आनंद तरंग: संबंधांमध्ये गोडवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 06:03 IST2020-03-14T06:02:56+5:302020-03-14T06:03:20+5:30
ज्यांच्याबरोबर रक्ताची नाती आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही आणि ज्यांना ओळखत नाही त्यांच्यासाठी वेळ काढला जातो हे विचित्र वाटत नाही का ?

आनंद तरंग: संबंधांमध्ये गोडवा
निता ब्रह्माकुमारी
घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे मनुष्य जीवन इतके वेगवान झाले आहे की, स्वत:ला थोडं थांबून बघायचीही सवड नाही. सकाळी उठल्यापासून एका मागोमाग एक कार्य चालूच राहते. म्हणून म्हटले जाते ‘जीवन एक रहाटगाडगे’, पण सर्व करत असताना जसं आज काही गोष्टींना आपण जपतो, तसेच संबंधांनाही जपावे. कारण त्यांच्याशिवाय जीवनामध्ये आनंद कुठला? मनुष्य एक सामाजिक प्राणी मानला जातो. लोकांमध्ये राहणारा. आज कधी काही कारणास्तव एकटं राहण्याची वेळ आली, तर तो एकटेपणासुद्धा खायला उठतो. म्हणूनच प्रत्येक संबंधांची कदर करावी. कोणास ठाऊक कधी आपल्याला कोणाचा आधार मिळेल. या आधुनिक युगामध्ये आपण इतके मटेरियलिस्टिक झालो आहोत की, प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, जे हवे ते मिळविण्याची सवय लावली आहे, पण संबंधांमध्ये ते प्रत्येक वेळी होऊ शकत नाही, मनुष्याला मशीन समजून त्याच्याशीही तसेच वागण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळेच आज संबंध बिघडताना दिसतात. ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ मकरसंक्रांतीच्या या सणाने वर्षाची सुरुवात होते, पण ते गोड बोलणे त्या दिवशीसुद्धा आपल्याला किती जमते, हा विचार करण्याचा विषय आहे. कारण संबंधांमध्ये बोलण्यानेच जास्त समस्या उद्भवतात. या तर आपण खूप बोलतो किंवा बोलतच नाही. संबंधांमध्ये गोडवा जपायचा असेल, तर थोडसं समोरच्याला समजण्यासाठी आणि स्वत:च्या रागाचा उद्रेक थांबविण्यासाठी वेळ द्यावा. मनुष्याकडे खूप काही आहे, पण वेळ नाही. संबंधांना टिकविण्यासाठी वेळ देणे हेच महत्त्वाचे आहे. आज संबंध कोणताही असो, पण आपण म्हणतो ‘वेळ कुठे आहे?’ पालकांना मुलांसाठी, पतीला पत्नीसाठी, मुलांना म्हाताऱ्या आई-वडिलांसाठी वेळ नाही. प्रत्येक घरामध्ये आजकाल एक दृश्य सगळीकडे दिसून येते, ते म्हणजे प्रत्येक जण आपापल्या दुनियेमध्ये मस्त आहे. घरात प्रत्येकाच्या हातात मोबाइल दिसून येतो. (क्रमश:)
आणि त्याद्वारे आपण ज्यांना कधी बघितले नाही, ओळखत सुद्धा नाही अशा अपरिचित लोकांबरोबर कित्येक तास चॅट करण्यामध्ये वेळ घालवतो त्याचे भान ही नाही. ज्यांच्याबरोबर रक्ताची नाती आहेत त्यांच्यासाठी वेळ नाही आणि ज्यांना ओळखत नाही त्यांच्यासाठी वेळ काढला जातो हे विचित्र वाटत नाही का ? संबंध आणि भावना यांचे खुप जवळचे नाते आहे. ज्या संबंधांमध्ये प्रेमाची भावना आहे तिथे वेळ निघतोच पण जिथे कोणती ही भावना नाही तिथे वेळकाढण्याची इच्छा सुद्धा होत नाही. संबंधांमध्ये विश्वास, समजूतदारपणा, काळजी या सर्वांचीच गरज आहे आणि त्याच् बरोबर कोणताही संबंध एकतर्फी असून चालत नाही. दोन्ही व्यक्तीमध्ये त्या नात्याला सांभाळायची समज हवी. नाहीतर त्या नात्यांमध्ये फक्त तडजोडच दिसून येते. दुसरी गोष्ट अशी की आज संबंध हा वादाचा मुद्दा झाला आहे कारण त्यामध्ये संवाद नाही परंतु फक्त वाद दिसून येतो. ‘हम किसी से कम नही’जर संबंधांमध्ये होत असेल तर हीच नाती युद्ध भूमि बनून जाते. संबंधांमध्ये सुमधुरता आणायची असेल तर कधी-कधी आपण हार पत्करावी. हार मानली म्हणून आपण हरलो असे मुळीच नाही पण वादाला संपवण्याची ही एक पद्धत. ही जर आपण शिकलो तर नक्कीच आपण संबंध टिकवण्यामध्ये जिंकू शकतो. कोणी किती ही धनवान असला तरी मायेचा हाथ फिरवणारा, पाठीवर शाबासकीची थाप देणारा, दु:खी झाले तर प्रेमाची कुशी देणारी व्यक्ती जवळ असेल तर खूप काही आपल्याजवळ असल्याचे समाधान मिळते. आज एकटेपणा ही खूप मोठी खंत आहे. जीवनामध्ये यशस्वी खरंतर त्याला म्हणू ज्याच्या जीवनामध्ये प्रेमळ माणसांची रेलचेल आहे. धन, पद या सर्व गोष्टींनी आयुष्यामध्ये सुख-सुविधा, आराम मिळवू शकतो पण प्रेम हे विकत घेऊ शकत नाही.
आधुनिक यंत्रांच्या गर्दी मध्ये संबंधांची किंमत आपण कमी केली आहे. आज घरातली एखादी वस्तू कोणाच्या हातातून निसटली आणि तुटली तर त्या वस्तूच्या तुटण्याचे दु:ख जास्त होते. त्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीला रागाच्या भरामध्ये खूप काही बोलून जातो पण व्यक्तीबरोबरचे नाते किती महत्वाचे हे विसरतो. या छोट्याशा आयुष्यात जी नाती मिळाली, त्याचा जो सहवास मिळाला, काही कडू-गोड आठवणी मनात बसवल्या असतील तर त्याचा आनंद घ्या. आपल्या कोणालाच पुढे काय होणार हे ही माहीत नाही. जीवनाचा कधी टर्निंग पॉर्इंट येईल हेही माहित नाही. प्रत्येक व्यक्ती ज्या नात्या-संबंधांनी आपल्या जीवनात आहे त्याचा सहर्ष स्वीकार करा कारण तेच तुमच्यासाठी बेस्ट आहेत. दुसºयाच्या जागी आपण किंवा आपल्या जागी दुसरा कोणी फीट होऊ शकत नाही. जे काही आपल्या आयुष्यात होत आहे ते बिल्कुल उत्तम आहे. एखादी परिस्थिती आली तर प्रत्येक वेळी स्वत:लाच विचारा की व्यक्ती महत्वाची की परिस्थिति ? कोणाला महत्व द्यायचे आहे ते ठरवा. कारण ज्याला महत्व द्याल त्याला जपण्याचा सांभाळण्याचा प्रयत्न करायची शक्ती येईल. परिस्थितीला महत्व दिले तर त्याला पकडून ठेवाल आणि जर व्यक्तीला महत्व दिले तर व्यक्तीला पकडून राहू. जीवनात सुखी किंवा दु:खी होण्याचे छोटे-छोटे नियम अनुभवले, समजले तर जगणे सहज होऊ लागेल. संबंधांमध्ये गोडवा असेल तर रोज सण आणि उत्सव नाहीतर आयुष्यामध्ये विरहाचे दु:खच अनुभवायला मिळेल म्हणून नात्यांना जपा.