हृदयद्रावक! कर्जाचा डोंगर चढत गेला अन् आई-बाबांचे अवसानच गळाले 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 05:36 AM2024-04-16T05:36:03+5:302024-04-16T05:37:01+5:30

आई-वडिलांच्या आत्महत्येनंतर मुलावर कुटुंबाची जबाबदारी, म्हणाला ‘नापिकीच्या चक्राने सर्वस्व हिरावलं’

mountain of debt went up and the parents lost their lives | हृदयद्रावक! कर्जाचा डोंगर चढत गेला अन् आई-बाबांचे अवसानच गळाले 

हृदयद्रावक! कर्जाचा डोंगर चढत गेला अन् आई-बाबांचे अवसानच गळाले 

लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ : साहेब, १ लाख १० हजार रुपये मक्त्याने शेती घेतली होती. शेतात दिवसरात्र घाम गाळला. हे पीक गेल्यानंतर दुसरे हाताला लागेल, अशी भाबडी आशा होती. मात्र, नापिकीचे चक्र सुरूच राहिले. बहिणीचे लग्न, नंतर तिचे सिझर, पुन्हा आलेले आजारपण यातून वाट काढत असताना, सोयाबीन अन् कापसाने दगा दिला. त्यातून बाहेर पडण्यासाठी हरभरा पेरला, तर रानडुकरांनी रातोरात तोही फस्त केला, अशा परिस्थितीत पुढे काय? घेतलेले कर्ज कशाने फेडायचे, अशा विवंचनेत आई-बाबा होते. 

या नापिकीच्या चक्रानेच त्यांचा बळी घेतल्याचा टाहो मुलगा निखिल याने फोडला. दिग्रस तालुक्यातील डेहणी येथे रविवारी किशोर बाळकृष्ण नाटकर (४५) आणि वनिता किशोर नाटकर (४०) या दाम्पत्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. 

आई-वडिलांसोबत शेतात राबणारा २३ वर्षीय मधला मुलगा निखिलने सोमवारी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी त्याच्या बाजूलाच मोठी बहीण निकिता (२४), लहान बहीण शारदा (१८), आजोबा बाळकृष्ण (७३) आणि आजी विमलाबाई (७०) शून्यात नजर लावून बसले होते.  

आधीच कर्ज, त्यात आजारपण...   
- कुटुंबामध्ये वडील सगळ्यात मोठे होते. घरची सहा एकर कोरडवाहू शेती आणि तिला जोड म्हणून गावातीलच दहा एकर ओलिताची शेती मक्त्याने घेतली होती. 
- निकिताच्या लग्नासाठी दोन लाखांचे कर्ज घेतले. तिचे सिझर झाल्याने पुन्हा पैसे मोजावे लागले. आई-वडिलांनी तिच्या उपचारासाठी दीड लाखावर खर्च केला. 
- कापूस, सोयाबीन पिकल्यानंतर कर्जफेड होईल, अशी आशा वाटत होती. मात्र, पीक हाती आले नाही. रब्बीत दोन एकरांवर हरभरा घेतला, तर रानडुकरांनीच तो फस्त केला. यात पुन्हा कृषी केंद्राची दीड लाखाची उधारी चढली. यातून आम्ही सगळेच हवालदिल झालो होतो, अशी व्यथा निखिलने मांडली.

Web Title: mountain of debt went up and the parents lost their lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.