Evergreen Comedy Board | सदाहरित हास्ययोग मंडल
सदाहरित हास्ययोग मंडल

- रमेश सप्रे

सध्या ज्याला ‘लाफ्टर क्लब’ म्हणतात अशाच एका क्लबचं हे अगडबंब नाव. ओळीनं एक हजार दिवस म्हणजे सुमारे तीन वर्षं झाल्यावर सभासदांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. इतर कार्यक्रमांबरोबरच प्रबोधन करण्यासाठी एका नामवंत वक्त्यालाही बोलावलं होतं. ‘लाफ्टर क्लब’चे जवळ जवळ सर्व सदस्य ज्येष्ठ नागरिक म्हणजे निवृत्त झालेले. त्यांच्यापैकी एकानं विचार मांडला की हसण्याचा कार्यक्रम संपल्यावर मैदानावरील हिरवळीवर किंवा गोलाकार मांडलेल्या बाकांवर बसायचं नि रोज एक मनाचा श्लोकवाचायचा. म्हणजे समर्थ रामदासांच्या ‘मनाचे  श्लोक ’ मधला एकेक श्लोक म्हणण्यापेक्षा त्याचा अर्थ नि त्याचं विवरण एकेकानं करावं. प्रत्येकाला हे शक्य नसल्याने ‘मनाचे श्लोक ’ मधील श्लोकांचा अर्थ नि स्पष्टीकरण करणारं एक छान पुस्तक आणलं नि त्याचं वाचन पाळीपाळीनं सुरू झालं. हे झाल्यानंतर कुणा एकाचा वाढदिवस असला तर जवळच्याच हॉटेलमध्ये जाऊन त्याला शुभेच्छा देत पदार्थावर ताव मारायचा. यावेळी अर्थातच पथ्याकडे दुर्लक्ष करायचं. म्हणजे मधुमेह झालेल्या सोनोपंतांनी जिलेबी, गुलाबजामून मजेत खायचे तर उच्च रक्तदाब असलेल्या माधवरावांनी छान तिखट मीठ घातलेले तळलेले पदार्थ खायचे.

एकूण काय तर या मंडळातील सदस्यांनी सरासरी वय सत्तरच्या वर असूनही सारेजण मस्त मजेत असायचे. म्हणूनच नाव दिलं होतं ‘सदाहरीत हास्ययोग मंडल!’

तर आता एक हजार दिवस पूर्ण झाल्याबद्दलचा कार्यक्रम आयोजित केला होता. सारे साहित्य-संगीत-कला-विनोद-विज्ञान या विषयाभोवती गुंफलेले कार्यक्रम. त्यांच्या नेहमीच्या म्हणजे पहाटे साडेपाच ते सकाळी साडेसात याच कालावधीत असणार होते.

तो दिवस होता त्या तरुण तडफदार ओजस्वी वाणी असलेल्या वक्त्याचा. तो होता चाळीशीतला. महिना होता वैशाख. पहिल्याच वाक्यात त्या वक्त्यानं षटकार ठोकला. ‘वैशाख मासातच ज्येष्ठ सुरू झालाय असं तुम्हाला पाहून वाटतंय. तुम्हा ज्येष्ठांना मन:पूर्वक नमस्कार!’

नंतर त्या वक्त्यानं त्या संघटनेच्या नावातील प्रत्येक शब्दात हा एकेक मुद्दा बनवून भाषण सुरू केलं. त्याच्या भाषणाचा वृत्तांत वाचणंही  अंतर्मुख बनवणारं होतं. वक्ता म्हणाला, किती अर्थपूर्ण नाव आहे तुमच्या मंडळाचं. एरवी फक्त ‘लाफ्टर क्लब’ एवढंच म्हटलं जातं. आपल्या मंडलाच्या नावातला प्रत्येक शब्द बोलका आहे. त्याला न्याय मात्र आपणच दिला पाहिजे.

सदाहरित : म्हणजे सदैव हिरवा, तरुण, ताजा, प्रसन्न राहणारा. हे कितीही नि कोणताही व्यायाम केला तरी देहाच्या पातळीवर शक्य आहे का? हिरवी पानं काळाच्या ओघात आज ना उद्या पिवळी पडणारच. म्हणजे प्रकृती सदाहरीत राहणं कठीणच; पण प्रवृत्ती राहू शकते. ज्याची मनोवृत्ती सदैव प्रसन्न, आनंदी आहे, जो विचारानं आशावादी आहे. भविष्यकाळाची भीती न बाळगता नेहमी उज्ज्वल चित्र पाहतो, ज्याची जीवशक्ती क्षीण होऊ लागली तरी जीवनशक्ती उत्साहपूर्ण, ऊर्जा असलेली आहे तोच खरा सदाहरीत. हसण्याचा व्यायाम आणि तोही प्रत्येक दिवसाच्या आरंभी केल्यावर त्या दिवशी तरी मन:प्रसाद म्हणजे मनाची प्रसन्न अवस्था टिकलीच पाहिजे अशी व्यक्तीच सदाहरीत एव्हरग्रीन राहू शकते.

हास्य : एक गोष्ट लक्षात ठेवायची की हास्य म्हणजे स्मितहास्य नेहमी शांत असतं. ते अंत:करणाच्या अगदी आतून सुरू होतं नि चेह-यावर पसरतं. स्माइल म्हणतात अशा हास्याला. याउलट हसणं (लाफ्टर) हे नेहमीच आवाजी, खळखळतं किंवा गडगडाटी असतं. हास्याचे मजले नसतात तरी हसणं सात मजली असू शकतं. पौराणिक मालिकांतील सर्व असुराचं म्हणजे आसुरी वृत्तीच्या दुष्ट माणसांचं हास्य असं विकट असतं. हसण्यासाठी आपण ‘ह’ची बाराखडी वापरतो. ‘ह ह ह ह असं सुरू झालेलं हसणं क्रमाक्रमानं हा हा हा.. ही ही ही.. हू हू हू.. हे हे हे.. हो हो हो.. असं एकेक मजला चढत जातं. हे खरं आहे की अशा हसण्यामुळे फुप्फुसं स्वच्छ होतात. श्वसनाची क्षमता वाढते, छाती-घसा मोकळे होतात. हे खूप चांगलं आहे; पण हे शरीराच्या अंगानं जाणारं आहे. सकाळी तासभर हसण्याचा व्यायाम करणा-या माणसानं दिवसाचे उरलेले तास हसतमुखानं राहायला नको का? हसणं हे संसर्गजन्य असतं, म्हणून ‘हसा नि हसवा’ हे आपलं ब्रीद असायला नको का?

योग : योग म्हणजे दोन गोष्टींना सांधणं, जोडणं. योग हा सेतू असतो. प्रथम आपलंच तन नि मन यांचा योग साधायला हवा. नंतर स्वत:च्या समष्टी (समाज) सृष्टी (निसर्ग) परमेष्टी (सर्व विश्वाचं संचालन करणारी शक्ती) यांच्याशी योग साधायला हवा. तरच योग या शब्दाला न्याय मिळेल. नाही तर योगसाधना म्हणत आपण फक्त आसनांचा अभ्यास करत राहतो.

मंडल : हे शक्ती, ऊर्जा  निर्माण करणारं असतं. एरवी माणसं एकत्र येतात त्याला मंडळ (क्लब) असं म्हणतात. इलेक्ट्रिसिटी बोर्डाला विद्युत मंडळ म्हणतात; पण ज्यावेळी विद्युत मंडळ (सर्किट) पूर्ण होतं त्यावेळी शक्ती निर्माण होते. विद्युत शक्ती! अशी शक्ती केवळ मानसिक नव्हे तर बौद्धिक, भावनिक नि आलिकशक्तीही निर्माण झाली पाहिजे.

तरच नि तेव्हाच न्याय दिला जाईल. आपल्या नावाला ‘सदाहरीत हास्य योग मंडल’ यासाठी तुम्हा मंडळींचा जो ‘मनाचे  श्लोक ’ या छोटय़ाशा रचनेचा जो पठण-श्रवण-चिंतन असा अभ्यास सुरू आहे तो निश्चित उपयोगी पडेल. आपण ज्येष्ठ आहोतच. श्रेष्ठ बनण्याचा संकल्प करू या. सदैव हसत राहूया. हसवत राहू या. त्यासाठी शुभकामना

नि प्रार्थना!
वक्त्यानं हे सहचिंतन संपवल्यावर कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत. सारेजण उभे राहिले. चष्मे काढून डोळ्याच्या पाणावलेल्या कडा पुसत होते. त्यांची अंतर्यात्र सुरू झाली होती. 

Web Title: Evergreen Comedy Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.