Yavatmal: पतीच्या विमा दाव्यावर पहिला हक्क पत्नीचाच, ग्राहक आयोगाचा निर्वाळा

By विलास गावंडे | Published: March 22, 2024 10:10 PM2024-03-22T22:10:43+5:302024-03-22T22:11:39+5:30

Yavatmal News: विमा दावा दाखल करताना प्रस्तावात कुटुंबातील इतर कुठल्याही सदस्यांचा समावेश केलेला नाही, असे कारण देत विमा कंपनीने शेतकरी कुटुंबाला भरपाई नाकारली होती.

Yavatmal: Wife's First Claim on Husband's Insurance Claim, Consumer Commission Exemption | Yavatmal: पतीच्या विमा दाव्यावर पहिला हक्क पत्नीचाच, ग्राहक आयोगाचा निर्वाळा

Yavatmal: पतीच्या विमा दाव्यावर पहिला हक्क पत्नीचाच, ग्राहक आयोगाचा निर्वाळा

यवतमाळ - विमा दावा दाखल करताना प्रस्तावात कुटुंबातील इतर कुठल्याही सदस्यांचा समावेश केलेला नाही, असे कारण देत विमा कंपनीने शेतकरी कुटुंबाला भरपाई नाकारली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने विमा दाव्याची रक्कम देताना पहिला हक्क पत्नीचाच असल्याचे नमूद करत कंपनीने तातडीने भरपाई द्यावी, असा आदेश दिला आहे.

पांढरकवडा तालुक्यातील अकोली खुर्द येथील संदीप चंद्रभान बोरवार यांचा खुनी नदीत बुडून मृत्यू झाला. त्यांची पत्नी मीना संदीप बोरवार यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत लाभासाठी पांढरकवडा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. या विभागाने दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीकडे हा प्रस्ताव पाठविला; परंतु या कंपनीने विविध कारणे देत भरपाई नाकारली.

मीना बोरवार यांनी विमा दाव्याचा प्रस्ताव सादर करताना आई, वडील, भाऊ, मुले, मुली आदींची नावे नमूद केलेली नाही. शिवाय, पक्षकार म्हणून समावेश करण्यात आलेला नाही, असे कारण विमा कंपनीने देत भरपाई नाकारली. त्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या प्रकरणात सुनावणी झाली.

विमा दाव्याची रक्कम देताना प्राधान्य शेतकऱ्याच्या पत्नीला दिले जाते. या प्रकरणात मृताच्या पत्नीने दावा दाखल केला असल्याने विमा कंपनीने घेतलेला आक्षेप निरर्थक ठरतो, असे आयोगाने निकालपत्रात नमूद केले आहे. कंपनीने मीना बोरवार यांना विमा दाव्याची रक्कम २ लाख रुपये सव्याज द्यावी, मानसिक व शारीरिक त्रासापोटी तीन हजार रुपये द्यावे, असा आदेश देण्यात आला आहे.

शेतकऱ्याचा मृत्यू त्याच्या चुकीमुळे
शेतकरी संदीप बोरवार यांना फिट येण्याचा आजार होता. त्यांचा मृत्यू स्वत:च्या चुकीमुळे झाला. ही घटना विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीप्रमाणे स्वत:हून ओढवून घेतलेली दुखापत या सदरात मोडते. त्यामुळे विमा प्रस्ताव नाकारण्यात आला. विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास जबाबदार नाही, अशी दुसरी बाजूही कंपनीने आयोगापुढे मांडली होती. परंतु, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये अपघाताच्या वेळी संदीप बोरवार याचा मृत्यू फिट येऊन पाण्यात बुडाला होता, असे कुठेही नमूद नसल्याचे मत आयोगाने नोंदविले आहे.

Web Title: Yavatmal: Wife's First Claim on Husband's Insurance Claim, Consumer Commission Exemption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.