नामस्मरण! परमेश्वर नामाची थोरवी हेच सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 22:22 IST2019-01-03T22:22:50+5:302019-01-03T22:22:57+5:30
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी ‘नामा’चे महात्म्य आणि महत्त्व आपल्या आत्म साक्षात्कारी प्रवचनांमधून आत्मानुभवाच्या वाणीने असे काही फुलवले की हा ‘नमा’ चा अपूर्व मोगरा कैवल्य-सुगंध उधळत अवकाशभर पसरला.

नामस्मरण! परमेश्वर नामाची थोरवी हेच सत्य
- वामन देशपांडे
श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी ‘नामा’चे महात्म्य आणि महत्त्व आपल्या आत्म साक्षात्कारी प्रवचनांमधून आत्मानुभवाच्या वाणीने असे काही फुलवले की हा ‘नमा’ चा अपूर्व मोगरा कैवल्य-सुगंध उधळत अवकाशभर पसरला. त्या अपूर्व सुगंधाला एक नाद प्राप्त झाला. त्यांची अक्षरबद्ध झालेली प्रवचने, त्यांच्याच स्वरात तनामनात घुमू लागली. गोकुळातल्या कदंबाखाली कृष्णबासरीचे स्वर आसमंतात अमर झाले. त्यातले काही स्वर गेल्या शतकात गोंदवल्याला उमटले; गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र मुखातून उमललेली प्रवचनं अक्षरबद्ध झाली, म्हणून तर हा नाममोगरा अपल्या रंध्रारंध्रात सुगंध होऊन पाझरू लागला. त्यांच्या प्रवचनांवर भाष्य करतांना, आपल्या प्रस्तावनेच्या सुरूवातीलाच बाबा बेलसरे यांनी फार अप्रतिम असं भाष्य केले आहे. बेलसरे महाराज म्हणतात की, ‘महाराष्ट्रामध्ये कीर्तनकारांइतकेच प्रवचनाकार लोकप्रिय आहेत. पण प्रवचनकारांमध्ये तीन वर्ग आहेत. पहिला वर्ग आत्मज्ञानी पुरुषांचा ; दुसरा वर्ग, साधनेला उपयोग व्हावा यासाठी आध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या साधकांचा; आणि तिसरा वर्ग धंदेवाईक प्रवचनकारांचा.’
श्री महाराज पहिल्या वर्गातील प्रवचनकार होते. ज्यांना उत्तम जीवन म्हणजेच आनंदाने भरलेले समाधानी जीवन जगावे अशी खरी इच्छा होती, त्यांना उत्तम जीवन म्हणजे काय आणि ते जगण्याचा सोपा मार्ग कोणती, हे सांगण्यासाठी महाराजांनी प्रवचने केली आहेत.
श्री गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शु. व्दादशी शके १७६६ म्हणजेच १९ फेब्रुवारी १८४५ रोजी गोंदवल्याला झाला आणि मार्गशीर्ष वद्य दशमी शके १८३५ म्हणजेच २३ डिसेंबर, १९१३ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी गोंदवल्यालाच देह ठेवला. प्रभु रामचंद्राने त्यांच्या गळयात जन्मक्षणापासून स्वरांची उत्तम निगराणी केली होती. गोंदवलेकर महाराजांपाशी गाता गळा होता. लहानपणापासनू त्यांना कवितांची आवड होती. लहान मुलांचा त्यांना लळा होता. त्यांच्या वाणीमध्ये परमेश्वराने जणू जादू भरली होती. त्यांच्या वाणीला रसिक श्रोते वश होऊन जात. भगवंताच्या नामस्मरणात आणि संतांच्या कहाण्यात त्यांची वाणी तल्लीन होऊन जात असे. त्यांची भाषा दृष्टांताची होती. प्रापंचिक लोकांना मार्गदर्शन करतांना, नाममहात्म्य असं काही समजावून सांगत की, जणू आनंदाच्या दाही दिशा आपेआप उजळून निघत, लौकीक व्यवहारापासून दूर उभे राहून महाराज एक अलौकिक आयुष्य जगले. प्रसिद्धीच्या वाटेवर त्यांनी एक पाऊलसुध्दा उमटवू दिले नाही. जन्मभर एक विरक्त आयुष्य महाराज जगले. श्रीराम हे त्यांचे आरध्य-दैवत. सर्व काही श्रीराम करतो, खरे कर्तेपण श्रीरामाचे, मी एक निमित्तमात्र, हा त्यांच्या आध्यात्मिक जगण्याचा गाभा होता. भगवंताला जाणून घेण्याचे एक सुप्त केंद्र प्रत्येकाच्या अंत:करणात नांदतच असते; यावर महाराजांची दृढ श्रद्धा होती. ते जागे करण्याचे काम करीत होते. परमेश्वराच्या नामाची थोरवी गात गात, परमेश्वराशी अनुसंधान साधत महाराजांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मोगºयासारखा वेचला आणि सर्वांना केवळ नामाचे महत्त्व समजावून सांगितले. एका नामाशिवाय आयुष्यात दुसरे काहीच सत्य न मानणाºया गोंदवलेकर महाराजांच्या विचारांची आणि नाममहात्म्याची ही कहाणी...
कर्तव्यकर्म बजावून नामस्मरण करणे
ज्ञानदेवांनी नेवाशाला जेव्हा गीतेवर प्रवचने केली तेव्हा ती सारी सच्चिदानंदांनी लिहून घेतली. त्यामुळे तर ज्ञानेश्वरी हा अजोड ग्रंथ उपलब्ध झाला. सातशे वर्ष होऊन गेली या कहाणीला, इ.स. १२९० मध्ये ज्ञानदेवांनी गुरूआज्ञेने गीतेवर भाष्य केले होते. ग्रंथाचा शेवट करतांना सच्चिदानंदांविषयक ज्ञानदेव म्हणाले की,
शके बाराशते बारोत्तरे। तै टीका केली ज्ञानेश्वरे।
सच्चिदानंदबाबा आदरे। लेखकु जाहला।।
गोंदवलेकर महाराजांच्या मुखातून ही जी रसाळ नाममहात्म्य सांगणारी प्रवचनं बाहेर पडली ते अमृतधन ज्यांनी टिपून ठेवले, त्यांचे फार मोठे उपकार समजावर आहेत. ज्यांनी ही रसाळ प्रवचने ऐकली ते तर फारच भाग्यवान. सातशे वर्षापूर्वी जे नेवाशात घडले तसेच ते १००-१२५ वर्षापूर्वी गोंदवल्याला घडले. नाथांनी नंतर ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली तशी टिपणवह्यांवरून गोविंद सिताराम गोखले यांनी या प्रवचनांना एक सुंदर घाट दिला. त्यासंबंधी संग्राहक गोखले लिहितात की, श्री महाराजांच्या भक्तांपैकी काहींनी वेळोवेळी लिहून घेतलेल्या लिखाणांच्या वह्या पाहायला, वाचायला मिळण्याचे भाग्य मला मिळाले. त्यामधील भाषेचा साधेपणा, विचारांचा सखोलपणा, तसेच शिकवणुकीत नि:स्वार्थीपणामुळे व प्रत्यक्ष अनुभवाने आलेला रोखठोकपणा, साध्यासाध्या दृष्टांताच्या योगाने गहन विषय उलगडून दाखवण्याची महाराजांची हातोटी व विशेष म्हणजे भगवंताच्या प्रेमाने उचंबळणारी प्रभावी भाषा या गुणांनी मन वेधून घेतले.
ते पुढे म्हणतात की, लोकांना नामाचे महत्त्व पटावे म्हणून किती कळवळ्याने जीव तोडून महाराजांनी सांगितले. नामस्मरणाची आवड लोकांत निर्माण व्हावी म्हणून आपले उभे आयुष्य महाराजांनी खर्ची घातले. नामस्मरणाचा हा सुलभ मार्ग जो आचरील त्याला त्याचा प्रपंच कसाही असला तरीदेखील ‘न लगती सायास जावे वनांतरा। सुखे येतो घरा नारायण।’ हा रोकडा अनुभव येईल अशी स्वानुभवाच्या ठाम बलावर महाराजांनी सर्वांना ग्वाही दिली. आपल्या वाट्याला आलेले कर्तव्यकर्म चोख बजावून नामाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करणे हेच श्रीमहाराजांच्या निरुपणाचे सूत्र आहे.
गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधला नाममहात्म्याचा गाभा वाचताना एक गोष्ट लक्षात येते की, परमेश्वराशी नाममार्गाने अनुसंधान ठेवणे प्रत्येक जीवाला आवश्यक आहे. निर्गुण निराकार परमेश्वराला नाम साकारात आणते.
परमेश्वराचे दर्शन त्यामुळे सुलभ होते. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होणे आणि त्या झालेल्या जाणिवेशी आपला प्रत्येक श्वास गुंफून टाकणे फार महत्त्वाचे आहे. महाराजांच्या शिकवणीचा, त्यांच्याच भाष्यातून वेध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.