The Power of Spirituality and good behavior | दिव्य कृतीतून आनंद 
दिव्य कृतीतून आनंद 

रमेश सप्रे

काही शब्द हे जोडीनं येतात ‘भव्य-दिव्य’ किंवा ‘भव्य-दिव्य-उदात्त’ भव्य मंदिर, भव्य वास्तू, भव्य प्रदर्शन, भव्य पुतळा इत्यादी. भव्य गोष्टी या दृश्य असतात. खरं पाहिलं तर ‘भव’ म्हणजे संसार, जग, आजूबाजूची सतत बदलणारी-हलणारी परिस्थिती सागरावरच्या लाटांसारखी. हे सारं आपण पाहू शकतो. प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. याउलट ‘दिव्’ म्हणजे देवत्व, दिव्यत्व, असामान्य गुण किंवा चारित्र्य. उदात्त शब्दही असाच उच्च मूल्य, भाव, विचार व्यक्त करणारा. दिव्य उदात्त अनुभव हे इंद्रियातून घेता येत नसले तर इंद्रियांच्या पलीकडील मन-बुद्धी-चित्र यांच्याद्वारे घेता येतात. अतिशय सामान्य व्यक्तीही आपल्या जीवनात असं दिव्य-उदात्त करून जाते. याला उद्देशूनच बाकीबाबांनी (कवी बा. भ. बोरकरांनी) म्हटलंय 

‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती।’
हे सारं आठवायचं कारण म्हणजे एका गावात घडलेली सत्यघटना. गाव तसं खेडेगावही नाही नि अगदी शहरही नाही. तर त्या गावातली एक प्राथमिक शाळा. तिथं शिकवणाऱ्या एक सामान्य बाई. फार ज्ञानी नसल्या तरी खऱ्या आत्मज्ञानी म्हणता येतील असं त्यांचं ज्ञान-विचार नि मुख्य म्हणजे कृती! साहजिकच बाई विद्यार्थ्यांच्या लाडक्या होत्या. पालकांच्याही आवडत्या होत्या. कारण आपलं सर्वस्व त्या विद्यार्थ्यांसाठी वापरायच्या. एवढंच नव्हे तर मुलांचं कल्याण, शिक्षण यांच्याशीच लग्न लावल्यानं त्या साऱ्या गावाच्या सर्वात आदरणीय व्यक्ती होत्या. 

साहजिकच गावातील परिसरातील जवळ जवळ प्रत्येक घराशी त्यांचा जिव्हाळ्याचा व्यक्तिगत संबंध होता. कोणताही पाश, बंधन नसल्याने आपण हल्ली ज्याला 24 बाय 7 म्हणतो तशा आयुष्याच्या प्रत्येक श्वास नि क्षण जनसेवेसाठी वेचत होत्या. 
हल्ली बहुसंख्य मुलं निदान प्राथमिक शाळेत तरी जातातच त्यामुळे त्या बाईंचे असंख्य विद्यार्थी होते. ज्यांच्या जीवनाशी बाईंचे प्रत्यक्ष संबंध होते. एकूण काय बाईंचं जीवन हा ज्ञानदानाचा, जीवन शिक्षणाचा अखंड धगधगता यज्ञ होता. अगदी छोटय़ातल्या छोटय़ा कृतीतही बाई प्राण ओतायच्या नि मुलांनाही तसं करायला शिकवायच्या. त्यांचं सारं जीवन म्हणजे अगणित दिव्य कृत्यांची मालिका होतं.

 सतत ध्येय परायण नि सेवारत असल्यानं बाईंना उत्तम आरोग्य नि दीर्घायुष्याचं वरदान लाभलेलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळत नसे. दिवस रात्रींची अनेक शिबिरं घेऊन बाई मुलांना नि सहशिक्षिकांना सहजीवनाचं प्रात्यक्षिक करून दाखवायच्या. त्यावेळी त्या जर इतरांच्या आधी झोपल्या तर झोपेतही त्यांच्या चेहऱ्यावर धन्य प्रसन्न हास्य असायचं असं इतर शिक्षिका सांगत. 

कॅलेंडरच्या तारखेप्रमाणे वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त झाल्यावरही बाई कधी ‘रिटायर’ झाल्याच नाहीत. अक्षरश: अखेरच्या श्वासापर्यंत त्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काही चांगलं करतच राहिल्या; पण काळाची सत्ता कुणालाही झुगारता येत नाही. तसंच झालं. बाईंनी शेवटचा श्वास सोडला. साऱ्या परिसरात शोककळा पसरली. बाईंची स्वत: ची मालमत्ता अशी काही नव्हतीच. कोणीही नात्याचं नसल्यामुळे देहाला अग्नी कुणी द्यायचा याची चर्चा चालू असतानाच एका शिक्षिकेला बाईंच्या उशीखाली एक पत्र मिळालं. त्यांचं इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र होतं ते. त्यात स्पष्ट लिहिलं होतं. 

‘माझ्या मृत्यूनंतर माझ्या देहावर कोणतेही अंत्यसंस्कार करू नयेत. तो देह आपल्याच भागातील वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात यावा. तसं देहदानपत्र मी तयार करून ठेवलेलं आहे. ही माझी अंतिम इच्छा समजावी.’ बाईंच्या इच्छेनुसार देहदान करण्यात आलं. त्या वैद्यकीय महाविद्यालयात बाईंच्या शिक्षणाचा नि संस्कारांचा स्पर्श झालेले अनेक विद्यार्थी होते. बाईंचा मृतदेह ज्यावेळी अभ्यासासाठी मुलांसमोर आला त्यावेळी त्याची चिरफाड (डिसेक्शन) करायला कोणताही विद्यार्थी तयार होईना. ज्यांनी आपली जीवनं घडवली त्यांच्या देहाची चिरफाड? या विचारानंच विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले. कारण त्या त्यांच्या बाई नव्हत्या तर मूर्तीमंत आईच होत्या. सारे जण तटस्थ उभे होते जणू मूक श्रद्धांजली वाहत होते. त्यांच्या शिक्षकांनाही काय करावं हा प्रश्न पडला. त्यावेळी प्रयोगशाळेचा शिपाई (प्यून) आकाशवाणी झाल्यासारखा बोलला ‘अरे पाहता काय? ज्या बाईनं तुमच्यावर काळजातून प्रेम केलं ते काळीज कसं होतं ते तरी पाहा आणि ज्यानं एवढं विचार नि ज्ञान दिलं तो बाईचा मेंदू तरी कसा होता तेही पाहा. शिका त्यातून बाईचा देह चिरून त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्यांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार. तो तळमळतच राहणार’ हे शब्द ऐकल्यावर चमत्कार झाल्यासारखे विद्यार्थी बाईंच्या मृतदेहाकडूनही शिकत राहिले. त्यांच्या जिवंत देहानं तर विद्यार्थ्यांची तनं-मनं-जीवन फुलवली होतीच. अतिशय सामान्य वाटणा-या बाईंनी दिव्य जीवन जगून जिवंत आनंद निर्माण केला होता. अशा दिव्यत्वाला आपण अभिवादन करताना आपणही असं काही तरी करण्याचं अभिवचन देऊ या. संकल्प करू या.

 


Web Title: The Power of Spirituality and good behavior
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.