- बा.भो. शास्त्रीश्रीचक्रधर मराठीतून उपदेश देत, सारगर्भ छोटे-छोटे वाक्य ते सांगत, त्याला ‘सूत्र’ असे म्हणतात़ त्यातलेच हे एक सुंद सूत्र आहे.‘स्नेहाचा ठाई उचित स्फुरे’मानवी हृदयात अनेक कप्पे असतात़ त्यात एक स्नेहाचा कप्पा आहे, तो स्वामींनी उघडला, ज्यातून स्नेह पाझरते. देहबोलीतून बाहेर येत़ उचित अनुचितांचे तरंग मनात उठतात व वाचेतून शीतोष्ण शब्द बाहेर पडावे, तसे हे स्फुरण़ बरं वाईट घेऊन बाहेर येते़ अनुचित असुरी तर उचित दैवी गुणाचे लक्षण आहे़ असुर नाश, तर दैवी निर्माण करते.अजिंठा वेरूळची सुंदर शिल्प ही दैवी देणे व त्याच शिल्पाला भग्न करणे हे असुरपण़ आपल्याला साई व्हायचे की कसाई, हे स्वत: ठरवावे़ यातले आपले कोण? उचित की अनुचित, ज्याचे चिंतन खराब आहे, तो वाईट करतो़ ज्याचे चिंतन चांगले आहे, तो चांगले करतो़ आपले भावविश्व जसे आहे, तसेच आपण वागतो़ मन विटले, माणसे तुटली, माणूस वर गेला व मानवता खाली आली़ अशा वेळी जगातले अनुचित कमी करावे, उचित वाढावे, म्हणून स्वामींनी ‘स्नेहाचाठाई उचित स्फुरे’ असे एक गोड सूत्र सांगितले आहे़ जिथे पाणी तिथे हिरवळ व प्रसन्नता असते़ हिरवळीत गती व विकास असतो़ हेच जिवंतपणाचे लक्षण आहे़ वाळवंटात गरम हवा असते़ तिथे सगळे मृत असते़ स्नेह ओले आहे़ तिथे बाग आहे़ तीळगुळ घ्या गोडगोड बोला, का? गुळात गोडवा तर तिळात तेल आहे़ स्नेहाविना गोडवा फसवा आहे़ स्नेहाची ओळख करून देताना स्वामी म्हणाले, ‘मातेचे स्नेह ते नैसर्गिक.’ इथे आईचा दाखला दिला़ मैत्रीला समान गुण हवेत़ लग्नाला वय हवे़ सगळे हेतुशी बांधलेले आहे़ आईला बाळ पोटात आल्याची चाहूल लागताच, तिच्या स्नेहाला पाझर फुटतो़ ते काळे की गोरे, वजन किती? स्वभाव कसा? कुठलेच गणित ती मांडत नाही़ स्नेह अगणित असते. ते अमूर्त आहे़ ते शब्दात मिसळले की, शब्दांना सुगंध येतो़ स्नेह डोळ्यातून पाझरते़ स्पर्शातून संचारते व जिभेतून मधासारखे टपकते.संत ज्ञानेश्वर म्हणतात-पुढा स्नेह पाझरे। मागा चालती अक्षरे शब्दपाठी अवतरे। कृपाआधी, स्नेह जिवाला ओलावा देते, ते प्रीतीचा पूर्वार्ध व भक्तीचा आरंभ आहे़ तेच धर्माचा आत्मा़ ते वजा करा, धर्म निर्जीव होतो़ जीवन रूक्ष होते, स्नेहाने क्रोध जातो़ कामच निष्काम व राग अनुराग होतो़ मग वासनाच उपासना होते.
स्नेहाचा ठाई उचित स्फुरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 05:43 IST