भक्तीचा मार्ग...मनाला प्रसन्न, सुख आणि समाधान देखील देणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:44 IST2019-01-05T17:33:19+5:302019-01-05T17:44:49+5:30
प्राचीन धर्मग्रंथात धर्म शब्दाच्या ज्या काही व्याख्या व स्पष्टीकरणे आढळतात त्यावरून त्याचा संबंध कर्तव्याशी निगडीत दिसून येतो. धर्म म्हणजे ...

भक्तीचा मार्ग...मनाला प्रसन्न, सुख आणि समाधान देखील देणारा
प्राचीन धर्मग्रंथात धर्म शब्दाच्या ज्या काही व्याख्या व स्पष्टीकरणे आढळतात त्यावरून त्याचा संबंध कर्तव्याशी निगडीत दिसून येतो. धर्म म्हणजे एखादी ठराविक उपासना पद्धती नव्हे तर उत्कृष्ट समाजाच्या धारणेसाठी जे काही आवश्यक कर्तव्य मनुष्याला करावे लागतात, त्यांनाच धर्म म्हटल्या गेले आहे. अध्यात्म तत्त्वज्ञानाचे व्यावहारिक व सामाजिक स्वरूप म्हणजे धर्म होय.
मनुष्याकडे सर्वात मुख्य आणि महत्वाचे जे काही असेल ते म्हणजे त्याचे मन आणि ते जर प्रसन्न असेल, आनंदित असेल तर मग तेच सर्व सिद्धीचे कारण देखील ठरते़ त्याच्या अवस्थेवरूनच मग आपण या संसाराच्या बंधनात अडकतो किंवा मोक्षाला जातो, म्हणून ते नेहमी व सदैव कसे प्रसन्न राहील ते पहावे असे धर्मग्रंथात सांगितले आहे. धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे चांगल्या आणि योग्य गोष्टी देऊ करून त्याचा व्यवस्थित सांभाळ करावा कारण शेवटी तेच तुमच्या सर्व इच्छा पुरविणार असून तेच तुम्हाला सुख आणि समाधान देखील देणारे आहे.
आपले मन ज्यावर जडते मग त्याचीच प्रतिमा ते आपल्या मनात तयार करते, मग मनानेच आपण आपल्या मनाची पूजा करतो आणि मग हे मनच आपल्या सर्व इच्छा-आकांशा पुरविते आणि असे हे सर्व लाड पुरवणारे मनचं आपली मग माउली होते. मनच मग प्रसंगी आपले गुरु होते किंवा आपणच शिष्य होते आणि एकदा का हे आपल्या ताब्यात आले की मग हेच आपले दास्य देखील करते आणि ज्या व्यक्तीने जसा स्वत:च्या मनाचा सांभाळ केला असेल किंबहुना जसे ते एखाद्यावर प्रसन्न असेल तसे ते त्या त्या व्यक्तीला मग गती किंवा अधोगतीला घेऊन जाते.
समाजातील सर्वच वाचक, पंडित आणि साधक तसेच वक्ते आणि श्रोतेजन तुम्ही सुद्धा हेच लक्षात घ्या की आपल्या मनासारखे दुसरे दैवत आपल्याला शोधूनही सापडणार नाही कारण आपले मनच आपल्याला नेहमी दिशा दाखवते म्हणूनच ते निरोगी व प्रसन्न ठेवणे हे आपले मुख्य कर्तव्य आहे.
- ह.भ.प महादेव वाघमारे,
कुमठे, ता़ उ़ सोलापूर.