सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २४, आजार असतो एकाला व बेजार होतात सगळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 07:00 IST2017-08-30T07:00:00+5:302017-08-30T07:00:00+5:30
विज्ञानाचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे तरीही अध्यात्माच्या नावाखाली, परमार्थाच्या नावाखाली लोक विज्ञानाकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्म एके अध्यात्म, परमार्थ एके परमार्थ हे जीवनविद्येला मुळीच मान्यच नाही.

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २४, आजार असतो एकाला व बेजार होतात सगळे
- सदगुरू श्री वामनराव पै
विज्ञानाचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे तरीही अध्यात्माच्या नावाखाली, परमार्थाच्या नावाखाली लोक विज्ञानाकडे दुर्लक्ष करतात. अध्यात्म एके अध्यात्म, परमार्थ एके परमार्थ हे जीवनविद्येला मुळीच मान्यच नाही. जीवनविद्या असे सांगते माणसाच्या ठिकाणी जी बुध्दी आहे तिची शक्तीही इतकी प्रचंड आहे की त्या बुध्दीच्या शक्तीची माणसाला कल्पनाच नाही हे आणखी एक आर्श्चय आहे. गंमत अशी की माणसाच्या ठिकाणी असलेली ही बुध्दी किती आहे याची माणसालाच कल्पना नाही. सायन्स असे सांगते की माणूस त्याच्या ठिकाणी असलेल्या बुध्दीचा वापर अर्धा टक्का सुध्दा करत नाही. अत्यंत बुध्दीमान माणसे जसे की आईनस्टाईन,न्यूटन, आपल्या देशातील लोकमान्य टिळक हे केवढे मोठे व्यक्तिमत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, पूर्वीच्या काळातले शिवाजी महाराज,आर्य चाणक्य हया मंडळींनी सुध्दा आपल्या आयुष्यात बुध्दीचा वापर केला तो केवळ दहा टक्के असे विज्ञान सांगते. जगातला हुशारातला हुशार माणूस सुध्दा मेंदूचा वापर फक्त दहा टक्के करतो आणि सामान्य माणसे आपल्या बुध्दीचा वापर अर्धा टक्का सुद्धा करत नाहीत. म्हणूनच जगात हाफ मॅड लोकांची संख्या जास्त आहे असे म्हणतात ती अगदीच काही अतिशयोक्ती नाही. कारण जीवन जगताना बुध्दीचा वापर करणे ही जी गोष्ट आहे ती लोक खंरतर करतच नाहीत. काही लोकांकडे पाहिले तर यांच्याकडे मेंदू नावाची गोष्ट आहे की नाही असा हा प्रश्न पडतो. जगात दु:ख आहे याचे कारण संसार,बायकामुले नाहीत तर हाफ मॅड म्हणजे अर्धा शहाणा व अर्धा मूर्ख माणूस हेच जगाच्या दु:खाचे कारण आहे. ही हाफ मॅड माणसे पूर्णपणे शहाणी झाल्याशिवाय हे जग सुखी होणे शक्य नाही. हे जग सुखी व्हायला पाहिजे म्हणजे अखिल मानव जात सुखी व्हायला पाहिजे असेल तर केवळ तुम्ही आम्ही सुखी होवून चालणार नाही तर आपण सर्वच सुखी झालो पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देतो की घरातील एक माणूस जर आजारी पडला तर घरातील सर्वच माणसे बेजार होतात. आजार असतो एकाला व बेजार होतात सगळे. असे का होते कारण एकाचे सुखदु:ख हे सर्वांचेच सुखदु:ख असते. जी गोष्ट घराची, तीच गोष्ट समाजाची, तीच गोष्ट राष्ट्राची, तीच गोष्ट विश्वाची म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, “हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहूना चराचर आपणची जाहला” हे विश्व आपले घर आहे.अशी संकल्पना इतर कुठल्या संस्कृतीत, इतर कुठल्या देशात आहे का? आपल्या भारतीय संस्कृतीत मात्र ही सुंदर संकल्पना आहे की हे विश्व आपले घर आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत आपण सर्व बंधू आहोत. ही संकल्पना जर जगात राबवली गेली तर जगात सुखच सुख निर्माण होईल.