना उडवली जाते तिथेच वैराग्य नांदते. देवावर माझी श्रद्धा आहे, असे म्हणणे म्हणजे श्रद्धा नसून श्रद्धेचा धागा हा कायम त्याग आणि समर्पण भाव यांच्याशी जोडलेला असतो. ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. त्याचा रोजच्या जगण्याशी संबंध आणता येतो का? हे जास्त मोलाचे. तीच तृप्तता मला अध्यात्मचा नवा धडा देणारी असेल.
- वेदांताचार्य राधे राधे महाराज
बर्डेश्वर संस्थान, तरवाडी ता. नांदुरा, जि. बुलडाणा.