यवतमाळ जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचे संकट गडद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 02:38 PM2018-02-26T14:38:08+5:302018-02-26T14:41:13+5:30

डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण घटत चालले आहे.

Yavatmal district has severe water crisis since February | यवतमाळ जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचे संकट गडद

यवतमाळ जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचे संकट गडद

googlenewsNext
ठळक मुद्देउपाययोजना प्रभावहीन१०१ प्रकल्पात केवळ १८ टक्के जलसाठा

ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगलाने व्यापलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अलिकडच्या काळात पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी दरवर्षी पाणीटंचाईचे संकट उभे राहते. यंदा तर वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाल्याने फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. प्रशासनाच्या उपाययोजना प्रभावहीन ठरत असून गावागावांत पाण्यासाठी हाहाकार उडत आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहरात तर तब्बल १२ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो.
यवतमाळ जिल्ह्यासाठी पाणीटंचाई हा विषय नवीन नाही. उन्हाळा आला की पाणीटंचाई असे समीकरण अलिकडच्या दशकात झाले आहे. यंदा तर वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाला. त्यातही यवतमाळ, कळंब आणि राळेगाव या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या निम्यापेक्षाही कमी पाऊस झाला. जिल्ह्यातील एकाही नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहली नाही. जिल्ह्यातील प्रकल्पातही अत्यल्प साठा आहे. जिल्ह्यातील १०१ प्रकल्पांमध्ये केवळ १८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच काळात या प्रकल्पांमध्ये ५८ टक्के साठा होता. जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पात सध्या १४.३२ टक्के, सात मध्यम प्रकल्पात २६.३३ टक्के आणि ९१ लघु प्रकल्पात २१.८३ टक्के पाणीसाठा आहे. फेब्रुवारी महिन्यातच ही अवस्था आहे तर आगामी चार महिन्यात सर्व प्रकल्प तळाला लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी मोठी नदी पैनगंगा कोरडी पडली आहे. या नदीच्या तीरावरील तब्बल ५० गावांमध्ये पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे. नळयोजनेच्या विहिरी तळाला गेल्याने नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. इसापूर येथील प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडावे, यासाठी नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. वणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवरगाव प्रकल्पाचे पाणी निर्गुडा नदीपात्रात सोडले जात आहे. जिल्ह्याचे वाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद तालुक्यातील माळपठार भागातील ४० गावे पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतरही गावांची झाली आहे. जिल्ह्यातील १३ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आगामी काळात टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे. प्रशासनाने पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. मात्र, यातील उपाययोजना प्रभावशून्य झाल्या आहे. पाणीच नाही तर आणायचे कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यवतमाळात बारा दिवसाआड पाणीपुरवठा
जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळ शहरात यंदा भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात पाण्याचा थेंबही नाही. मृत साठ्यातून यवतमाळकरांची तहान भागविली जाते. पाच लाख लोकसंख्येपुढे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेंबळा प्रकल्पावरून पाणी आणण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र या उन्हाळ्यात पाणी मिळण्याची खात्री खुद्द प्रशासनही देत नाही. परिणामी यवतमाळ शहरातील काही भागात १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगरपरिषदेत दररोज पाण्यावरून वाद होत असल्याचे चित्र दिसत आहे.

पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित
ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांकडे थकीत वीज बिलापोटी वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील तब्बल ५०० पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १३३१ पाणीपुरवठा योजनांकडे वीज वितरण कंपनीचे तब्बल २५ कोटी रुपये थकीत आहे.

Web Title: Yavatmal district has severe water crisis since February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी