पिस्तूल खरेदीदारांची नावे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 09:57 PM2018-02-02T21:57:41+5:302018-02-02T21:58:11+5:30

अटकेतील आंतरराज्यीय तस्कराने पोलिसांपुढे तोंड उघडले आहे, यवतमाळ शहर व परिसरात कुणाकुणाला पिस्तूल, काडतुसांची विक्री केली, याची यादीच तयार झाली आहे. त्यात गुन्हेगारी वर्तुळातील अनेक सदस्यांचा समावेश असून हे सदस्य आता पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत.

Open the pistol buyer's names | पिस्तूल खरेदीदारांची नावे उघड

पिस्तूल खरेदीदारांची नावे उघड

Next
ठळक मुद्दे आंतरराज्यीय तस्कराने तोंड उघडले : गुन्हेगारी वर्तुळातील सदस्य हिटलिस्टवर

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अटकेतील आंतरराज्यीय तस्कराने पोलिसांपुढे तोंड उघडले आहे, यवतमाळ शहर व परिसरात कुणाकुणाला पिस्तूल, काडतुसांची विक्री केली, याची यादीच तयार झाली आहे. त्यात गुन्हेगारी वर्तुळातील अनेक सदस्यांचा समावेश असून हे सदस्य आता पोलिसांच्या हिटलिस्टवर आहेत. दरम्यान या तस्कराला घेऊन यवतमाळ पोलिसांचे एक पथक थेट मध्यप्रदेशात गेले आहेत.
येथील टोळीविरोधी पोलीस पथकाने पहिल्यांदाच पिस्टल विक्रेते व खरेदीदारांना एकाच वेळी जाळ्यात पकडले. त्यात काँग्रेसचा नगरसेवक, सत्ताधारी पक्षाचे पाठबळ असलेल्या मंडी टोळीतील सदस्यांचा समावेश आहे. विशेष असे मध्यप्रदेशातून अग्नीशस्त्रे आणून त्याची यवतमाळ जिल्ह्यात विक्री करणाऱ्या तस्करालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तो राहणारा बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूरचा असला तरी त्याचे अग्नीशस्त्राचे संपूर्ण नेटवर्क मध्यप्रदेशात आहे. या आंतरराज्यीय तस्कराच्या माध्यमातून अग्नीशस्त्र खरेदीतील एकूणच नेटवर्क पोलिसांच्या हाती लागण्याची चिन्हे आहेत.
पोलिसांनी पिस्टल खरेदी-विक्री प्रकरणात पाच जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून सहा पिस्टल, बारा राऊंड जप्त केले. या आरोपींना तीन दिवस पोलीस कोठडी दिली गेली. कोठडीत त्या तस्कराने आपल्या एकूणच कारभाराची सविस्तर कबुली पोलिसांपुढे दिली आहे. त्याच्या या कबुलीतून त्याने यवतमाळ शहर व जिल्हाच नव्हे तर अन्य जिल्ह्यातही कुणाकुणाला अग्नीशस्त्रे विकली त्यांची नावे रेकॉर्डवर आली आहे. या रिव्हॉल्वर, पिस्टल खरेदीदारांची इतर माहिती पोलीस गोळा करीत आहे. तो नेमका कोणत्या टोळीचा सदस्य आहे, त्याचे क्राईम रेकॉर्ड काय, त्याला आशीर्वाद कुणाचा, फायनान्सर कोण, यावर भर दिला जात आहे. शस्त्र खरेदी-विक्री व्यवहारात सहभाग असलेल्यांची ही यादी बरीच मोठी आहे. या यादीतील सदस्यांना टप्प्याटप्प्याने अटक होण्याची शक्यता आहे. यातील काहींना मुख्यालयातील टोळीविरोधी पोलीस पथकाच्या कार्यालयात बोलावून त्यांची चौकशीही केली जात आहे. या सदस्यांच्या एकूणच हालचालींवर पोलिसांचा वॉच आहे.
खुद्द शस्त्र विक्रेताच पकडला गेल्याने या सदस्यांकडून आपल्याकडील शस्त्रे, काडतुसांची जंगलात किंवा अन्य बेवारस ठिकाणी विल्हेवाट लावली जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळेच पोलिसांची त्या यादीतील सदस्यांवर छुपी पाळत आहेत. आरोपीने कबुली दिलेल्या यादीतील अनेक सदस्यांकडे तर दोन ते तीन पिस्टल असल्याचीही माहिती आहे.
पोलिसांचे एक पथक शस्त्र विक्रेता रवी उमाळे याला घेऊन मध्यप्रदेशात बऱ्हाणपूर येथे गेले आहे. तेथून त्याच्या नेटवर्कची खातरजमा केली जात आहे. रवी हा बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील मध्यप्रदेश सिमेलगत असलेल्या टुणकी गावचा रहिवासी आहे, हे विशेष.
यवतमाळ पोलीस मध्यप्रदेशात तळ ठोकून
पिस्टल बनविण्याचे कारखाने मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यात आहेत. या कारखान्यातून आणखी कोण माल उचलतो आणि यवतमाळात विक्री करतो याचा सर्च टोळीविरोधी पथक घेत आहे. त्यासाठी एक चमू बऱ्हाणपूरमध्ये तळ ठोकून आहे. मेळघाट सीमेवरील मध्यप्रदेशात देडतलई या गावात शस्त्रात्र निर्मितीचा मोठा कारखाना आहे. काही वर्षांपूर्वी हा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला होता. परंतु आता पुन्हा तो सुरू झाल्याचे सांगितले जाते. या कारखान्यावरही पोलिसांचा वॉच आहे.
गृहराज्यमंत्र्यांनी एसपींना अहवाल मागितला
पिस्टल तस्करी प्रकरणाची दखल अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनीही घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागितला आहे. दरम्यान, शस्त्र तस्करीच्या या प्रकरणात कुणाचीही गय करु नका, सखोल तपास करा, दोषी असेल त्याला अटक करा, असे निर्देश पोलीस प्रशासनाला ना. रणजित पाटील यांनी दिले आहेत.

Web Title: Open the pistol buyer's names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा