श्वानांच्या भांडणामुळे दोन गटांत तुंबळ हाणामारी, विठाळा येथील घटना

By रवींद्र चांदेकर | Published: August 16, 2023 07:49 PM2023-08-16T19:49:15+5:302023-08-16T19:49:41+5:30

 परस्परांविरुद्ध  गुन्हे दाखल, तिघांना अटक

Two groups clashed due to dog fighting, incident at Vithala | श्वानांच्या भांडणामुळे दोन गटांत तुंबळ हाणामारी, विठाळा येथील घटना

श्वानांच्या भांडणामुळे दोन गटांत तुंबळ हाणामारी, विठाळा येथील घटना

googlenewsNext

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील विठाळा शिवारात श्वानांच्या भांडणावरून काळ्या पाण्याच्या तलावाजवळ दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. यात सातजण जखमी झाले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी दुपारी  घडली.

विठाळा येथील शेतकरी युवक सोमवारी काळ्या पाण्याच्या तलावाजवळ बैल धुण्यासाठी गेले होते. शिवारात मेंढपाळ आणि त्यांच्या श्वानांमध्ये भांडण झाले. त्यात एका गटातील व्यक्तीने दुसऱ्या गटातील श्वानाला मारहाण केली. त्याचा जाब दुसऱ्या गटाने विचारला. यात वाद वाढला. त्याचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. यात दोन्ही गटांतील गोपाल चव्हाण (वय २२), आकाश महानर (१९) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर दिग्रस ग्रामीण रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून यवतमाळला  हलविण्यात आले. राहुल चव्हाण (२९), गुलाब महानर (३५) यांना नागपूरला हलविण्यात आले आहे. या प्रकरणात सुधीर राठोड (३१), सूरज चव्हाण (२२) आणि अमित पवार (२१, सर्व रा. विठाळा) यांना अटक करण्यात आली आहे.

मेंढपाळ गटाच्या वतीने उमेश बाळकृष्ण खरात (३९,  रा. लाख-खिंड, ता. दारव्हा  यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पिका ऊृर्फ सुधीर उंदरा राठोड (३१), कैलास चव्हाण (५०), राहुल प्रेमसिंग चव्हाण (२९), सूरज गजानन चव्हाण (२२), अमित अनिल पवार (२१), गोपाल ऊर्फ काळू गजानन चव्हाण (२२) यांच्यासह एकावर भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३२६, ५०४ , ५०६ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठाळा येथील अमित अनिल पवार (२२) यांच्या तक्रारीवरून गुलाब सदाशिव महानर (३५), आकाश शंकर महानर (१९), उमेश बाळकृष्ण खरात (३१) यांच्यासह सात ते आठ अनोळखी इसमांविरुद्ध भादंवि १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ५०४, ५०६ कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय सुगत पुंडगे, उपनिरीक्षक नरेंद्र मानकर, सुरेश ढाले करीत आहेत.

पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
या घटनेनंतर विठाळा ग्रामस्थांनी दिग्रस पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. विठाळा शिवारातील मेंढ्याचे कळप हटविण्याची मागणी केली. पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत व कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलावून कायमचा तोडगा काढण्याच्या दृष्टीने चर्चा केली. विठाळा ते साखरी शिवारात मेंढी कळप जंगलाची नासाडी करीत आहे. त्यांना त्वरित हटवावे, अन्यथा मोठा वाद होईल, असे निवेदन विठाळाच्या सरपंच शारदा राजेश राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत यांना दिले. त्यांनी मेंढ्याचे कळप तत्काळ हटविण्यात येईल, अशी ग्वाही दिली. नंतर जमाव शांत झाला.

आरोपींवर ३०७ चे वाढीव कलम लावा
विठाळा येथील आरोपींनी मेंढपाळ गुलाब महानर, आकाश महानर यांच्यावर हल्ला करून करून गंभीर जखमी केले. ही घटना अत्यंत गंभीर असून, मेंढपाळांच्या अत्यंत नाजूक जागेवर गंभीर मार लागला. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे विठाळा येथील आरोपींवर भादंविचे वाढीव ३०७ कलम तातडीने वाढवून कायदेशीर कार्यवाही करावी, अन्यथा  पोलिस ठाणे येथे उपोषण किंवा मेंढ्या घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मौर्य क्रांती महिला महासंघाच्या प्रदेशाध्यक्ष प्रमोदिनी मुंदाने, धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे, विदर्भ अध्यक्ष अशोक वगरे, पंकज दाडे, नत्थू महानोर, धोंडबा कोळपे, बाबाराव महानोर, यादव गावंडे, आदींनी निवेदनातून दिला आहे.

Web Title: Two groups clashed due to dog fighting, incident at Vithala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.