The youthfulness of 'Ludo' | तरुणाई ‘लुडो’च्या जुगारात

ठळक मुद्देआॅनलाईन गेम : अनेकांना जडले व्यसन, आर्थिक फटका बसतोय

अखिलेश अग्रवाल ।
आॅनलाईन लोकमत
पुसद : इंटरनेटचे पॅकेज जसजसे स्वस्त होत गेले, तसतशी तरुणाई आॅनलाईन व्हायला लागली. इंटरनेटच्या फायद्यासोबतच अनेक दुष्परिणामालाही आता सामोरे जावे लागत आहे. अलीकडे अशाच आॅनलाईन गेममध्ये तरुण अडकले असून ‘लुडो’ नावाचा जुगारच तरुणाई मोबाईलवर खेळत आहे. याचे अनेकांना व्यसन लागले असून आर्थिक झळही बसत आहे.
समाजाचे माध्यम असलेला मोबाईल आता गॅझेट झाले आहे. विविध उपयोग मोबाईलचे केले जात आहे. त्यातच इंटरनेटची जोड मिळाल्याने सर्वजण २४ तास आॅनलाईन राहू लागले. फायद्यापेक्षा तोटेच अधिक अशी अवस्था सध्या तरुणाईची झाली आहे. ‘लुडो’ नामक गेमने तर तरुणाईला वेडच लावले आहे. अगदी खेड्यातही ‘लुडो’चे वेड पाहायला मिळत आहे. हा खेळ पूर्वी एक टाईमपास म्हणून खेळला जात होता. आता पैसे लाऊन खेळला जात आहे. शेकडो रुपयांपासून हजारो रुपयांपर्यंत यावर पैसे लावले जातात.
‘लुडोकिंग’ हा जुगार दोन ते चार जण राऊंड पद्धतीने पैशावर खेळतात. हा गेम चंफुलासारखा असून ज्या व्यक्तीच्या चार कवड्या सर्वात लवकर निश्चित केलेल्या घरात जातील तो विजेता ठरतो. यात पहिला विजेत्याला जुगाराची एक तृतियांश रक्कम, दुसºयाला उर्वरित रक्कम दिली जाते. दहा हजारांपर्यंत हा जुगार खेळला जातो. यातूनच आपसात वाद होऊन तरुणाई तणावात दिसत आहे.
पैशाने हा जुगार खेळला जात असल्याने अनेकजण तासन्तास मोबाईलवर दिसून येतात. दारू-तंबाखूच्या व्यसनाप्रमाणेच ‘लुडो’चेही व्यसन लागले आहे. पुसद शहरासह तालुक्यातील गावागावात ‘लुडो’वर जुगार खेळणारे दिसून येतात. प्रा. संजय शेलगावकर म्हणाले, स्मार्ट फोनचा सदुपयोग न होता गैरवापरच अधिक होत आहे. पालकांनी जागरूक राहून मुलांच्या मोबाईलची तपासणी करण्याची गरज असल्याचे सांगितले.

‘लुडो’चा शोध सहाव्या शतकातला
‘लुडो’ हा गेम नवीन नाही. या गेमला हजारो वर्षांची परंपरा आहे. इ.स.च्या सहाव्या शतकात या खेळाचा भारतात शोध लागल्याचे सांगितले जाते. अजिंठा, वेरूळच्या लेण्यातही या खेळाचा पट दगडामध्ये कोरलेला आहे. मुगलांच्या काळात हा गेम ‘पच्चीसी’ या नावाने ओळखला जात होता. एक ते सहा अंक असलेली कवडी आणि तिच्या चालीवर पुढे जाणाºया सोंगट्या, असा हा खेळ आहे.

सतत गेम खेळल्यामुळे मुलांच्या मेंंदूत बदल होतात. त्यामुळे मुले इतर गोष्टींवर, अभ्यासावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. काही वर्षात यालाही आजार म्हणून घोषित करण्यात येईल. हा आजार समूपदेशनाने बरा करता येईल. परंतु उपचारही व्यसनाच्या प्रमाणावर अवलंबून असेल.
-डॉ. नरेंद्र इंगळे,
मनोविकार तज्ज्ञ, पुसद