कठोर मेहनत आणि नियमित रियाज हेच यशाचे गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:50 PM2017-11-29T23:50:08+5:302017-11-29T23:50:48+5:30

मेहनत आणि सातत्याने रियाज हेच आपल्या यशाचे गमक असून बालवाडीपासूनच गायनाचे धडे वडिलांनी दिले. आपल्याला शास्त्रीय सुगम संगीताची आवड असून मोठे गायक व्हायचे आहे,

Hard work and regular riyas are the achievements of success | कठोर मेहनत आणि नियमित रियाज हेच यशाचे गमक

कठोर मेहनत आणि नियमित रियाज हेच यशाचे गमक

Next
ठळक मुद्देलिटील चॅम्प अंजली गायकवाड : बालपणापासूनच शास्त्रीय सुगम संगीताची आवड, भविष्यात मोठे गायक व्हायचे स्वप्न उराशी

किशोर वंजारी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : मेहनत आणि सातत्याने रियाज हेच आपल्या यशाचे गमक असून बालवाडीपासूनच गायनाचे धडे वडिलांनी दिले. आपल्याला शास्त्रीय सुगम संगीताची आवड असून मोठे गायक व्हायचे आहे, असे महाराष्टÑाची लिटील चॅम्प अंजली गायकवाड हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अवघ्या १३ व्यावर्षी लिटील चॅम्प ठरलेली अंजली नेर येथे न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित स्वरांजली कार्यक्रमासाठी आली असता ती ‘लोकमत’शी बोलत होती. प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी लहानपणची लता मंगेशकर म्हणून केलेला गौरव हा आपल्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असल्याचे अंजलीने सांगितले. अहमदनगर येथील अंजली गायकवाड सर्वसामान्य कुटुंबातून आलेली बालिका आहे. तिने आपल्या जादुई आवाजाने सर्वांना मोहित केले. अंजलीचे गुरु तिचे वडीलच असून बालवाडीपासूनच तिला संगीताचे धडे दिले. सुगम संगीत हा तिचा आवडता गायन प्रकार असून तिने ‘सचिन : अ बिलीओन ड्रीम्स’ या चित्रपटात मर्द मराठा हे गीत गायिले आहे. लिटील चॅम्प व संगीत संग्राम या दोनही स्पर्धेत अंजली व तिचे बहीण नंदिनी यशस्वी ठरल्या.
अंजलीला श्रीनिवास श्रीकृष्णम यांनी चेन्नईला बोलाविले होते. यानंतर तिचा आवाज ऐकून मुंबईच्या पपई स्टुडीओत ए.आर. रहेमान यांनी तिची भेट घेतली. तामिळ, तेलगू, मराठी, हिंदी या भाषेत ती गीत गात असून तिच्या आवाजाने संपूर्ण महाराष्टÑाला वेड लावले आहे.
महाराष्टÑाच्या घरात घरात पोहोचलेल्या अंजलीने आपल्या खानपानाच्या सवयीबाबत सांगितले. मला आईस्क्रीम खूप आवडते. परंतु आवाजात दोष येईल म्हणून सारेगमच्या चार महिन्याच्या काळात आपण कटाक्षाने आईस्क्रीम टाळले. हिमेश रेशमीया, आदर्श शिंदे, क्रांती रेडकर, सचिन पिळगावकर ही मंडळी अंजली आणि नंदिनी या दोघींमध्ये भावी लतादिदी आणि आशा भोसले बघत आहेत. वडिलांनी दिलेल्या संस्कारामुळेच आज या दोन बहिणी सर्वांना वेड लावत आहे.
अंजलीच्या आवाजाने नेरचे श्रोते मंत्रमुग्ध
नेर येथील न्यू इंग्लिश हायस्कूलतर्फे बुधवारी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनातील स्वरांजली कार्यक्रमाचे खास आकर्षण होते अंजली गायकवाड. अंजलीने सादर केलेल्या प्रत्येक गाण्याने उपस्थित मंत्रमुग्ध झाले होते. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीताने उपस्थित थिरकले. तर ‘बापू सेहद के लिए, तू हानीकारक है’ या गीताने श्रोत्यांनी तिला डोक्यावर घेतले. अंजलीची बहीण नंदिनी, वडील अंगद आणि आई यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला नेर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल, विनोद जयसिंगपुरे, संस्थेचे अध्यक्ष वसंतराव पोहेकर, राजाभाऊ चोपडे, पद्माकर ढोमणे, डॉ. बी.सी. लाड, प्राचार्य उदय कानतोडे, के.पी. देशमुख, मनोज दुधे, एम.डी. नागरगोजे, आशा खोडे, प्रशांत बुंदे, के.एच. झंझाळ, श्याम देशमुख उपस्थित होते. यावेळी अंजलीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. संचालन प्रा. किशोर राठोड यांनी केले.

Web Title: Hard work and regular riyas are the achievements of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.