अस्वलासारखे रानावनात भटकून संतपणा मिळत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 06:45 IST2020-01-06T06:45:51+5:302020-01-06T06:45:58+5:30
संत कुणाला म्हणावे? या प्रश्नाचे उत्तर जो-तो आपल्या डोक्याच्या आकाराने देण्याचे काम करतो.

अस्वलासारखे रानावनात भटकून संतपणा मिळत नाही
- प्रा. शिवाजीराव भुकेले
संत कुणाला म्हणावे? या प्रश्नाचे उत्तर जो-तो आपल्या डोक्याच्या आकाराने देण्याचे काम करतो. आज तर जो रुद्राक्षांच्या माळांच्या भाराने वाकला आहे, हातभर दाढी आणि डोईवर केसाचे जंगल पसरले आहे, कधी भगवे, कधी पिवळे, तर कधी निळ्या-हिरव्या कवड्यांनी ज्याने स्वत:स गुंडाळून टाकले आहे; अशा मंडळींस संत मानण्याची खूप मोठी चूक बुद्धिप्रामाण्यवादाचा डंका वाजविणाऱ्या मंडळींकडूनही होते. मुळात संत ही एक आकृती, प्रकृती, विकृती, संप्रदाय, पंथ, जात नाही, तर संत ही एक संस्कृती आहे. संत हा एक विचार आहे. संतपणा जगावा लागतो, दाखवावा लागत नाही. जगाच्या बाजारपेठेत दोन-पाच हजारांत संतपणा विकत मिळत नाही. अस्वलासारखे रानावनात भटकून संतपणा मिळत नाही. उंदीर, घुशीप्रमाणे बिळात राहून संतपणा नाही. ज्याचे वर्णन करताना तुकोबारायही म्हणाले होते...
‘नही संतपणा मिळते हे हाटी, हिंंडता कपाटी रानीवनी ।
नये मोल देता धनाचिया राशी, नाही ते आकाशी पाताळीतो
तुका म्हणे मिळे जीवाचियेसाठी, नाहींतरी गोष्टी बोलू नये ॥’
जगाच्या बाजारात संतत्वाला खरेदी करता येत नाही. कारण विकावू समाजाची निर्मिती करण्यापेक्षा जीवनमूल्यावर टिकाऊ पाईक निर्माण करणे हाच संताच्या जीवित्वाचा उद्देश असतो. दुर्दैवाने आज आपली नेमकी या सत्याच्या उलट दिशेने वाटचाल सुरू आहे. सत्ता, संपत्तीच्या जोरावर आज अनेक दुर्योधन व दु:शासन संत व योग्यांना एका रात्रीत खरेदी करीत आहेत. मेंढरांचा सेनापती एकदा खरेदी केला की बाकी मेंढरे आपोआप त्याच्या पाठीमागे येतात या दाहक सत्याची जाणीव तथाकथित दुर्योधनांना झाल्यामुळे संतत्व हा खरेदी-विक्रीतला वस्तू विनिमत्तातला कोरडा व्यवहार ठरत आहे. संतत्व ही सात्त्विक प्रवृत्तीची फुलबाग आहे. संत म्हणजे सर्वत्र ममता, संत म्हणजे सर्वत्र समता, संत म्हणजे निर्मत्सरता, संत म्हणजे बुडणाºया जीवास वाचविणारा संसार सागरातील नावाडीच होय.