महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलवर पुन्हा एकदा ‘ग्रामीण’ वकिलांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:21 PM2018-02-13T15:21:13+5:302018-02-13T15:24:51+5:30

तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक होऊ घातली आहे. आता पुन्हा एकदा तब्बल ९२ ग्रामीण वकिलांसह विदर्भातील १५ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.

Once again, 'rural' lawyers claim on Maharashtra and Goa Bar Council | महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलवर पुन्हा एकदा ‘ग्रामीण’ वकिलांचा दावा

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलवर पुन्हा एकदा ‘ग्रामीण’ वकिलांचा दावा

Next
ठळक मुद्दे२८ मार्चला मतदान माजी अध्यक्ष आशीष देशमुखांसह विदर्भातून १५ जण मैदानात

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलची निवडणूक होऊ घातली आहे. २०१० पर्यंत केवळ महानगरीय वकिलांचा चेहरा असलेली बार कौन्सिल पुसदच्या अ‍ॅड. आशीष देशमुख यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीनंतर सर्वप्रथम ग्रामीण भागापर्यंत पोहोचली. आता पुन्हा एकदा तब्बल ९२ ग्रामीण वकिलांसह विदर्भातील १५ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातून बार कौन्सीलवर २५ प्रतिनिधींचे बोर्ड निवडून जाणार आहे. त्यासाठी येत्या २८ मार्च रोजी मतदान होऊ घातले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार असून २२ पर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. २३ व २४ रोजी अर्जांची छाननी करून १ मार्च रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.
मोठी परंपरा लाभलेली बार कौन्सिल महानगरीय वकीलांपुरतीच मर्यादित होती. मात्र, २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीत पहिल्यांदाच २५ पैकी १९ प्रतिनिधी हे ग्रामीण भागातील वकिलांमधून विजयी झाले. त्यातही पुसदसारख्या गावात वकिली करणारे अ‍ॅड. आशीष देशमुख यांनी थेट अध्यक्षपदावर झेप घेतल्याने यावेळी ग्रामीण वकिलांचा विश्वास दुणावला आहे. त्यामुळेच सोमवारपर्यंत महाराष्ट्रातून एकंदर ९२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर अंतिम तारखेपर्यंत अर्जांचा आकडा २०० पार पोहोचेल, असा दावा जाणकारांनी केला आहे.
ग्रामीण वकिलांचे आधिक्य असलेल्या २०१० च्या बार कौन्सिलने इतिहासात पहिल्यांदाच यवतमाळकडे अध्यक्षपद सोपविले होते. अ‍ॅड. देशमुख यांच्या कारकीर्दीने प्रत्येक वकिलाच्या मनात सुरक्षिततेची भावना जागविली. मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने कोर्ट फी वाढविली, त्यावेळी वकिलांमध्ये खळबळ उडाली होती. परंतु, अ‍ॅड. देशमुख यांनी विधी मंत्रालयापासून जिल्हा न्यायाधीशांपर्यंत पाठपुरावा करून या शुल्क वाढीला स्थगिती मिळविली आहे. त्यामुळेच जिल्हा बार असोसिएशनसह तालुका पातळीवरील सर्व वकिलांनी देशमुख यांच्या उमेदवारीला पुन्हा एकदा पाठिंबा जाहीर केला असून त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मतदानाची तारीख उमेदवारांची गर्दी लक्षात घेता सध्या प्रत्येक जिल्ह्यातील वकील प्रचाराच्या कामात मग्न आहेत.

असे होणार मतदान
बार कौन्सिलच्या निवडणुकीत महाराष्ट्र, गोवा, दादरा, नगर, हवेली, दीव, दमण येथील एकंदर १ लाख १४ हजार वकील मतदार आहेत. नियमानुसार, पूर्वीच्या मंडळाचा कार्यकाळ २०१५ मध्येच संपला. मात्र ‘बोगस वकील’ शोधण्याचा मुद्दा ऐरणीवर आल्याने दोन वर्ष निवडणूक घेण्यात आली नाही. आता मतदार यादीतील ‘बोगस’ नावे, मृत वकिलांची नावे वगळून सुधारित यादी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदाराला मतदान करताना पसंतीक्रम द्यायचा आहे. १ ते २५ पर्यंत हा पसंतीक्रम देता येतो. परंतु, किमान १ ते ५ पसंतीक्रम देणे बंधनकारकच आहे.

विदर्भातील उमेदवार
यवतमाळ - अ‍ॅड. आशीष देशमुख
अमरावती - अ‍ॅड. सुमित घोडेस्वार, अ‍ॅड. ऋषिकेश भुजाडे, अ‍ॅड. प्रवीण पाटील
नागपूर - अ‍ॅड. आसीफ कुरेशी, अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, अ‍ॅड. किशोर लांबट, अ‍ॅड. संग्राम शिवपूरकर, अ‍ॅड. अनिल गोवरदिवे, अ‍ॅड. संदीप चार्लावार, अ‍ॅड. पारिजात पांडे
अकोला - अ‍ॅड. मोतीसिंग मेहता, अ‍ॅड. बी. के. गांधी
भंडारा - अ‍ॅड. किशोर लांजेवार
कारंजा - अ‍ॅड. नीलेश बोरकर
 

Web Title: Once again, 'rural' lawyers claim on Maharashtra and Goa Bar Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.