आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी पाठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:00 PM2020-03-16T14:00:01+5:302020-03-16T14:01:22+5:30

कोरोना आजाराची धास्ती लक्षात घेता राज्यातील आदिवासी आश्रमशाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. तर आश्रमशाळा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्यांच्या घरी पाठविण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्तालयाने दिले आहे.

Send students from the tribal hostel to home | आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी पाठवा

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी पाठवा

Next
ठळक मुद्देआयुक्तालयाचे निर्देश कोरोना रोखण्यासाठी आश्रमशाळांनाही सुट्या

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना आजाराची धास्ती लक्षात घेता राज्यातील आदिवासी आश्रमशाळांनाही ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. तर आश्रमशाळा वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ताबडतोब त्यांच्या घरी पाठविण्याचे निर्देश आदिवासी विकास आयुक्तालयाने दिले आहे. जिल्ह्यातील पुसद आणि पांढरकवडा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमध्ये हे आदेश धडकले आहे.
कोव्हीड-१९ आजारासाठी गर्दी धोक्याची आहे. त्यामुळे सार्वजनिक सोहळे रद्द करण्यात आले आहे. मात्र शालेय विद्यार्थी शाळेत एकत्र बसल्यानंतर संसर्गाचा धोका अधिक आहे. ही बाब टाळण्यासाठी राज्य शासनाने शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. मात्र हा आदेश केवळ नगरपालिका, महापालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील शाळांना लागू होता. यातून ग्रामीण भागातील शाळा वगळण्यात आल्या आहेत.
मात्र आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशांचा हवाला देत आदिवासी विकास उपायुक्त अविनाश चव्हाण यांनी अमरावती, नागपूरसह नाशिक आणि ठाणे येथील आदिवासी अपर आयुक्तांना आश्रमशाळा बंद ठेवण्याबाबत आदेश दिले आहे. या आदेशानुसार शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, आदिवासी विकास विभागांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळा, नामांकित शाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शीयल स्कूल आदींना ३१ मार्चपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे आश्रमशाळांमध्ये शिकणारे आणि शासकीय वसतिगृहात राहणाºया विद्यार्थ्यांनाही वसतिगृहातील हालचाल नोंद घेऊन ताबडतोब घरी पाठविण्याचे निर्देश आहे. मात्र ज्यांची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू आहे, त्यांना वसतिगृहात ठेवण्याची सूचना आहे.
विशेष म्हणजे हा आदेशही नगरपालिका, महापालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील आश्रमशाळांसाठी लागू करण्यात आला आहे. प्रत्यक्षात बहुतांश आश्रमशाळा नगरपालिका क्षेत्राच्या बाहेरच आहे. त्यामुळे हा आदेश किती आश्रमशाळा पाळतील याबाबत साशंकता आहे. प्रत्यक्षात नुकतेच होळी, रंगपंचमीच्या सुट्यांसाठी आश्रमशाळेतील गावाकडे गेलेले विद्यार्थी अद्यापही परतलेले नाही. आता या आदेशाचा गैरफायदाही घेतला जाण्याची शक्यता आहे.

शहरालगतच्या शाळाही बंद ठेवण्याचे सुधारित निर्देश
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नगरपालिका, महापालिका क्षेत्रातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. मात्र आता शहरालगतच्या ग्रामीण भागातील शाळाही बंद ठेवण्याचे सुधारित निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केले आहे. मात्र या आदेशातही जिल्हा परिषदेच्या शाळांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रम कायम आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळा आणि वसतिगृहे बंद ठेवण्याचे आयुक्तांचे आदेश मिळाले. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. मात्र ग्रामपंचायत क्षेत्रातील आश्रमशाळांबाबत अद्याप निर्देश प्राप्त नाही.
- गितांजली निकम
प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद.

Web Title: Send students from the tribal hostel to home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.