बांधिलकी तुम्हाला सर्व अडचणीतून पार करेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 05:39 IST2019-02-09T05:39:25+5:302019-02-09T05:39:44+5:30
बांधिलकी तुम्हाला सर्व अडचणीतून पार करेल आणि बांधिलकी जेवढी मोठी तेवढे मोठे ध्येय साध्य केले जाईल.

बांधिलकी तुम्हाला सर्व अडचणीतून पार करेल
- श्री श्री रविशंकर
बांधिलकी तुम्हाला सर्व अडचणीतून पार करेल आणि बांधिलकी जेवढी मोठी तेवढे मोठे ध्येय साध्य केले जाईल. बांधिलकी म्हणजे तुमची क्षमता वाढवणे. तुम्ही असे म्हणत नाही की, ‘मी एक ग्लास पाणी पिण्यास बांधील आहे किंवा १ किलोमीटर चालण्यास बांधील आहे.’’ हे तर तुम्ही सहजच करता. यश या विषयावर सगळीकडे खूपच बोलले जाते. प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. यश म्हणजे नक्की काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ते केवळ तुमच्या क्षमतांबद्दल असलेले तुमचे अज्ञान आहे. तुम्ही स्वत:लाच एक मर्यादा घालून घेतली आहे? आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ती स्वत:च घालून घेतलेली मर्यादा पार करता तेव्हा तेव्हा तुम्हाला वाटते की हेच यश आहे. यश म्हणजे तुम्हाला स्वत:च्या सामर्थ्याबद्दल असलेले अज्ञान. कारण तुम्हाला वाटते की तुम्ही इतकेच करू शकता. तुम्ही असे कधी म्हणत नाही की, ‘मी केळे खाण्यात यशस्वी झालो.’’ जेव्हा तुम्ही स्वत:ला मर्यादा घालून घेता तेव्हा तुम्ही स्वत:च्या सामर्थ्यालाच मर्यादा घालत असता. जेव्हा केव्हा तुम्ही काही तरी साध्य करता तेव्हा तुम्हाला अभिमान वाटतो. हो की नाही? खरेतर तुम्हाला त्याचे वाईट वाटले पाहिजे. जे तुम्ही सहज करू शकता त्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटत असतो. कारण तुम्हाला हे माहीत नसते की तुम्हाला ज्या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे त्यापेक्षा तुम्ही खूप काही जास्त करू शकता. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुम्हाला अभिमान वाटतो आणि अपयश आले की तुम्हाला अपराधी आणि अस्वस्थ वाटते. दोन्हीमुळे तुम्ही आनंदापासून आणि तुमच्यात असलेल्या मोठ्या क्षमतेपासून दूर जाता. यश आणि अपयश या दोन्हीत हा समतोल ठेवला तर तुम्ही खरे यश साध्य कराल.