आनंद तरंग - एकांताचा वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:15 AM2020-06-08T02:15:43+5:302020-06-08T02:15:52+5:30

तनामनाच्या खूप खोल कोलाहलात गुरफटलेल्या आपल्या वृत्तीला कुठं ना कुठं थोडं शांततेचं स्थिरावणं असावं म्हणून आपण आपल्या भोवतालची अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो;

The smell of solitude | आनंद तरंग - एकांताचा वास

आनंद तरंग - एकांताचा वास

googlenewsNext

इंद्रजीत देशमुख

तनामनाच्या खूप खोल कोलाहलात गुरफटलेल्या आपल्या वृत्तीला कुठं ना कुठं थोडं शांततेचं स्थिरावणं असावं म्हणून आपण आपल्या भोवतालची अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो; पण आपण शोधलेल्या आशा सर्वच ठिकाणी आपलं शांततेचं विसावणं होईल की नाही, हे मात्र सांगता येत नाही. आमच्या सदोष शोधपद्धतीचा सुगावा लागलेले तुकोबाराय आपल्याला अशा शांततेच्या विसावण्याबद्दल एके ठिकाणी सांगतात,

येणे सुखे रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष अंगा येत।।’

वास्तविक, जीवनातील अनंत बाबींबद्दल अनंतजणांशी संवाद साधण्याच्या नादी लागून आपण आपल्या जीवनहित चिंतनासाठी कधीच स्वत:शी हितगूज केलं नाही. अशा स्वहित चिंतनहेतुक उद्देशाने आपल्या जीवनात एकांत खूप महत्त्वाचा आहे. आजच्या युगात सतत धावपळ असणाऱ्या आमच्या जीवनात एकांत व एकांताची आवड या खूप कमी प्रमाण असलेल्या बाबी आहेत. एकांतात आपल्याच हातून आपल्याच बाबतीत घडलेल्या कितीतरी चुकीच्या व बरोबर असणाºया गोष्टींचे अवलोकन करता येते. शिवाय एकांतात आपल्या स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची जाणीव ठेवून उद्याच्या भविष्याचे नियोजनही करता येते. एकांतात आपणच आपले निरीक्षक असतो. त्यामुळे उद्याच्या चुकणाºया पावलाला बंधन घालण्यासाठीचे वैचारिक नियोजन या काळात करता येते. जगातील कितीतरी जणांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या थोर-मोठेपणाची प्रचिती आपण घेतो; पण एकांतात राहून स्वत:च स्वत:ला भेटून अंतरी दडलेल्या मोठेपणाची अनुभूती घेऊ शकतो. म्हणून तर जगाला भेटू वा न भेटू; पण आपल्या एकांत नित्यतेने आपण स्वत:च स्वत:ला मात्र नक्की भेटू.

Web Title: The smell of solitude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.