इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 03:40 PM2019-05-07T15:40:35+5:302019-05-07T15:42:02+5:30

रमजान ईद विशेष...!

Belief in God's unity in Islam | इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा

इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा

Next

इस्लाम धर्मामध्ये देवाच्या एकत्वावर श्रद्धा आहे. या धर्माला कोणीही संस्थापक नाही. कारण या धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अधिष्ठानात ईश्वराला खूप महत्त्व आहे. ईश्वराने जगाची निर्मिती केल्यानंतर त्याच्या नियमनाचे तत्त्वज्ञान त्याने अनेक प्रेषितांकरवी मानवी समूहापर्यंत पाठविले. त्या तत्त्वज्ञानाला ईश्वरीय धर्म मानले जाते. ईश्वराने अशा तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अनेक प्रेषितांची मानवी समाजातून निवड केली. त्यापैकी हजरत मुहम्मद (स.) हे एक आहेत.

इस्लामने ईश्वराकडून नियुक्त केलेल्या प्रेषितांची संख्या १ लाख २४ हजार इतकी सांगितली आहे. प्रेषित मोहम्मद (स.) यांच्यापूर्वी ईश्वराने ज्यांना प्रेषित म्हणून निवडले होते, त्यांची नियुक्ती ही त्यांचा देश अथवा समाजापर्यंत मर्यादित होती. ईश्वराने प्रेषित नियुक्त करण्याचा इतिहास पृथ्वीच्या निर्मितीपासून सांगितला जातो. या परंपरेत हजरत आदम (अ.) यांचा प्रथम क्रमांक लागतो तर मोहम्मद (स.) यांचा अखेरचा क्रमांक आहे. ईश्वराने पाठविलेल्या प्रेषितांच्यानंतर त्यांच्या माध्यमातून आलेल्या तत्त्वज्ञानात मानवी समाजाने अनेक बदल करण्यात आले.

कालांतराने काही प्रेषितांच्या समाजातच एकेश्वरवादाला तिलांजली देण्यात आली. त्यामुळे र्ईश्वराने त्याच्याकडून आलेल्या मानवी समाजाच्या हितासाठी असणाºया तत्त्वज्ञानाच्या पुनर्जागरणासाठी प्रेषित मोहम्मद (स.) यांची निवड केली. त्यांनी इ.स. ६१० साली सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात ईश्वरीय धर्म असणाºया इस्लामच्या पुनर्जागरणाची सुरुवात केली. इस्लामच्या अनुयायांना किंवा त्या धर्माचे पालन करणाºया लोकांना मुसलमान म्हटले जाते. प्रत्येक धर्माची काही मूलतत्त्वे असतात. त्याप्रमाणे इस्लामचीदेखील काही मूलतत्त्वे आहेत. इस्लाम धर्माचा अंगीकार करण्यासाठी अल्लाहवर आणि हजरत मोहम्मद (स.) हे अखेरचे प्रेषित असण्यावर श्रध्दा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी कलमा धारण केला पाहिजे.

मुसलमान होण्यासाठी त्याने जो कलमा धारण करावयाचा आहे, त्याचे अरबी शब्द असे आहेत ‘ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल-अल्लाह’ (एकच ईश्वर असून, कोणीही त्यापेक्षा वरचढ नाही. मुहम्मद हे अल्लाहचे शेवटचे प्रेषित आहेत.) इस्लाम स्वीकारणाºया व्यक्तीने इस्लामी तत्त्वज्ञानाच्या संहितेचे पालन करणे महत्त्वाचे आहे. इस्लामी तत्त्वज्ञान कुरआन आणि प्रेषितांच्या वचनातून निर्माण झाले आहे.

हदिस व कुरआन हेच इस्लामी तत्त्वज्ञानाचे मुख्य आणि अंतिम स्त्रोत आहेत. त्यापैकी कुरआन हा ईश्वरी ग्रंथ आहे तर हदिस ही प्रेषितांची वचने आहेत. कुरआनचा लेखक कोणी व्यक्ती नाही तर ते र्ईश्वराकडून अवतरलेले ईश्वरी संदेश आहे. ते अरबी भाषेत अवतरले आहे. कुरआनची रचना इतर ग्रंथांपेक्षा वेगळी आहे. ते काही सूरहमध्ये विभागले आहे. सूरह याचा शब्दश: अर्थ ‘कुंपणाने घेरलेली जागा’असा होतो. कुरआनची रचना एकूण ११४ सूरहमध्ये करण्यात आली आहे. कुरआनच्या सूरहचेदेखील दोन प्रकार आहेत. त्याला मक्की व मदीनी म्हटले जाते. हजरत मोहम्मद (स.) यांच्या मदिनेकडील प्रस्थानाअगोदर अवतीर्ण झालेल्या सूरहना मक्की म्हणजे मक्का येथील वास्तव्यात अवतरलेले सूरह आणि त्यानंतरच्या सूरहना मदीनी असे म्हणतात. कुरआनमधील श्लोकास आयत असे म्हणतात. आयत या शब्दाचा अर्थ चिन्ह असा होतो.
- आसिफ इक्बाल

Web Title: Belief in God's unity in Islam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.