खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 03:25 PM2018-05-28T15:25:38+5:302018-05-28T15:25:48+5:30

मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

Farmer worried, no money for crop | खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता कायम

खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांची चिंता कायम

Next
ठळक मुद्देकर्जाची प्रतीक्षाच तूर, हरभरा आणि विम्याचेही पैसे नाही

ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : मान्सून लवकरच केरळमध्ये धडकणार असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज असले तरी हातात एक दमडीही नसल्याने पाऊस वेळेवर आल्यास पेरणी कशी करावी, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. कर्जमाफीनंतरही कर्जाची प्रतीक्षा कायम असून तूर, हरभरा आणि विम्याचेही पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडले नाही.
शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा गत पाच वर्षांपासून सातत्याने दुष्काळ झेलत आहे. गतवर्षी अपुऱ्या पावसाने कोरडा दुष्काळ पडला. यातून सावरत नाही तोच कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे संकट आले. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्यावर आले. त्यातच बाजारपेठेत हमी भावापेक्षाही कमी किंमतीत धान्य माल विकावा लागला. आता तर विकलेल्या तूर आणि हरभऱ्याचे पैसेही शेतकऱ्यांना मिळाले नाही. दुष्काळी परिस्थितीत विमा मदतीला धावून येईल, असे अनेकांना वाटत होते. परंतु त्याचेही पैसे आले नाही. अशा चिंताग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना आशा आहे ती कर्जमाफीनंतर मिळणाऱ्या नवीन पीक कर्जाची. परंतु विविध अडचणीमुळे आजही शेतकऱ्यांच्या हाती कर्जाचे पैसे मिळाले नाहीत. राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेला दोन हजार कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले. जिल्हा बँकेने आतापर्यंत ३३ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वितरित केले. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ दोन टक्के शेतकऱ्यांनाच कर्ज दिले. शासनाने अर्ज द्या, कर्ज घ्या ही योजना सुरू केली. परंतु यातही अनंत अडचणी आहेत.
अशातच हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिलासा देणारे अंदाज वर्तविले. अंदामाननंतर मान्सून कोणत्याही क्षणी केरळमध्ये धडकणार आणि कोकण मार्गे तो विदर्भात येणार. या सकारात्मक अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या अंगी हत्तीचे बळ संचारले. उधार उसणवार करून शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत केली. त्यातच इंधन दरवाढीने मशागतीचा खर्च हाताबाहेर गेला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांजवळ आता पैसाच उरला नाही. जिल्ह्यात चार लाख शेतकरी असून नऊ लाख १४ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु पेरणीसाठी पैसा नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. त्यातच शासनाने बियाणे कंपन्यांवर अनेक अटी टाकल्या. त्यामुळे सध्याही जिल्ह्यात बियाणे पोहोचले नाही. १५ मेपर्यंत बियाणे येणार असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. २५ मेपर्यंतही जिल्ह्यात बियाणे पोहोचले नाही. पाऊस वेळेवर आला तर एकाच वेळी बियाणे खरेदीमुळे गोंधळ उडून शेतकऱ्यांच्या माथी पुन्हा बोगस बियाणे मारण्याची शक्यता आहे. अशा या विपरित परिस्थितीत शेती पडिक तर राहणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

शेतकऱ्यांची धूळ पेरणीकडे पाठ
जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात धूळ पेरणी केली जाते. पावसापूर्वी पेरणी करून पावसाची प्रतीक्षा शेतकरी करतात. सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी ओलितही करतात. मात्र यावर्षी जिल्ह्यात एकाही शेतकऱ्याने धूळ पेरणीची हिंमत केली नाही. गतवर्षी बोगस बियाण्यांमुळे गुलाबी बोंडअळीचा फटका बसला. तसेच आता मार्केटमध्येही बियाणे उपलब्ध झाले नाही. परिणामी जिल्ह्यात कोणत्याही शेतकऱ्याने धूळ पेरणी केली नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसून येते.

Web Title: Farmer worried, no money for crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी