सदोष ‘एफआयआर’मुळे आरोपींना जामीन, निर्दोष मुक्तता; पोलीस महासंचालकांचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 12:02 PM2018-11-06T12:02:23+5:302018-11-06T12:03:16+5:30

गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जामीन मिळणे अथवा खटल्यातून निर्दोष मुक्तता होणे यासाठी ‘एफआयआर’मधील त्रुट्या कारणीभूत असल्याचा ठपका खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी ठेवला आहे.

Due to faulty 'FIR', bail for accused, acquitted; DGP | सदोष ‘एफआयआर’मुळे आरोपींना जामीन, निर्दोष मुक्तता; पोलीस महासंचालकांचा ठपका

सदोष ‘एफआयआर’मुळे आरोपींना जामीन, निर्दोष मुक्तता; पोलीस महासंचालकांचा ठपका

Next
ठळक मुद्दे राज्यभरातील ठाणेदारांसाठी दहा मार्गदशक तत्वे जारी

राजेश निस्ताने।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जामीन मिळणे अथवा खटल्यातून निर्दोष मुक्तता होणे यासाठी ‘एफआयआर’मधील त्रुट्या कारणीभूत असल्याचा ठपका खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी ठेवला आहे. यापुढे ‘एफआयआर’मध्ये त्रुट्या राहू नये म्हणून ठाणेदारांसाठी मार्गदर्शक तत्वे व चेक लिस्ट जारी करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी २५ आॅक्टोबर २०१८ रोजी राज्यातील तमाम ठाणेदार, तपास अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक जारी केले आहे. कनिष्ठ न्यायालये व सत्र न्यायालयांमध्ये चालणाऱ्या खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी खुद्द गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनाही केल्या जात आहे. मात्र त्यानंतरही अपेक्षेनुसार दोषसिद्धी व शिक्षेचे प्रमाण वाढताना दिसत नाही. शिक्षेचे प्रमाण कमी असण्यामागे विविध कारणांपैकी सदोष ‘एफआयआर’ हेसुद्धा एक प्रमुख कारण असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी नमूद केले आहे. सदोष ‘एफआयआर’मुळे बचाव पक्षाचे वकील आरोपींना जामीन मिळवून देतात, खटल्यातून निर्दोष मुक्तता करून घेतात. पर्यायाने फिर्यादीस न्याय मिळत नाही व त्याचा न्याय व्यवस्था, पोलिसांवर विश्वास राहत नाही. म्हणूनच ‘एफआयआर’ नोंदविताना नेमकी काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महासंचालकांनी सर्व ठाणेदारांसाठी जारी केल्या आहेत.

२० प्रश्नांची चेक लिस्ट जारी
सदर परिपत्रक सर्व ठाणेदारांनी तीन दिवस रोलकॉलवर (गिणती) वाचून दाखविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. या परिपत्रकासोबत २० प्रश्नांची चेक लिस्टही ठाणेदारांसाठी जोडण्यात आली आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना

  • ठाणेदाराने तक्रारदाराचे म्हणणे योग्यरीत्या ऐकून घ्यावे. त्यासंबंधी अथवा समर्पक प्रश्न तक्रारदाराला विचारावे.
  • एफआयआर लिहिताना तक्रारदाराला ज्या महत्वाच्या बाबी समाविष्ठ करावयाच्या आहेत, त्या ठाणेदाराने निट समजून घ्याव्या.
  • तक्रार लिहून घेताना कायद्याची जी कलमे लावायची आहेत, त्याबाबत स्पष्टता हवी. तक्रारदाराच्या सांगण्यानुसार एफआयआर नोंदवून तक्रारदाराला वाचवून दाखवावा.
  • लावावयाच्या कलमांच्या घटकांचा समावेश झाला की नाही, याची खातरजमा करावी.
  • एफआयआर देताना साक्षीदार व इतर व्यक्ती उपलब्ध असले तरी फिर्याद ही बळी ठरलेल्या व्यक्तीचीच घ्यावी. तो असमर्थ असेल तरच इतर व्यक्तीची फिर्याद घ्यावी.
  • फिर्याद दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे एफआयआरच्या कॉलम क्र. ८ मध्ये स्पष्टीकरण नोंदवावे.
  • आरोपी अज्ञात असेल आणि फिर्यादीने त्याला पाहिले असेल तर त्याचे इत्यंभूत वर्णन एफआयआरच्या कॉलम ७ मध्ये नोंदवावे.

Web Title: Due to faulty 'FIR', bail for accused, acquitted; DGP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस