नवी पुस्तकं, किलोच्या भावात की किलोच्या दरात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 19:05 IST2020-01-29T19:05:24+5:302020-01-29T19:05:36+5:30
परवा एक पुस्तकांचं प्रदर्शन चालू होतं. तसं ते दरवर्षी भरतं; पण यावर्षी एक महत्त्वाचा बदल होता.

नवी पुस्तकं, किलोच्या भावात की किलोच्या दरात ?
- रमेश सप्रे
परवा एक पुस्तकांचं प्रदर्शन चालू होतं. तसं ते दरवर्षी भरतं; पण यावर्षी एक महत्त्वाचा बदल होता. नवी पुस्तकं किलोच्या भावात मिळत होती. म्हणजे तसे फलकच होते प्रदर्शनाच्या तीन दालनांवर. ‘पुस्तकं रु. ३०० प्रतिकिलो’ पुस्तकं, रु. २०० किलो’ ‘पुस्तकं पन्नास टक्के सवलतीत’ विशेष म्हणजे ही सारी पुस्तकं नवी कोरीकरकरीत होती. हे पाहून दोन ज्येष्ठ नागरिकांतील संवाद-
श्यामराव : आता नवीन पुस्तकं सुद्धा रद्दीसारखी किलोच्या भावात मिळू लागली ना?
रामराव : खरंय; पण किलोच्या भावात म्हणण्यापेक्षा किलोच्या दरात असं म्हणणं अधिक योग्य होईल, नाही का?
श्यामराव : असं का म्हणता? काय फरक आहे भाव आणि दरात?
रामराव : अर्थातच आहे, ‘दर’ हा शब्द उघड उघड बाजारी, व्यापारी आहे. भाव म्हटलं की भक्तिभाव किंवा भावना आठवतात. यावर रामरावांनी एक सत्यकथा सांगितली. सारेजण रामरावांना गोष्टींचं ‘स्टॉक एक्सचेंज’ म्हणत. कारण त्यांच्याकडे कथा, किस्से यांचा मोठा साठा (स्टॉक) होता नि त्या दुस-यांना आवर्जून सांगणं (एक्सचेंज) हा त्यांचा छंद होता. असो. त्यांनी सांगितलेली गोष्टी अशी, एक अत्यंत श्रीमंत कुटुंब. त्यातील सर्व लहान मोठी मंडळी आर्त दत्तभक्त होती. त्यांच्याकडे देवघरात अस्सल सोन्याचा श्रीदत्त दरबार होता. म्हणजे श्री दत्त, त्यांच्यामागे उभी असलेली गाय आणि समोर असलेली चार वेदांचं प्रतीक असलेली चार कुत्रीं होती. सा-या मूर्ती भरीव सोन्याच्या होत्या. पोकळ नव्हत्या. कारण सर्वाची श्रद्धाच होती की हे सारं वैभव दत्तकृपेमुळेच लाभलंय.
नंतर अनेक धनवान कुटुंबांत होतं तसंच इथंही झालं. आजोबांच्या पिढीनं कष्टानं मिळवलेली संपत्ती नातवंडांनी उधळायला सुरुवात केली. सा-या प्रकारच्या व्यसनांच्या आहारी घरातली तरुण मंडळी गेली. इतकी की सारं ऐश्वर्य संपून, सर्व चीजवस्तू विकल्यावर आता दत्त, गाय, कुत्रीं यांच्या सुवर्णमूर्ती विक्रीला सोनाराकडे नेल्या. सोन्याचा कस तपासून झाल्यावर खरेदीचा दर ठरला. सोनारानं सा-या मूर्ती तराजूच्या एकाच पारडय़ात वजन करण्यासाठी टाकल्यावर ते उधळे भाऊ एकदम म्हणाले, असं कसं? जो भाव कुत्र्यांना, गाईला तोच भाव दत्तमूर्तीला? यावर हसत तो सराफ म्हणाला, ‘अर्थातच’ सा-या मूर्तीचं एकत्र वजन करताना आमचा फक्त बाजारभाव’ असतो. तुमच्यासारखा ‘भक्तिभाव’ नसतो. हे ऐकून सा-या भावांचे डोळे उघडले. त्यांनी दत्त दरबार परत घरी आणला. पुन्हा त्यांची प्राणप्रतिष्ठा केली. सारी व्यसनं सोडण्याची शपथ घेतली. त्याप्रमाणे वागून पुन्हा आपला संसार नि व्यवसाय बहरास आणला. हे सारं झालं दोन शब्दांमुळे ‘बाजारभाव’ नि ‘भक्तिभाव’. दोन व्यक्तींनी याच पुस्तक प्रदर्शनातून पुस्तकं घेतली मात्र उत्साहात. पण घरी आल्यावर विचार करताना मात्र आपलं काहीतरी चुकलं या विचारानं ते दु:खी झाले. कारण दोघंही चांगले वाचक होते. दोघांचेही पुस्तकांवर मनापासून प्रेम होतं. व्यापारी जरी नवी पुस्तकं किलोच्या दरानं वजनावर विकत देत होते तरी आपण ती वजनावर घ्यायला नको होती, ही रुखरुख त्यांना स्वस्थ बसू देईना. गुरूस्थानी असलेल्या एका व्यक्तीला यासंबंधी विचारल्यावर त्यांना सुचवलं गेलं की असं वाईट वाटणं हे संवेदनाक्षम जिवंत वाचकाचं लक्षण आहे. त्यामुळे त्यांनी वजनावर घेतलेली पुस्तकं परत करून सवलतीत विकली जाणारी दुसरी पुस्तकं घेतली. तसं केल्यावरच दोघे शांत झाले.
खरंच आहे, पुस्तकातून मिळणारं ज्ञान, मार्गदर्शन अमूल्य असतं. त्याचं मोल कसं ठरवता येईल? गीता-बायबल, संतांचे वाङ्मय जीवनाची दिशा बदलणारं असतं. सैतानाचा साधू बनवणारं असतं. ते असं रद्दीसारखं वजनावर घेणं त्यांचा अपपान नाही का? अर्थात असा सहृदय दृष्टिकोन असलेली मंडळी अस्तंगत होत चालली आहे.
याच संदर्भात आणखी एक व्यथित करणारी गोष्ट आहे. काही वर्षापूर्वी कोलकाता, चेन्नई, पुणे अशा शहरांची ओळख ग्रंथांची नि ग्रंथालयांची शहरं अशी करून दिली जात असे. आज दुर्दैवानं परिस्थिती इतकी बदललीय की अनेक ग्रंथालयांच्या ठिकाणी मद्यालयं निघालीयत. मुंबईच्या एका सांस्कृतिक उपनगरात असलेल्या बेचाळीस खासगी वाचनालयांमधली फक्त दोन जिवंत आहेत. तीसुद्धा मृत्यूपंथाला लागलीयत. काहींनी पुस्तकांच्या ठिकाणी सीडी ठेवून त्या पुस्तकांसारख्या भाडय़ाने देऊन जगण्याची केविलवाणी धडपड केली पण सारं हातातल्या मोबाइलवरच मिळू लागल्यामुळे ती धडपडही अयशस्वी ठरली.
याला ‘कालाय तस्मै नम:’ असं हताशपणे म्हणायचं की ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’ असं म्हणून स्वत:चं समाधान करून घ्यायचं. हे ज्याचं त्यानं ठरवावं. त्यापेक्षा ‘गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्रीगुरवेनम:’ या गुरुवंदनेच्या श्लोकात ‘गुरु’ शब्दाऐवजी ‘ग्रंथ’ शब्द घालून तसं जगण्याचा संकल्प करणं चांगलं नाही का?