भूमाफियांचा बँकांना कोट्यवधींनी गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 09:32 PM2018-08-08T21:32:21+5:302018-08-08T21:32:44+5:30

येथील भूखंड घोटाळ्यात प्रत्यक्षात तीन बँकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाली आहे. भूमाफियांनी बँकांमध्ये असलेल्या ग्राहकांच्या ठेवीवर डल्ला मारला आहे. मात्र त्यानंतरही बँका स्वत: फिर्यादी बनून पोलिसांपुढे हजर होत नसल्याने या बँकांच्या प्रामाणिकपणावर ठेवीदारांकडून प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

Millions of landlords pay for the banks | भूमाफियांचा बँकांना कोट्यवधींनी गंडा

भूमाफियांचा बँकांना कोट्यवधींनी गंडा

Next
ठळक मुद्देकर्ज बुडाल्यात जमा : फसवणूक होऊनही बँकांची पोलिसात फिर्याद का नाही ?

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील भूखंड घोटाळ्यात प्रत्यक्षात तीन बँकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक झाली आहे. भूमाफियांनी बँकांमध्ये असलेल्या ग्राहकांच्या ठेवीवर डल्ला मारला आहे. मात्र त्यानंतरही बँका स्वत: फिर्यादी बनून पोलिसांपुढे हजर होत नसल्याने या बँकांच्या प्रामाणिकपणावर ठेवीदारांकडून प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
‘लोकमत’ने यवतमाळातील कोट्यवधींचा भूखंड घोटाळा उघडकीस आणला. त्यात आतापर्यंत सात गुन्हे नोंदविले गेले. बनावट मालक उभा करणे, त्याची बोगस कागदपत्रे तयार करणे, त्याद्वारे भूखंड नावावर करून घेणे व पुढे त्यावर कोट्यवधींचे कर्ज उचलणे अशी ही गुन्ह्याची पध्दत आहे. यात काही नावे पोलिसांच्या रेकॉर्डवर आली असली तरी भविष्यात त्यांच्याकडून काही वसुली होईल, याची आशाच नाही. कारण ते सध्याच नादार अवस्थेत आहेत. या भूखंड घोटाळ्यात भूमाफियांनी तीन बँकांनाच कोट्यवधींचा चुना लावला. परंतु त्यानंतरही बँका स्वत: पोलिसांत तक्रारी दाखल करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.
भूमाफियांनी बँकांकडे कोट्यवधींच्या कर्जासाठी तारण ठेवलेले भूखंड प्रत्यक्षात त्या मालकाचे नाहीतच. बँकांना वसुलीसाठी या भूखंडाचा लिलाव करण्याचेही अधिकार नाहीत. अशा कर्ज प्रकरणात सरळसरळ बँकांची फसवणूक झाली आहे. हे प्रकार सिद्धही झाले. मात्र बँका मूग गिळून असल्याने या कर्ज प्रकरणात बँकेतील लोकप्रतिनिधी, प्रशासन व व्यवस्थापनाचे साटेलोटे तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली.
आजचा फिर्यादी उद्याचा आरोपी
भूखंड घोटाळ्यात रेकॉर्डवर आरोपी असलेल्यांना ‘एसआयटी’ने (विशेष तपास पथक) हातकड्या घातल्यास पोलिसांचे हात आपल्या कॉलरपर्यंत येऊ शकतात, याची जाणीव बँकांमधील कोट्यवधींच्या नियमबाह्य कर्जाला मंजुरी देणाऱ्यांना आहे. या कर्जात तेही ‘वाटेकरी’ आहेत. या अटकेच्या भीतीनेच सध्या बँका स्वत: पोलिसात जाणे टाळत असल्याचे सांगितले जाते. कारण आजचा फिर्यादी उद्या आरोपी होण्याची भीती त्यांना आहे.
कायदे तज्ज्ञांच्या उंबरठ्यावर
अटकेच्या या भीतीतूनच त्यांनी प्रकरणात नेमके काय होऊ शकते, आपल्यापर्यंत ‘एसआयटी’चे हात पोहचू शकतील काय, तसे झाल्यास अटकपूर्व जामीन मिळेल काय यासाठी कायदे तज्ज्ञांचे उंबरठे झिजविल्याचीही माहिती
आहे.
साटेलोटे, भाईगिरीची दहशत की राजकीय दबाव ?
एरव्ही सामान्य ग्राहकांच्या पाच-पन्नास हजाराच्या कर्ज वसुलीसाठी थेट न्यायालयात प्रकरण पाठविण्याची तत्परता दाखविणारे बँकेचे ‘कर्तव्यदक्ष’ (?) पदाधिकारी, सीईओ, व्यवस्थापक भूमाफियांच्या प्रकरणात बॅकफूटवर का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अद्याप पोलिसात फिर्याद न देण्यामागे साटेलोटे, भाईगिरीची दहशत किंवा राजकीय दबाव यापैकी कोणते तरी कारण आडवे येत असावे, असे मानले जाते.

Web Title: Millions of landlords pay for the banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा