सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण - भाग 1
By Admin | Updated: August 12, 2016 14:55 IST2016-08-12T14:48:23+5:302016-08-12T14:55:54+5:30
सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण. हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे. सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की

सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण - भाग 1
>
- सदगुरू श्री वामनराव पै
आपण सर्व सुखी होवूया.
सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण. हा विषय अगदी आगळा व वेगळा असा आहे. सुखी होणे सोपे, दु:खी होणे कठीण हे वाचल्यानंतर माझी खात्री आहे की तुम्हांला असे वाटले असेल की वामनराव कुठेतरी चुकत आहेत. दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण असे म्हणायला पाहिजे होते हयाऐवजी वामनराव चुकीने उलट सांगत आहेत असे तुम्हांला वाटण्याची शक्यता आहे. तुम्हांला असे वाटण्याचे कारण असे की आपण आतापर्यत जे काही वाचत आलो, ऐकत आलो ते असे की सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे. सुख किती? जवाएवढे व दु:ख किती? पर्वताएवढे, पण जीवनविद्या असे सांगते की सुख पर्वताएवढे व दु:ख जवाएवढे असे व्हायला पाहिजे. असे होवू शकते पण त्यासाठी काय केले पाहिजे हे महत्वाचे आहे. दु:ख हे जन्मापासूनच माणसाच्या पाठीमागे लागते असे म्हटले जाते. जन्म दु:खम जरा दु:खम असे कुणीतरी एके ठिकाणी म्हटलेले आहे. जन्माला आल्यापासून दु:ख जे मागे लागते ते अगदी मरेपर्यंत असे म्हणण्याचा हेतू आहे. एके ठिकाणी असेही म्हटलेले आहे की “संसारा मानी जो सुख तो परममुर्ख“. “संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची” असेही म्हटलेले आहे. कुणी काय काय म्हटलेले आहे हयाची मला जाणीव आहे तरीही मी सांगतो सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण. तुम्ही म्हणाल वामनराव आम्ही जे काही आतापर्यंत ऐकले त्याच्या नेमके उलट तुम्ही सांगता हे कसे. आम्ही आतापर्यंत ऐकत आलो की परमेश्वर कॄपा करतो किंवा कोप करतो पण तुम्ही म्हणता परमेश्वर कॄपाही करत नाही व कोपही करत नाही. तुमच्या जीवनविद्येत सगळेच आगळे वेगळे कसे? जीवनविद्येचे तत्वज्ञान खरेच आगळेवेगळे आहे ते तुम्ही समजावून घ्यावे, ते तुम्ही आचरणांत आणावे व तुम्ही सुखी व्हावे किंबहूना तुम्ही आम्ही सगळेच सुखी व्हावेत अशी जीवनविद्येची संकल्पना आहे. जीवनविद्येला असे मनापासून वाटते आपण सर्वांनी सुखी होवूया. काही जण सुखी तर काही जण दु:खी हे काही बरोबर नाही. आपण सर्व सुखी होवूया ही जीवनविद्येची भावना आहे, धारणा आहे. जीवनविद्येची ही धारणा लक्षांत घेवून जर तुम्ही जीवनविद्येचे तत्वज्ञान समजून घेतलेत तर तुम्हांला जीवनविद्येचे महत्व, महात्म्य कळून चुकेल. प्रश्न असा निर्माण होतो की सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण हे तुम्ही सांगता हे कसे काय कारण आमचा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की दु:खी होणे सोपे सुखी होणे कठीण. बरे हा अनुभव आमचाच आहे असा नव्हे तर पुरातन काळापासून तर आजतागायत हाच अनुभव आहे.
क्रमश: