खेड्यांसाठी तरुणांची ‘टीम राष्ट्रनिर्माण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:18 PM2018-06-26T23:18:17+5:302018-06-26T23:19:36+5:30

शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात.

'Team Nation' for youth of the village | खेड्यांसाठी तरुणांची ‘टीम राष्ट्रनिर्माण’

खेड्यांसाठी तरुणांची ‘टीम राष्ट्रनिर्माण’

Next
ठळक मुद्देशहरी नोकरदार २३ जणांचा उपक्रम : पाच तालुक्यात वैचारिक साफसफाई

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात. पण राष्ट्रसंतांच्या विचारांचा पगडा असलेल्या २३ तरुणांनी मात्र ही मानसिक घालमेल संपवून स्वत:चेच नव्हे, तर पाच तालुक्यांतील गावांची भौतिक आणि वैचारिक साफसफाई सुरू केली आहे.
टीम राष्ट्रनिर्माण विचारधारा अशा नावासह हे तरुण गेल्या चार महिन्यांपासून गावखेड्यांमध्ये काम करीत आहे. घाटंजी, यवतमाळ, पांढरकवडा, आर्णी, दारव्हा या तालुक्यांतील गावे बदलण्याचा विडा या टीमने उचलला आहे. विशेष म्हणजे, आपापल्या नोकऱ्या सांभाळून ही टीम काम करते.
प्रत्येक शनिवारी एका खेड्याची निवड करून सर्व तरुण तेथे पोहोचतात. सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत हाती खराटा घेऊन ग्रामसफाई करतात. रात्री ७.३० पर्यंत भजनसंमेलन घेऊन गावकºयांपुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार ठेवतात. रात्री आठ वाजता सामुदायिक प्रार्थना झाल्यावर हे तरुण कीर्तनकारांची भूमिका पत्करतात. रात्री ११ वाजेपर्यंत हे कीर्तनरुपी प्रबोधन सुरू असते. यात जीवनविकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, व्यसनांमुळे जीवनात अंध:कार, कृषीतंत्र अशा विषयांवर हे तरुण गावकऱ्यांना मार्गदर्शन करतात. गावातून शिकून शहरात स्थायिक झालेले नोकरदार पुन्हा गावात येऊन आपल्यासोबत संवाद साधतात, हे बघून गावकºयांच्या मनात सकारात्मक उर्जा निर्माण होते, असा या तरुणांचा विश्वास आहे.
गेल्या फेब्रुवारीपासून या उपक्रमाची सुरूवात घाटंजी तालुक्यातून करण्यात आली. आतापर्यंत डांगरगाव, पाटापांगरा, तिवसाळा, पंगडी, सायतखर्डा, पहापळ, वरझडी, सायखेडा, पांढुर्णा, मांजरी, कवठा, तळणी, वडगाव, कारेगाव, जरूर, कामठवाडा, शिवणी, करमना आदी गावांमध्ये हे तरुण पोहोचले आहेत.
टीम आपल्यासाठी ग्रामसफाई करीत असल्याचे पाहून गावकरीही या उपक्रमात सहभागी होतात, हे विशेष. तर शेजारच्या खेड्यातील नागरिक ‘आमच्याही गावात या’ अशी गळ घालतात. नुकताच घाटंजी येथे झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात यवतमाळचे खुशाल ठाकरे, डॉ. ताराचंद कंठाळे, डॉ. कोठारी, ललित काळे आदींनी या टीमची भेट घेतली.
ही आहे ‘टीम राष्ट्रनिर्माण विचारधारा’
शिवाजी सोयाम, मधुकर गेडाम, अविनाश राऊत, पांडुरंग किरणापुरे, कैलास बगमारे, विलास कोरांगे, गजानन चव्हाण, राजू विरदंडे, छगन पेंदोर, राजू कुंटलवार, सुरेश चौधरी, दिवाकर गेडाम, घनश्याम काटकर, गोवर्धन मेश्राम, प्रदीप जाधव, माणिकदास टोंगे, सुरेश बोपटे, श्रीराम तोडसाम, मोहन शेंडे, चंद्रकांत आडे, गणेश साबापुरे, विष्णू नेवारे, गजेंद्र ढवळे आदी या टीमचे सदस्य आहेत.

Web Title: 'Team Nation' for youth of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.