आनंदाच्या डोहाचा अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 06:10 PM2019-08-08T18:10:33+5:302019-08-08T18:10:44+5:30

पेडगावकर बुवांना स्वत:ला आनंदाचा अनुभव नव्हता. तुकारामाचा स्वानुभव ते फक्त सांगत होते. गमतीनं म्हणायचं झालं तर ते असं सांगत -गात जास्तीत जास्त आनंदाच्या ‘पेडगावा’ला पोचतील. आनंदाच्या डोहाचा त्यांना अनुभव येणार नाही.

An experience of joy | आनंदाच्या डोहाचा अनुभव 

आनंदाच्या डोहाचा अनुभव 

Next

- रमेश सप्रे

हभप पेडगावकरबुवांचं कीर्तन चालू होतं. तुकारामाचा अभंग निरूपणासाठी घेतला होता. ‘आनंदाचे डोही। आनंद तरंग’. शास्त्रीय गायन शिकल्यामुळे बुवांची तयारी चांगली. अनुप जलेटासारखे विविध राग सांगून त्यात तो अभंग सादर करत होते. श्रोत्यांनाही ते आवडतंय असं वाटल्यावर बुवांची आलापीची उमेद अनेक पटीनं वाढली. सारे श्रोते संगीताच्या लाटांवर हेलकावत होते. काही जाणते श्रोते कुजबुजू लागले ही भजनाची ‘मैफल’ आहे का? सादरीकरण (प्रेझेंटेशन) चांगलं होतंय पण तुकाराम बुवांच्या अभंगात व्यक्त झालेला अनुभवाचा आदर राखला जात नाहीये. तसं पाहायला गेलं तर तुकारामबुवा रोज कीर्तन करणारे बुवा होते. फक्त नावाच्या आधी हभप लावत नव्हते. कारण असं बिरूद किंवा पदवी लावण्याची त्यांना गरज नव्हती. कीर्तन हा त्यांचा व्यवसाय नव्हता तर पांडुरंगाशी जिवंत संवाद नि समोर जमलेल्या भक्तभाविकांशी परिसंवाद साधण्याचं ते एक माध्यम होतं. 

अखेर बुवांचं गायन संपलं नि त्यांनी एक आकशवाणीसारखं विधान केलं. ‘प्रत्येक शिक्षक कीर्तनकार नसला तरी प्रत्येक कीर्तनकार हा शिक्षक असतो. लोकशिक्षक!’ ते ऐकूण सारेजण स्तिमित झाले. त्यांना तो विचार अगदी पटला. नंतर बुवा म्हणाले, ‘शिक्षकाचा, त्याहीपेक्षा शिक्षणाचा-शिकवण्याचा प्राण आहे प्रश्नोत्तरं! तेव्हा मी कथन करताना कोणताही प्रश्न मनात आला तर लाजू नका, कचरू नका. अगदी नि:संकोचपणे विचारा तुमचे प्रश्न’ कसा कुणास ठाऊक पण एका आजोबांबरोबर आलेला त्यांचा आठ दहा वर्षाचा नातू अक्षय एकदम उभा राहिला नि त्यानं एक प्रश्नास्त्र बुवांच्या दिशेनं फेकलं, ‘बाबा.’ पण त्याला पुढे बोलू देण्याआधी कीर्तनकार गरजले, ‘मी बाबा नाही, बुवा आहे बुवा!’ यावर काहीसा कावरा बावरा होऊन अक्षय आजोबांसारखा म्हणाला, ‘बरं बुवा, बाबा नव्हे बुवा! तर बुवा, ‘डोह’ म्हणजे काय हो?’‘अरे, एवढं सुद्धा कळत नाही. डोह म्हणजे डोह आनंदाचा डोह!’ अक्षयला काही कळलं नाही; पण बुवांचा अवतार पाहून मान हलवून खाली बसला. काही श्रोते हसले.

उघड आहे हभप पेडगावकर बुवांना स्वत:ला आनंदाचा अनुभव नव्हता. तुकारामाचा स्वानुभव ते फक्त सांगत होते. गमतीनं म्हणायचं झालं तर ते असं सांगत -गात जास्तीत जास्त आनंदाच्या ‘पेडगावा’ला पोचतील. आनंदाच्या डोहाचा त्यांना अनुभव येणार नाही. आपल्यापैकी अनेकांचं असंच होतं. प्रत्यक्ष अनुभव (आत्मप्रचिती किंवा स्वानुभूती) न घेता आपण इतरांना उपदेश करत असतो. 

एक अत्यंत मार्मिक प्रसंग पाहण्यासारखा आहे. पू. गोंदवलेकर महाराजांच्या एका भक्ताने एक हॉस्पिटल बांधलं. सद्गुरुंचे पाय लागावेत म्हणून श्रीमहाराजांच्या भेटीनं प्रारंभ करावा असा त्याचा विचार होता. त्याच प्रमाणो श्रीमहाराजाचं आगमन झालं. सर्व कर्मचारी वर्ग नवीन होता. त्यांना विशेषत: परिचारिकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक अनुभवी परिचारिका ठेवली होती. त्यांच्यावर श्रीमहाराजांना संपूर्ण इस्पितळ दाखवण्याची जबाबदारी दिली गेली. श्रीमहाराज अनेक गोष्टींबद्दल जिज्ञासेने प्रश्न विचारत होते. त्याच बरोबर त्या  मेट्रन बाईंच्या जीवनाबद्दलही विचारत होते. तिनं सांगितलं की तिला वीस वर्षाचा अनुभव आहे. ती मोठय़ा सरकारी रुग्णालयात कामाला होती. रोज सरासरी दहा प्रसूती तिथं होत असत. त्यातली एक तरी अवघड असे. बाळाला वाचवावं की आईला? असा प्रश्न अनेकदा पडायचा. वैयक्तिक जीवनात मेट्रन बाई अविवाहित होत्या. त्यामुळे मूलबाळ नव्हतंच. इ. इ.

श्रीमहाराज शांतपणो सारं ऐकत होते नि पाहात होते. सारं इस्पितळ पाहून झाल्यावर सर्व कर्मचा-यांना एकत्र करून मुख्य डॉक्टरांनी त्यांना उपदेशपर आशीर्वादात्मक काही सांगावं अशी विनंती केली. यावर श्रीमहाराजांनी जो उपदेश केला त्यात मुख्य भर स्वानुभवावर होता. नंतर कोणाला काही विचारायचं आहे का? असं सांगितल्यावर मेट्रनबाईंनी विचारलं, ‘स्वानुभवाची एवढी काय आवश्यकता आहे?’ यावर श्रीमहाराजांनी काही प्रश्न तिला विचारले, हे प्रश्न हेच तिच्या प्रश्नाला उत्तर असणार होतं.

‘तुमच्या मोठय़ा इस्पितळाला अनुभव  आहे ना? तिथं रोज सरासरी दहा प्रसूती तुमच्या हातून होत होत्या ना? त्यातली एक अत्यंत अवघड असायची. हो ना? आपण हिशेब करूया. रोज दहा म्हणजे महिन्याला तिनशे. आपण हिशेबाला सोपं म्हणून शंभरच धरू या. महिन्याला शंभर म्हणजे वर्षाला बाराशे बाळंतपण हो ना? आपण एक हजारच धरू या. अशी वीस वर्षे म्हणजे वीस हजार. त्यापैकी दहातलं एक म्हणजे दोन हजार अत्यंत अवघड बाळंतपणं तुमच्या हातून झाली ना? यावर मेट्रननं ‘हो!’ म्हणताच श्रीमहाराजांनी तिला विचारलं ‘आता सांगा बाळंत होणं हा अनुभव कसा असतो?’ एकदम मेट्रन उद्गारली ‘ते कसं सांगू’ माझं लग्नच झालेलं नाही. मला स्वत:चा अनुभवच नाही. यावर हसत श्रीमहाराज म्हणाले, ‘मी तरी दुसरं काय म्हणतोय? जीवनात स्वानुभव अत्यंत महत्त्वाचा असतो. परमार्थात, उपासनेत तर अत्यंत आवश्यक असतो. आधीची बाई तुमच्या मदतीनं नंतर आई बनली. म्हणजे तुम्ही हजारेा ‘बाईं’ना आई बनवलं. पण तुम्हाला आई बनणं, आई होणं म्हणजे काय याचा स्वानुभव नाही. हे ऐकून सर्वाना स्वानुभवाचं महत्त्व समजलं. असो. 

्रआनंदाचे डोही, आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे हे नुसतं गायचं नसतं तर तसं जगायचं असतं. जसं तुकोबांसारखं इतर संतसत्पुरूष जगले. त्या शक्तीला समर्पण तिला अनन्यसाधारण शरण नि तिचं अखंड स्मरण ही त्रिसूत्री आनंदाची गुरुकिल्ली आहे. 

Web Title: An experience of joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.