जगी जीवनाचे सार - घ्यावे जाणोनी सत्वर..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 11:03 PM2019-09-14T23:03:52+5:302019-09-14T23:04:41+5:30

मनातील भाव हा कर्माचे फळ देत असतो...

possitive thoughts create by silence work | जगी जीवनाचे सार - घ्यावे जाणोनी सत्वर..

जगी जीवनाचे सार - घ्यावे जाणोनी सत्वर..

Next

- डॉ.दत्ता कोहिनकर
    कारखान्यातील सामाजिक बांधिलकी या खात्याअंतर्गत समाजात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची जबाबदारी व्यवस्थापकांनी राजेश व आयप्पा या दोन अधिकाऱ्यांवर दिली. राजेश आपल्या हाताखालील लोकांना कामे सांगून उपक्रम राबवल्यानंतर त्याची खुप प्रसिद्धी करायचा, वरिष्ठांपर्यंत याच्या बातम्या पाठवायचा, आयप्पा मात्र हाताखालील लोकांबरोबर खूप सेवा करत प्रसिध्दीपासून दूर राहत. लोकसेवेत मग्न असायचा. वर्षानंतर स्वतःची इमेज घडवण्यासाठी चोहोबाजूंनी प्रयत्न करणार्या राजेशला बढती न मिळता आयप्पाला त्या विभागात बढती मिळाली. राजेशने एवढे प्रयत्न करूनही त्याच्या वाटयाला यश का नाही आले ? एकाच पंचतारांकित हॉटेल्समध्ये दोन जादूगार जादूचे प्रयोग करायचे. एक खूप प्रसिद्ध झाला व त्याने खूप पैसे कमावले. दुसऱ्याला  पगारावर संतुष्ट व्हावे लागले. कारण जो प्रसिद्ध झाला तो मनात आज मी लोकांना खुप संतुष्ट करणार आहे, त्यांचे खुप मनोरंजन करणार आहे  " असा भाव ठेवून जादूचे प्रयोग करायचा तर दुसरा जादूगार आज मी जादूच्या प्रयोगात सगळया प्रेषकांना फसवणार आहे. असा मनात भाव ठेवायचा. मनातील भाव हा कर्माचे फळ देत असतो. एखाद्या मनुष्याने त्याच्या आईला, बहिणीला, पत्नीला, मैत्रीणीला मारलेली मिठी. प्रत्येक वेळी त्यांच्या मनातील भाव हा वेगळा असतो. सर्वच स्त्रिया, क्रिया पण सर्वच ठिकाणी एकच पण मानसिक स्पंदने ही वेगवेगळी असतात. मनातील हेतूचे भावनेत रूपांतर होते. कला-साहित्य, संगीत, परमार्थ अशा आनंदमार्गात मनातील प्रसन्न भावामुळे भावनिक आजार टळतात. भगवान बुद्धांनी मनातील चार भावनांचा आवर्जुन उल्लेख केला होता. मैत्री, मुदीता, करूणा, उपेक्षा या त्या भावना होत. आचार्य रजनीश त्यांना भगवंताची पाऊलवाट म्हणत. ज्ञानदेवांनी पसायदानात ह्यमैत्र जीवाचेह्ण हा आदर्श मानला आहे. जैन दर्शनातील सामुदायिक पाठात सत्वेषु मैत्री, गुणिषु प्रमोदनह्ण,क्लिटेषु जीवेषु कृपापरत्वम हा भाव मनात व्यक्त केला जातो. कुठलेही काम करताना मनातील भाव काय आहे. हेतू काय आहे हे तपासून कार्य करावे. 
    महात्मा गांधी आपल्या दिनचर्येचा प्रारंभ लोककल्याणाच्या प्रार्थनेने (भावनेने) करत व याच लोककल्याणाच्या भावनेने तिला पूर्णविराम देत. गांधीजींच्या वाटयाला राजकीय विरोध व मतभेद अनेक वेळा आले. पण गांधीजींनी कधीही खेद व्यक्त केला नाही. कारण त्यांना माहीत होते.
निर्मळ भावनेने केलेली प्रार्थना वाया जात नाही. तिचे फळ चांगलेच मिळते. मानमान्यता मिळवण्यासाठी लोक जीवाचे रान करतात. पण ती मान्यता अल्पकालीन ठरते. 
गाडगेबाबांचे एक परमभक्त बाबांच्या, सभांचा, व्याख्यानांचा छापून आलेला वृत्तांत एकत्रित जमा करत असत.अनेक वर्षांचे हे संग्रहण - बाड एकदा त्यांनी बाबांसमोर ठेवले. त्यांना वाटले बाबा शाबासकी देतील. पण त्या चिंध्या पांघरणाऱ्या  अन खापरात भाकर खाणाऱ्या बाबांनी हे बाड उचलून हसत हसत शेकोटीत फेकून दिले. 
आपल्या हातांनी आपल्या गौरवाची राखरांगोळी केली. खरंच झाली का राखरांगोळी या गौरवाची. गाडगे महाराज जावून कित्येक वर्षे झाली. तरीही त्यांच्या नावाचा जयजयकार चालूच आहे. कारण लोककल्याणाच्या महान भावनेने - हेतूने या संताचे मन-अंतःकरण नेहमी ओतप्रोत भरलेले असायचे. जग जिंकणरे सिकंदर - नेपोलियन काळाच्या ओघात पडदयाआड गेले. पण लोककल्याणाच्या भावनेने आयुष्य वेचणारे शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आजही अमर आहेत. म्हणून कुठलेही कार्य करताना मनातील भावाला (हेतूला) तपासत रहा. हेतूवरच कार्यसिद्धी अवलंबून असते.
मनाच्या भावातून शारीरिक कर्म घडत असते. म्हणतात ना..
जगी जीवनाचे सार - घ्यावे जाणोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे - फळ देतो रे ईश्वर
 

Web Title: possitive thoughts create by silence work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.