pitru paksha 2019 importance significance shradh rituals | Pitru Paksha 2019 : पितृपक्षात यापैकी एक तरी काम नक्की करा
Pitru Paksha 2019 : पितृपक्षात यापैकी एक तरी काम नक्की करा

भाद्रपद कृष्णपक्ष हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो व या काळात आपले पितर पृथ्वीवर येतात, असे शास्त्रात सांगितलेले आहे. या काळात पितरांना उद्देशून श्राद्ध करण्यास सांगितलेले आहे. परंतु अनेकांना अनेक अडचणींमुळे ते करणे शक्य होत नाही. त्यांनी या अडचणींच्या स्थितीच्या काळात काय करावे? असा प्रश्न साहजिकच पडतो. परंतु त्याचे उत्तरही शास्त्राने दिलेले आहे. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार जमेल तसे करावे व पितरांचे स्मरण केल्याशिवाय राहू नये, असे शास्त्र सांगते. तुम्ही ज्या स्थितीत असाल त्या स्थितीत जमेल असे कर्म करून पितरांचे स्मरण करण्याची शास्त्राने सोय करून ठेवलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने पुढीलपैकी एक तरी प्रकार अवलंबून पितरांचे स्मरण करावे व त्यांच्या ऋणातून थोडे तरी उतराई व्हावे, असे शास्त्र सांगते.

१) श्राद्ध दिनी अभिप्रेत ब्राह्मण मिळाले नाहीत तर जसे ब्राह्मण मिळतील, तसे सांगून श्राद्ध करावे. परंतु कोणत्याही स्थिती चुकवू नये.

२) मातृ श्राद्ध दिनी ब्राह्मण मिळाले नाहीत तर सुवासिनी सांगून श्राद्ध करावे.

३) अनेक ब्राह्मण मिळाले नाहीत तर एक ब्राह्मण सांगून श्राद्ध करावे. जो ब्राह्मण मिळाला असेल त्याला पितृस्थानी बसवावे. देवस्थानी शालिग्राम आदि देवतेची स्थापना करून नेहमीप्रमाणे संकल्प करून श्राद्ध करावे. ते पान नंतर गाईस द्यावे किंवा पाण्यात सोडावे.

४) कोणीच ब्राह्मण मिळाले नाहीत तर दर्भाचे ब्राह्मण बसवावेत व यथाविधी श्राद्ध करावे. यास चट श्राद्ध असे म्हणतात.

५) स्वत: श्राद्ध करण्यास राजकार्य, तुरुंगवास, रोग किंवा इतर काही कारणाने असमर्थता असल्यास पुत्र, शिष्य किंवा ब्राह्मणद्वारा श्राद्ध करावे.

६) आमश्राद्ध म्हणजे शिधा देऊन श्राद्ध करावे. यात भोजनाला अनुसरून असणाऱ्या कृत्यांखेरीज बाकी सर्व विधी नेहमीप्रमाणे करावेत. प्रत्येक भोजनाला लागतो त्यापेक्षा अधिक शिधा ब्राह्मणाला द्यावा. संकटकाळी भोजनाइतकाच दिला तरी चालतो.

७) हिरण्यश्राद्ध म्हणजे द्रव्यद्वारा श्राद्ध करावे. प्रयोगात तसा उल्लेख करावा. भोजनाला लागणा-या खर्चापेक्षा जास्त, यथाशक्ती द्रव्य
द्यावे. या श्राद्धात पिंडदान करीत नाहीत.

८) संकल्पविधी म्हणजेच पिंडदानाखेरीज बाकी सर्व विधी करावेत. आवाहन, स्वधा शब्द, पिंड, अग्नौकरण, विकीर व अर्घ्यदान हे विधी प्रस्तुत श्राद्धात करीत नाहीत.

९) ब्रह्मार्पणविधी म्हणजे ब्राह्मणांना बोलावून, हातपाय धुतल्यावर आसनावर बसवावे. पंचोपचाराने पूजन करून भोजन घालावे. पितृस्वरूपी जनार्दनवासुदेवो प्रीयताम असा संकल्प करावा.

१०) होम श्राद्ध म्हणजे द्रव्य व ब्राह्मण यांच्या अभावी अन्न शिजवून उदीरतामवर या सूक्ताची प्रत्येक ऋचा म्हणून अग्नीत होम करावा. (हा
श्राद्धविधी उत्तरक्रियेच्या वेळी करतात.)

११) पिंड श्राद्ध म्हणजे संकल्पपूर्वक केवळ पिंडदान करावे. ब्राह्मणभोजन वगैरे विधी येथे करीत नाहीत.

१२) वरील काहीही करण्यास असमर्थ असलेल्या माणसाने उदकपूर्व कुंभ द्यावा.

१३) थोडे अन्न द्यावे.

१४) तीळ द्यावेत.

१५) थोडी दक्षिणा द्यावी.

१६) यथाशक्ती थोडे धान्य द्यावे.

१७) गाईला गवत घालावे.

१८) केवळ पिंड द्यावेत. (अन्य विधी करू नयेत.)

१९) स्रान करून तीळयुक्त पाण्याने पितृतर्पण करावे.

२०) थोडे गवत जाळावे.

२१) श्राद्धदिनी उपवास करावा.

२२) श्राद्धविधी वाचावा.

२३) यापेकी काहीही करणे शक्य नसेल तर रानात जाऊन गवताची काडी सूर्यादि लोकपालांना दाखवून पुढील गद्य मंत्र उच्चस्वराने म्हणावा : माझ्याजवळ श्राद्धोपयोगी धनसंपत्ती वगैरे काही नाही. मी सर्व पितरांना नमस्कार करतो. माझ्या भक्तीने माझे सर्व पितर तृप्त होवोत. माझे हात वर करून मी प्रस्तुत प्रार्थना करीत आहे.

२४) निर्मनुष्य अरण्यात जाऊन हात वर करून उच्चस्वराने म्हणावे- हे पितरांनो, मी निर्धन व अन्नरहित आहे. मला पितृऋणातून मुक्त करा.

२५) दक्षिणेकडे तोंड करून रूदन करावे. या सर्व प्रकारांवरून एक गोष्ट ध्यानात येईल की, प्रतिवर्षी येणा-या श्राद्धदिनी व पितृपक्षात पितरांना उद्देशून काही तरी केल्याशिवाय राहू नये, असे शास्त्रकारांचे म्हणणे आहे. सध्या साधारणत: लोकांत सपिंडक श्राद्ध, ब्रह्मार्पण, हिरण्यश्राद्ध किंवा आमश्राद्ध करण्याची प्रथा आहे. इतरही आचारांचा प्रचार क्वचितस्थळी सुरू आहे.

- संकलन : सुमंत अयाचित

 


Web Title: pitru paksha 2019 importance significance shradh rituals
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.