सवय.. तुमचा फायदा आणि नुकसान करणारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 01:05 PM2019-07-15T13:05:29+5:302019-07-15T13:05:42+5:30

जेव्हा काही गोष्टी स्वतःच्या आवडीने-इच्छेने ठरवून वारंवार केल्या जातात, तेव्हा त्यांना सवयीचे रूप प्राप्त होते.

Habit .. to your advantage and harm | सवय.. तुमचा फायदा आणि नुकसान करणारी 

सवय.. तुमचा फायदा आणि नुकसान करणारी 

googlenewsNext

- डॉ. दत्ता कोहिनकर- 

निवृत्त पोलिस अधिकारी श्यामजींचा फोन आला होता. त्यांचा मुलगा व सुनबाई त्यांच्या विरोधात पोलिसात जाण्याची त्यांना धमकी देत होते. ती तक्रार ते क्रोधयुक्त अवस्थेत माझ्याकडे करत होते. पूर्ण ऐकून घेतल्यावर भांडणाचे कारण समजले. श्यामजींना पोलिस खात्यात काम करताना कठोर वाणी व अपशब्द (शिव्या) वापरण्याची असलेली सवय हुकूमशाही भांडणास कारणीभूत होती. त्यामुळे घरात वातावरण प्रक्षुब्ध झाले होते. रोज कामावर कित्येक वर्षे तयार झालेला स्वभाव त्यामुळे सहजपणे नकळत शिव्या देण्याची श्यामजींना सवयच लागली होती. सवयी या नकळतपणे-सहजपणे काम करतात. मंदिराच्या बाहेर न विसरता चप्पल काढली जाते. मंदिरासमोर आपोआप नमन केले जाते. जेव्हा काही गोष्टी स्वतःच्या आवडीने-इच्छेने ठरवून वारंवार केल्या जातात, तेव्हा त्यांना सवयीचे रूप प्राप्त होते. सवय हे एक प्रकारचे स्वतःनेच स्वतःला लावून घेतलेले वळण असते. रोज 20 मिनिटे व्यायाम करण्याची सवय तुमचं शरीर तंदूरूस्त करण्यासाठी पुरेशी असते. चांगलं पौष्टिक-आरोग्यदायी खाण्याची सवय तुमचे आयुष्यमान वाढवते. रोज लवकर उठण्याची, वाचन करण्याची सवय तुम्हाला यशाकडे नेते. *सकारात्मक विचार करणं किंवा आपल्याला मिळालेल्या गोष्टींविषयी कृतज्ञता व्यक्त करणं अशा सवयी तुमच्या जीवनावर मोठा प्रभाव पाडतात*. सवयीमुळे कृतींना स्थैर्य प्राप्त होते. सुकरता, सुलभता व सहजता प्राप्त होते. सवयीमुळे गोष्टी अंगवळणी पडतात. गोष्टी अचूकतेने व तत्परतेने उरकता येतात. दुसर्‍या कामात मन गुंतवूनही त्या पार पाडता येतात. सवयीमुळे आपली बरीचशी शक्ती वाचते व अन्य उपक्रमासाठी तिचा वापर करता येतो. डयूक विद्यापीठाने केलेल्या अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला कि आपल्या वर्तणूकीपैकी 45% वर्तणूक ही आपल्या सवयीमधून होत असते. सवय म्हणजे परत परत होणारे वर्तन म्हणजेच वर्तनाची पुनरावृत्ती असते, हीच पुनरावृत्ती जीवनामध्ये दीर्घकालीन फायदा किंवा नुकसान करत असते. उदा. रमेशला मिशीला वारंवार पीळ देण्याची लागलेली सवय त्याला अनेक ठिकाणी अडचणीत आणायची. चार चौघात बोलताना किंवा वरिष्ठांसमोर देखील सहजपणे मनोज मिशीला पीळ देत असे. त्याच्या या सवयीमुळे त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. म्हणून सवयींकडे लक्ष देऊन चांगल्या सवयी टिकवून ठेवल्या पाहिजेत व वाईट सवयी मोडून काढल्या पाहिजेत. सवयी या संगतीने पण लागतात. मित्र जे करतात तेच मुलांना करणे आवडते. वाणीची शुद्धता किंवा अर्वाच्यता ही सहवासातून वाढीस लागते. म्हणून चांगल्या सवयी लागण्यासाठी चांगली संगत आवश्यक असते. वाईट सवयी दूर करण्यासाठी चांगल्या सवयी लावून घ्या. चांगल्या सवयी लावून कशा घ्याव्यात हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, ह्यह्यनिश्‍चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ । वृत्तीत थोडा करार व निर्धार ठेवून हे संकल्पानेच साध्य करता येते.बघू जमतयं का असा डळमळीत भाव अजिबात ठेवू नये. आदर्श वेळापत्रक लगेचच अंमलात आणावे. उदा. पहाटे उठण्याची सवय लावून घ्यायची असेल तर लगेच दुसर्‍या दिवसांपासून त्याची सुरूवात करावी. अपेक्षित सवय वृत्तीत भिनेपर्यंत त्यात खंड पडू नये. सवयी या जीवननौकेचा महत्वपूर्ण आधार आहेत. *तुम्हाला सुख किंवा दुःख तुमच्या सवयीच देत असतात म्हणून चांगल्या सवयी आत्मसात करा व वाईट सवयी सोडून द्या. यासाठी मनाच्या दृढतेने संकल्प करा. गौतम बुध्द यालाच 'सम्यक व्यायाम' असे म्हणतात. चला तर सम्यक व्यायाम करून जीवन आनंदाने जगु या*.🌹🙏
 

Web Title: Habit .. to your advantage and harm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.