आत्माग्नीमधील सात आहुतींद्वारे मनुष्य शुद्ध, पवित्र आणि पौष्टिक होतो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 07:55 AM2019-11-18T07:55:29+5:302019-11-18T07:56:20+5:30

जीवनात प्रत्येक व्यक्ती प्रतिष्ठेसाठी जगत असते. प्रतिष्ठेची कामना करते.

Man is pure, holy, and nourished by the seven offerings of atmagni | आत्माग्नीमधील सात आहुतींद्वारे मनुष्य शुद्ध, पवित्र आणि पौष्टिक होतो

आत्माग्नीमधील सात आहुतींद्वारे मनुष्य शुद्ध, पवित्र आणि पौष्टिक होतो

Next

-डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

जीवनात प्रत्येक व्यक्ती प्रतिष्ठेसाठी जगत असते. प्रतिष्ठेची कामना करते. सर्वजण प्रतिष्ठित होऊ इच्छितात; परंतु प्रतिष्ठेसाठी काय करावे लागते याची सर्वांनाच जाणीव असते की नाही हे सांगता येत नाही. जीवन हासुद्धा एक यज्ञ आहे. त्यामध्ये आत्माग्नी प्रस्थापित आहे. यामध्ये दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक मुख या त्या आत्माग्नीमध्ये आहुती देणाऱ्या आहेत. डोळे हे दर्शन घडवू शकतात. कान ऐकू शकतात. नाकपुड्या प्राणवायू खेचतात व सोडतात. मुख जल, अन्नाची आहुती देतात. या सातही अवयवांद्वारे आत्माग्नीमध्ये आहुती टाकल्या जातात. या सात आहुतींद्वारे मनुष्य शुद्ध, पवित्र आणि पौष्टिक होतो. जेव्हा पौष्टिक होतो तेव्हा दुर्गुण त्यागून वृत्ती निष्कपट बनते. मन प्रसन्न राहते. ज्ञान-विज्ञान-शुद्धता, पवित्रता, विद्या, भक्ती-श्रद्धा इत्यादी चांगल्या गुणांचा स्वीकार करते. मग हे गुण अंगी आले की व्यक्ती प्रतिष्ठित होतो. प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्याची समाजात गणना होते. त्याच्या मनातून तो मल-विक्षेप-आवरण या दोषांना घालवतो. त्याच्यात तो बदल करतो. तप व तेजाची स्थापना तो आपल्या मनात धारण करतो. शुद्ध, पवित्र जीवन जगतो. परोपकारी बनतो. जीवनात संकटरूपी वादळे अनेक आली तरी त्याला साहसी वृत्तीने सामोरे जातो. आपल्या सद्गुणी वृत्तीमुळे अनेक विकारांवर विजय मिळवतो. अज्ञानी वृत्तीला नष्ट करतो. आपले जीवन यशस्वी करतो आणि समाज, देश, राष्ट्र, परिवार, संस्था इत्यादींमध्ये मानाचे स्थान मिळवतो. तो अखंडपणे आपल्या कार्यात मग्न राहतो. सतर्कता त्याची मूळ वृत्ती बनते. संसाररूपी घटनाचक्राचा नेहमी वेध घेतो. निरंतर तो आपल्या कर्तव्यपरायणतेत मग्न असतो. तो सतत निर्विषय व निर्विकार होऊन साधना करतो. त्या प्रतिष्ठित व्यक्तींची महानता त्यातच गुपित असते. मानवी जीवनात तो उच्चतम साधनेपर्यंत पोहोचतो. त्याची कीर्ती वा-यासोबत चालते. तो आपल्या कर्तृत्वाने संसाररूपी जीवनात कीर्तीरुपी सुगंध पसरवितो. मनात मोठी महत्त्वाकांक्षा ठेवून काम करतो. कारण महत्त्वाकांक्षा हीच त्याच्या महानतेची सृजनशक्ती असते. म्हणून प्रतिष्ठित बना. सुसंस्कारी व्हा व जीवनाचा आनंद घ्या, मग मन प्रसन्न होईल.
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: Man is pure, holy, and nourished by the seven offerings of atmagni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.