आनंद तरंग - जय जय गणराया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 06:37 IST2019-09-05T06:37:02+5:302019-09-05T06:37:12+5:30
श्रीगजानना, तुम्ही ज्ञानमय आहात. तुम्ही ओम्कार आहात.

आनंद तरंग - जय जय गणराया
शैलजा शेवडे
जय देव जय देव जय जय गणराया, जय जय गणराया
द्यावी बुद्धी निर्मल, आम्हां तुम्हांस वर्णाया।
मंगलमय, अतिसुंदर, गजमुख तव मूर्ती,
सुखकारक, दु:खहारक, ऐसी जगी कीर्ती,
प्रथम तुम्हां वंदुनी मग कार्या लागावे,
सिद्धीस नेण्या, श्री समर्थ असतां, आम्ही का भ्यावे?
जय देव जय देव जय जय गणराया, जय जय गणराया
द्यावी बुद्धी निर्मल, आम्हां तुम्हांस वर्णाया।
नाभिशेषा नित्या, नरकुंजररूपा,
हेरंबा, स्वानंदा, ओम्कारस्वरूपा,
चरणी मन स्थिर व्हावे, लाभो अशी युक्ती,
गणपती देवा द्यावी, अखंडिता भक्ती
जय देव जय देव, जय जय गणराया, जय जय गणराया,
द्यावी बुद्धी निर्मल, आम्हां, तुम्हांस वर्णाया।
श्रीगजानना, तुम्ही ज्ञानमय आहात. तुम्ही ओम्कार आहात. ओम हा केवळ अ, उ, म ने बनलेला नाही. अ म्हणजे उत्पत्ती. उ म्हणजे पालन, म म्हणजे विनाश. ही तीन अक्षरे सगुण ब्रह्माचे द्योतक आहेत. तर त्यावरील अर्धचंद्र रेखा ही सगुण, निर्गुण यामधील विभाजक सीमा आहे आणि त्यावरील बिंदू निर्गुण ब्रह्माचे द्योतक आहे. परत आपल्या मनात शंका येते, जर का ब्रह्म निर्गुण निराकार आहे, तर त्याला बिंदूचा आकार कशाला? तर भौमितिक भाषेत बिंदू. म्हणजे त्याला अस्तित्व तर आहे. पण लांबी, रुंदी, उंची नाही. आकारमान नाही. म्हणजे त्याला भौतिक साधनांनी मोजता येत नाही. उत्पत्ती, स्थिती, लय, सगुण निर्गुणाला विभागणारी रेखा, बिंदू स्वरूपात असणारे ब्रह्म. शिवाय नाद. सर्व मिळून ओम्कार आणि हे त्या गणेशाचे रूप! तत्त्वमसि... अखिल चराचर व्यापून टाकणारे ब्रह्मस्वरूप तत्त्व. तुम्हीच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्त्व. तुम्हीच सृष्टीचा निर्माणकर्ता, धारणकर्ता आणि संहारकर्ता तसेच सकलव्यापक ब्रह्म. गणेशदेवा, तुम्हाला परतपरत वंदन..!