... So the scope of thinking depends on your diet | ...म्हणून विचारांची व्याप्ती आपल्या खाद्यपदार्थांवर अवलंबून

...म्हणून विचारांची व्याप्ती आपल्या खाद्यपदार्थांवर अवलंबून

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

कोणत्याही पदार्थांचे सेवन करताना विचारपूर्वक करा, कारण सर्वच पदार्थ सेवन करण्यासारखे नसतात. जो व्यक्ती सात्त्विक पदार्थांचे सेवन करतो तो सन्मानप्रद जीवन जगतो. विचारांची व्याप्ती आपल्या खाद्यपदार्थांवर अवलंबून असते. आहारशुद्धौ सात्त्विक बुद्धी. जसा आपण आहार घेतो त्यानुसार आपली वैचारिक पातळी ठरते.

शुद्ध अन्न मनाला सात्त्विकता प्रदान करते. सात्त्विक मन शांतीला जन्म देते. सात्त्विक, तामसी, राजस असे आहाराचे प्रकार असतात. तामसी आहारामुळे व्यक्ती क्रोधिष्ट होते. राजस आहारामुळे मौलिक होते. सात्त्विक आहारामुळे प्रसन्न राहाते. प्रसन्नता आणण्यासाठी आहारावर नियंत्रण आवश्यक असते. आपण जसा आहार सेवन करतो तशी बुद्धी होते. जशी बुद्धी तसे विचार - त्यानुसार त्याच्या ज्ञानाची वृद्धी होते. कारण प्रत्येक मनुष्य जो काही बोलतो तो आपल्या बुद्धीनुसार.

बुद्धी-विचार, मन-भावना या सगळ्यांवर आहाराचा परिणाम होतो, ज्याचे जसे विचार तसे त्याचे संकल्प असतात. ज्ञानी मनुष्य हा आपल्या मुखातून निरर्थक बोलत नाही. त्याच्या वचनाला फार मोठा अर्थ असतो. त्यांच्या प्रज्ञानरूपी बुद्धीचे चिंतन, याचा प्रभाव त्यांच्या प्रकाशरूपी जीवनावर होतो. त्यांची वाणी ब्रह्म आणि वेदाचे, सत्य आणि धर्माचे, तत्त्व आणि बोधाचे विवरण करते. जीवनात सुख आणि शांतीचा विचार येण्यासाठीसुद्धा आहार महत्त्वाचा आहे. सात्त्विक अन्नाचे सेवन केल्यास सुभावना निर्माण होते.

सुभावना मनाला चांगल्या कार्यासाठी उत्तेजित करते. जगाला चांगला संदेश त्या वैचारिकतेतून मिळतो. सात्त्विक विचारांनी माणूस उन्नतीचे उच्चतम शिखर चढून जातो. जीवनाच्या राजमार्गावर चालतो. शत्रुता, कटुता याचा तो विचार करत नाही. आपल्या विचारांवर अनेक गोष्टींच्या प्रभाव पडतो. त्यानुसार समाजात पारस्पारिकता जळून येते. म्हणून सात्त्विक आहार घ्या. सात्त्विक आहारातून आपल्या बागण्या-बोलण्यात बदल घडेल. आपल्याकडून समाजहित जोपासले जाईल. विचारांच्या माध्यमातून सुव्यवस्था निर्माण केली जाईल. या सर्व गोष्टींसाठी सात्त्विक आहाराची आवश्यकता आहे.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

Web Title: ... So the scope of thinking depends on your diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.